न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी आजपासून

0
122

यजमान न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून प्रारंभ होत आहे. घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा न्यूझीलंडला होणार असून इंग्लंडला न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेतानाच कामगिरीवरदेखील अधिक भर द्यावा लागणार आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी तसेच गोलंदाजी फळी स्थिरावलेली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ स्थित्यंतरातून जात आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर रॉरी बर्न्स (१२ कसोटी), डॉम सिबली (पदार्पण) व ज्यो डेन्ली (८ कसोटी) केवळ २० कसोटींचा अनुभव गाठीशी असलेले फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीफळीचा निश्‍चितच कस लागणार आहे. मधल्या फळीत कर्णधार ज्यो रुट व बेन स्टोक्स या अनुभवी दुकलीवरील जबाबदारी वाढणार आहे. गोलंदाजी विभागात जोफ्रा आर्चर विदेशी भूमीवरील आपला पहिलाच कसोटी सामना खेळणार आहे. सॅम करन (११ कसोटी), जॅक लिच (९ कसोटी) व जोफ्रा आर्चर (४ कसोटी) यांच्या जोडीला १३२ कसोटींचा अनुभव गाठीशी असलेला स्टुअर्ट ब्रॉड असणार आहे.

त्यामुळे ही वैविध्यपूर्ण चौकडी न्यूझीलंडचा चकित करू शकते. दुसरीकडे न्यूझीलंडने ‘सेफ गेम’ खेळताना वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला ‘अंतिम ११’मध्ये संधी न देता नील वॅगनर, टीम साऊथी व ट्रेंट बोल्ट यांच्या अनुभवाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या जोडीला डावखुरा संथगती गोलंदाज मिचेल सेंटनर व मध्यमगती गोलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम असेल.