‘‘राजकारण्यांना जाड सुई लागेल का?’’

0
104

>> पंतप्रधानांनी घेतला कोरोना लशीचा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला. पहाटे साडे सहा वाजता त्यांना तेथील परिचारिकेने कोरोनावरील भारत बायोटेकच्या लशीचा डोस दिला.

पंतप्रधानांना लस देत असताना परिचारिका तणावाखाली असल्याचे पाहून श्री. मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी त्यांना त्यांची नावे विचारली व त्या मूळच्या कुठल्या आहेत हेही जाणून घेतले. त्यांना लसचा डोस देणार्‍या निवेदा ह्या परिचारिकेला त्यांनी हसत हसत ‘‘लस देण्यासाठी गुरांना इंजेक्शन देतात ती जाड सुई लागेल का?’’ असा प्रश्न विचारला. तिला त्यातील विनोद न समजल्याने मग पंतप्रधानांनी राजकारण्यांची कातडी जाड असते म्हणतात म्हणून तसे विचारल्याचे सांगताच वातावरणात एकच हशा पिकला. लस दिल्यानंतर पंतप्रधानांनी ‘‘लगा भी दिया? पता भी नही चला’’ असे उद्गार काढले. पंतप्रधानांना लस द्यायची असल्याची माहिती ‘एम्स’च्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना आज पहाटेच देण्यात आली होती अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
लशीचा डोस घेतल्यानंतर पंतप्रधानांनी ट्वीट करून जे लशीचा डोस घेण्यास पात्र आहेत त्यांनी तो घेऊन देशाला कोविडमुक्त करण्यासाठी पुढे व्हावे असे आवाहन केले.

नेत्यांनी कोरोना लस विकत घ्यावी

भाजपचा आमदार – खासदारांस सल्ला
भारतीय जनता पक्षाच्या साठ वर्षे वयावरील खासदार व आमदारांनी कोरोनावरील लस विकत घेऊन घ्यावी असे भाजपतर्फे त्यांना सांगण्यात आले आहे. आपापल्या मतदारसंघात आपण ही लस विकत घेऊन तिचा डोस घ्यावा. त्यामुळे जनतेला या लशीविषयी विश्वास वाटेल, तसेच आपण लस विकत घेतल्याने सरकारला तेवढे डोस सामान्य जनतेला सरकारी इस्पितळांतून उपलब्ध करून देता येऊ शकतील असे पक्षाने आपल्या नेत्यांना सांगितले आहे. दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला असून सरकारी इस्पितळांत ही लस मोफत उपलब्ध असून खासगी इस्पितळांत अडीचशे रुपये प्रति डोस या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.