>> भावानेच हत्या करून केले तीन तुकडे
न्हावेली येथे मजूर कंत्राटदार जमादार रेहमान (२४) याचा खून अनैतिक संबंधांमुळे झालेल्या भांडणातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्घृण खून प्रकरणी उत्तर गोवा पोलिसांच्या पथकाने ४८ तासांत खुनाच्या कारणांचा छडा लावण्यात यश मिळवले असून या प्रकरणी मयताचा भाऊ मेसन रेहमान, तसेच चंदा मिया व संजय पासवान याना भा दं सं ३०२ व २०१ कलमाखाली अटक करण्यात आली आहे. काल सायंकाळी निरीक्षक संजय दळवी व अधिकारीवर्गाने पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून व भांडणातून हा खून झाल्याचे दिसून येत आहे. आपला भाऊ जमीदार रेहमान बेपत्ता असल्याची तक्रार मेसन रेहमान याने केली होती. तो पैसे घेऊन बेपत्ता असल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले होते.डिचोली पोलीस तसेच उत्तर गोवा पोलीस पथकाने विविध माध्यमांतून तपास केल्यानंतर त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलीस पथकाने त्याच्यावरच संशयाची सुई रोखून तपास केला असता आपल्या भावाचा खून केल्याचे मेसन रेहमान तसेच त्याचे दोन साथीदार यांनी मान्य केले.
१५ रोजी रात्री जमीदार रेहमान याला भावाने झोपेच्या पाच गोळ्या जेवणात घातल्या. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर मेसनने बकरे कापण्याच्या धारदार शस्त्राने भावाचे तीन तुकडे केले व प्लास्टिक पिशवीत घालून दोन साथीदारांच्या मदतीने गेटच्या बाहेर नेऊन झाडीत फेकून दिले व त्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, या चकव्याला बळी न पडता पोलीस यंत्रणेने तपासाला गती दिली व त्यांना खुनाला वाचा फोडण्यात यश आले. पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, परमानंद, गजानन प्रभुदेसाई, संदेश चोडणकर, सुदेश नाईक, संजय दळवी, गुरुदास गावंडे, सागर एकोस्कर, तुषार लोटलीकर तसेच इतर अधिकारी दोन दिवस अहोरात्र या प्रकरणाच्या तपासात गुंतून होते व अखेर खुनी गजाआड करण्यात यश आल्याने पोलीस पथकाचे अभिनंदन होत आहे.