नोकरी घोटाळ्यात शिक्षकही सामील

0
5

>> ढवळीतील शिक्षकाने शिष्यांनाच फसवले; सव्वा कोटींची फसवणूक; 12.50 लाखांच्या फसवणूकप्रकरणी पहिली तक्रार दाखल

सरकारी नोकरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, एक-एक नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. या घोटाळ्यात आतापर्यंत काही महिला व पुरुष संशयितांना अटक झाली आहे. त्यानंतर आता शिक्षकही या घोटाळ्यात गुंतलेले असल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी देण्यासाठी 12.50 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी काल पहाटे योगेश शेणवी कुंकळीकर (49, रा. ढवळी) या शिक्षकाला अटक केली. तसेच 5 लाख रुपयाच्या फसवणूक प्रकरणी संदीप जगन्नाथ परब (रा. तारीवाडा-माशेल) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संदीप परब व योगेश शेणवी कुंकळीकर यांना न्यायालयाने 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अटक केलेल्या शिक्षकाने अंदाजे 1 कोटी 20 लाख व 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे; मात्र तूर्त साडेबारा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पहिली तक्रार दाखल झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संदीप परब याने दीपाश्री सावंत हिच्या विरोधात अंदाजे 4 कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याची दाखल केली होती. आता संदीपविरुद्धच पहिली तक्रार नोंद झाल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी त्याला रविवारी रात्री उशिरा अटक केली.
फोंडा येथील संगम बांदोडकर यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्यासाठी योगेश शेणवी कुंकळीकर याने जुलै महिन्यात साडेबारा लाख रुपये घेतले होते.

या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा रितसर तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसानी गुन्हा नोंद करून योगेश कुंकळीकर याला सोमवारी पहाटे अटक केली. त्यावेळी चौकशीत योगेश शेणवी कुंकळीकर याने उच्च शिक्षण घेतलेल्या अंदाजे 20-25 विद्यार्थ्यांकडून सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. फसवणुकीचा हा आकडा 1 कोटी 20 लाख व 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी तपास करीत आहेत.

5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी संदीप परबविरुद्ध तक्रार

दीपाश्री सावंत हिने 44 जणांकडून अंदाजे 4 कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल करणाऱ्या संदीप परब याला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. संदीप परबने वन खात्यात नोकरी देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार विशाल गावकर यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल केली आहे, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून संदीप परबला अटक केली. अटक केलेल्या संदीप परबला न्यायालयाने 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक योगेश सावंत तपास करीत आहेत.

पोलीस महासंचालकांना काँग्रेसकडून निवेदन सादर

सरकारी नोकरी घोटाळ्याच्या अगदी मुळाशी जाऊन सविस्तरपणे चौकशी केली जावी, अशी मागणी काल गोवा प्रदेश काँग्रेश समितीने एका लेखी निवेदनाद्वारे गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळाने काल आलोक कुमार यांना एक लेखी निवेदन सादर करून वरील मागणी केली. सरकारी नोकऱ्यांची विक्री केली जात असल्याने राज्यातील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसून, त्यांचे भवितव्य अंधारमय बनले असल्याचे काँग्रेस समितीने या निवेदनात म्हटले आहे.

या घोटाळ्यातील आरोपींनी खोटी व बनावट नियुक्तीपत्रेही लोकांना दिली असल्याचे आढळून आले असल्याचे सदर निवेदनातून म्हटले आहे. या घोटाळ्याशी संबंधित एक ‘ऑडिओ क्लिप’ देखील काँग्रेस समितीने आलोक कुमार यांना दिलेली असून, तपासकामात त्याची मदत होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

शिक्षण खात्यातील नोकरी फसवणूक प्रकरणी फरार संशयितास अखेर अटक

शिक्षण खात्यामध्ये ‘मल्टि टास्क स्टाफ’ची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन 4 लाख 30 हजार रुपये उकळून फसवणूक केल्या प्रकरणी वास्को पोलिसांनी दुसरा संशयित सुरज भिकाजी नाईक (47, रा. चिखली) याला काल अटक केली. तो रविवारपासून फरार होता. या प्रकरणी पहिला संशयित गोविंद उर्फ विकी मांजरेकर याला वास्को पोलिसांनी रविवारी अटक केली होती. काल त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

नोकरी देण्याचे आश्वासन देऊन 4 लाख 30 हजार रुपये दोघांनी घेतल्यावर नोकरी दिलीच नाही, शिवाय पैसेही परत केले नसल्याने नवे वाडे येथील साक्षी सुदर्शन केरकर यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. गोविंद मांजरेकर (42, रा. बायणा) याला वास्को पोलिसांनी रविवारी अटक केली होती. दुसरा संशयित सूरज नाईक फरार झाला होता, त्याचा शोध वास्को पोलिसांनी घेत त्याला काल संध्याकाळी चिखली येथे अटक केली. या दोघांनी आणखी किती जणांकडून नोकरीसाठी रक्कम घेतली होती, याचा तपास वास्को पोलीस करीत आहेत. राज्यात सरकारी नोकरी घोटाळा गाजत असल्याने व सरकारने फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्याचे आवाहन केल्यामुळे साक्षीने त्या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

या दोघांविरुद्ध वास्को पोलिसांनी भा. दं. स. 420 आर/डब्ल्यू 34 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मांजरेकरला रविवारी अटक करण्यात आली होती. दुसरा संशयित सूरज नाईक याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.