न्याय मिळेपर्यंत कामकाज रोखण्याचा विरोधकांचा इशारा

0
80

आमदार रोहन खंवटे यांच्यावर मारहाणीची खोटी तक्रार पोलिसात नोंदवून त्यांना अटक करण्यात पोलिसांना भाग पाडलेले भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांंबरे यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. अन्यथा आम्ही विधानसभचे कामकाज होऊ देणार नाही, असे काल विरोधी आमदारांनी पर्वरी येथे विधानसभा परिसरात संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, आमदार रोहन खंवटे यांच्यावर भाजपच्या पदाधिकार्‍याने मारहाणीची तक्रार करण्याची जी घटना घडली ते प्रकरण सभापती राजेश पाटणेकर यांनी योग्य प्रकारे हाताळले नाही. सभापतींनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याचा आदेश पोलिसाना देऊन त्यांच्याकडून अहवाल मागवायला हवा होता. आमदार रोहन खंवटे यांच्यावरील आरोप खरा आहे की खोटा हे जाणून घेतल्यानंतरच त्याला अटक करण्याची परवानगी पोलिसांना द्यायची की नाही याचा निर्णय घ्यायला हवा होता. पण त्यांनी तसे न करता पोलिसाना खंवटे यांना अटक करण्यात परवानगी देण्याचा निर्णय हा चुकीचा होता, असे कामत म्हणाले. रोहन खंवटे यांच्याबरोबर ज्येष्ठ कॉंग्रेस आमदार प्रतापसिंह राणे हे होते. ते घटनेचे साक्षीदार असून खंवटे यांनी म्हांंबरे यांना मारहाण करण्याची घटना घडलेलीच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. असे असतानाही खंवटे यांना अटक करण्यात आल्याचे कामत म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यावेळी बोलताना म्हणाले की, खंवटे यांच्याविरुद्ध जी तक्रार करण्यात आलेली आहे ती खरी आहे की खोटी याची शहानिशा सभापती या नात्याने राजेश पाटणेकर यांनी करायला हवी होती. मात्र, ज्या अर्थी त्यांनी ही शहानिशा न करताच खंवटे यांना अटक करण्यास परवानगी दिली त्या अर्थी त्यांच्यावर कुणी तरी तसे करण्यास दडपण आणले असावे. मात्र, आपल्या वरील कृतीने पाटणेकर यांनी लोकशाहीचा खूनच केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

तक्रार खोटी ः राणे
आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले की, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी खंवटे व आपण विधानसभा प्रांगणातून सोबत चालत निघालो होतो. खंवटे यांनी कुणाला मारहाण वगैरे काही केली नाही. खंवटे यांच्यावरील तक्रार ही खोटी असून या तक्रारीची दखल घ्यायला नको होती. गोव्यात पोर्तुगीज राजवट चालू आहे काय, असा सवालही त्यांनी केला.