न्यायालयीन निवाड्यावरून विरोधकांचा हल्लाबोल

0
90

राज्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीतील आरक्षण प्रश्‍नी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकार विरोधात निवाडा दिल्यानंतर राज्यातील कॉंग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निवडणुकीतील प्रभाग फेररचना आणि आरक्षणातील विसंगतीच्या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले असून न्यायालयाने विरोधकांना न्याय मिळवून दिला आहे, असेही म्हटले आहे.

नगरपालिका आरक्षणाचा उच्च न्यायालयाचा निवाडा म्हणजे भाजपच्या अस्ताचा प्रारंभ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. निवडणूक प्रक्रियेत फेरफार करून नगरपालिकांवर आपले वर्चस्व ठेवण्याचा भाजपचा डाव उधळला गेला आहे. भाजपचे महिला आणि बहुजनसमाज विरोधी धोरण परत एकदा लोकांसमोर स्पष्ट झाल्याचे विरोधी पक्षनेते कामत यांनी म्हटले आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीतील आरक्षणाच्या घोळाला जबाबदार असलेल्या नगरविकास मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी. पेडणे आणि काणकोण या पालिकांमध्ये घोळ करण्यात आलेला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘सत्यमेव जयते’ अशा शब्दांत न्यायालयाचे निवाड्याचे स्वागत केले आहे. राज्यातील भाजप सरकारचे सत्तेच्या जोरावर विरोधकांची गळचेपी करण्याचे कटकारस्थान उघड झाले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.