भारतीय नाविक दलाने दाबोळी येथील आपल्या आय्एन्एस् हंसा या तळापासून २० कि. मी. पर्यंतच्या परिसरात इमारती बांधण्यावर बंदी घातली जावी असा प्रस्ताव ठेवलेला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या २२ ऑक्टोबर रोजी संबंधीत क्षेत्रातील लोकांची बैठक बोलावली आहे. दाबोळीचे आमदार व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी नौदलाच्या या प्रस्तावासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यानी बोलावलेल्या या बैठकीला स्थानिक पंचायतींचे प्रतिनिधी, स्थानिक आमदार तसेच अन्य सर्व संबंधीत हजर असतील.
दाबोळी येथील विमानतळ हा नौदलाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तळ असून या तळापासून २० कि. मी. च्या परिसरात इमारतीचे बांधकाम करण्यावर निर्बंध घालण्यात यावेत, असा प्रस्ताव नौदलाने ठेवला आहे.
स्थानिक आमदार व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. ह्या प्रस्तावामुळे दाबोळीबरोबरच पणजी शहरातील काही भागांतही बांधकामे करता येणार नसल्याचे गुदिन्हो यांनी म्हटले आहे. हा प्रस्ताव गोमंतकीयांसाठी त्रासाचा असू शकेल. त्यामुळे लोकांनी घरे कुठे बांधायची, असा प्रश्न उपस्थित करून गुदिन्हो यांनी नाविक दल येथे राज्य करू पाहत आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून येथे लोकशाही मार्गाने निवडून आणलेले सरकार असल्याचे म्हटले आहे.
विमानतळाजवळ बांधकाम करायचे असेल तर नाविक दलाची परवानगी घ्यावी लागेल या नाविक दलाच्या परिपत्रकाला माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनीही विरोध केला होता.