गोव्यातील खासगी उद्योगांत गोमंतकीयांसाठी 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवणे हे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करणारे एक खासगी विधेयक गोवा विधानसभेत मांडण्यासाठी आपण ते विधानसभा सचिवांकडे पाठवले आहे, अशी माहिती काल गोवा फॉरवर्डचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. गेल्या विधानसभा अधिवेशनातही आपण हाच खासगी ठराव गोवा विधानसभेत मांडण्यासाठी पाठवला होता; मात्र सरकारने तो कायदा खात्याकडे पाठवून दिला होता. मात्र, पुढे तो तेथून विधानसभेत येऊ न शकल्याने तो आपणाला सभागृहापुढे मांडता आला नव्हता. सरकारने आपणाला तो ‘लॅप्स’ झाल्याचे तेव्हा कळविले होते. त्या पार्श्वभूमीवर आपण परत एकदा हा खासगी ठराव गोवा विधानसभा सचिवांकडे पाठवला असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. आपले गोवा राज्य स्थानिक उमेदवारांसाठी ‘रोजगार विधेयक 2024′ विधानसभेत यावे अशी आपली इच्छा असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.