>> राज्य निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांची माहिती
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जून महिन्यातील मोसमी पाऊस आणि नवीन शालेय वर्षाची होणारी सुरुवात लक्षात घेऊन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती यांनी काल दिली. यापूर्वी, निवडणूक आयोगाने जूनमध्ये पंचायत निवडणुका घेण्याचे ठरवले होते; परंतु आता हा निर्णय बदलला आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या पंचायत प्रभाग फेररचनेसंबंधी नागरिकांकडून ९१३ सूचना, दुरुस्त्या, हरकती प्राप्त झाल्या. उत्तर गोव्यातील पंचायतीमधून ६५० आणि दक्षिण गोव्यातील पंचायतीमधून २६३ सूचना, दुरुस्त्या, हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकती, दुरुस्त्यांवर १२ मार्चपर्यंत सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार आहे. प्रभागाच्या अनुक्रमातील बदल, एकाच घराचा क्रमांक वेगवेगळ्या प्रभागात समावेश याबाबत तक्रारी आहेत, असे रमणमूर्ती यांनी सांगितले.
१४ मार्चपर्यंत सुधारित प्रभाग फेररचनेचा मसुदा मामलेदार, पंचायत निवडणूक अधिकार्याकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाकडून १७ मार्चच्या दरम्यान पंचायत प्रभाग फेररचनेचा मसुदा राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. अंतिम मसुदा ११ एप्रिलपर्यंत जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, १२ एप्रिलपर्यंत पंचायत प्रभाग राखीवता निश्चित करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंचायत संचालकांना प्रभाग राखीवता तयार करण्यासाठी पंचायत क्षेत्रातील एससी, एसटी आणि ओबीसी लोकसंख्येची माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.