न्यूझीलंडकडून वेस्ट इंडीजचा ‘व्हाईटवॉश’

0
97

पावसाच्या व्यत्ययात खेळविण्यात आलेल्या सामन्यात न्यूझलंडने तिसर्‍या आणि शेवटच्या वन-डेत वेस्ट इंडीजला डर्कवर्थ लुईस पद्धतीने ६६ धावांनी पराभूत करीत क्लिन स्विप केले.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी २३ षट्‌कांचा खेळविण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावत १३१ धावा बनविल्या. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धतीनुसार विंडीजला १६६ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडने १९ षट्‌कांत ३ गडी गमावत ८३ धावा बनविल्या असता जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यांनतर खेळ थांबविण्यात आला व सामना २३ षट्‌कांपर्यंत मर्यादित करण्यात आला. उर्वरित चार षट्‌कांत न्यूझीलंडने ४८ धावा कुटल्या. रॉस टेलरने ५४ चेेंडूत ६ चौकारांच्या सहाय्याने सर्वाधिक नाबाद ४७ तर टॉम लॉमनने ४२ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने ३७ धावांचे योगदान दिले. कोलिन मुन्रोने २१ तर हेन्री निकोल्सने १८ धावा जोडल्या. विंडीजतर्फे शेल्डन कॉटरेलने २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात खेळताना विंडीजला ९ गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडची सुरुवात एकदम खराब झाली. एकवेळे त्यांचे ५ फलंदाज ९ धावांत तंबूत परतले होते. परंतु कर्णधार जेसन होल्डर (३४) आणि निकिता मिलर (२०) यांनी थोडाफार प्रतिकार करीत संघाला ९९ धावांपर्यंत नेले. त्यांच्या व्यतिरिक्त रोवमन पॉवेल (११) आणि शेनॉन गॅब्रियल (१२) यानाच दुहेरी आकडा गाठता आला. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बौल्टने १८ धावांत ३, मिशेल सेंटनरने १५ धावांत ३, मॅट हेन्रीने १८ धावात २ तर टोड एस्टलने १ गडी बाद केला.
रॉस टेलरची सामनावीर तर ट्रेंट बौल्टची मालिकावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
दोन्ही संघांदरम्यानची तीन सामन्यांची टी-२० मालिका शुक्रवारपासून नेल्सनमध्ये सुरू होणार आहे.