नौदलाचे सात कर्मचारी पाकिस्तानी गुप्तचरांना नौदलाविषयी संवेदनशील माहिती पुरवित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता नौदलाने आपल्या कर्मचार्यांवर नौदल परिसरात फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. नौदल तळांवर, डॉक यार्ड व युद्धनौकांवर स्मार्ट फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेल्या सात नौदल कर्मचार्यांना भारतीय नौदलातील संवेदनशील माहिती सोशल मिडियावरून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देताना पकडण्यात आले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने हे कडक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात नौदलाने एक अंतर्गत आदेश जारी केला असून त्यानुसार मॅसेजिंग ऍप्स, नेटवर्किंग व ब्लॉगिंग, कंटेट शेअरींग, ई-कॉमर्स साईट्स होस्टिंग यावर नौदल कर्मचार्यांना बंदी घालण्यात आली आहे.
सुमारे दहा दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी याविषयाच्या रॅकेटचा पर्दाफाश करून सात नौदल कर्मचार्यांना विशाखापट्टणम, कारवार व मुंबई येथील नौदल तळांवरून अटक केली होती. दरम्यान, याआधीही नौदल कर्मचार्यांवर अशा प्रकारचे सोशल मिडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले होते असे नौदलाच्या अधिकार्यांनी सांगितले.
पाकिस्तानी गुप्तचरांकडून चालविल्या जाणार्या सोशल मिडिया ऍपवरून सात भारतीय नौदल कर्मचारी पाकिस्तानला माहिती पुरवित असल्याचे आंध्रप्रदेश पोलिसांना आढळून आले होते.