नोकरीच्या आमिषाने 13 लाखांना गंडा

0
5

जुने गोवे पोलिसांनी संशयिताच्या मुंबईत आवळल्या मुसक्या

जुने गोवे पोलिसांनी नोकरीचे आमिष दाखवून युवकांना सुमारे 13 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपी अनिकेत गायकवाड (25 वर्षे, रा. अहमदनगर, महाराष्ट) याला काल अटक केली. या संशयिताने 100 पेक्षा जास्त युवकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जुने गोवे पोलीस स्थानकात गवळेभाट चिंबल येथील मयूर मच्छिंद्र कुंकळ्येकर याने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी अनिकेत गायकवाड आणि सावियो दा सिल्वा (रा. खोर्ली तिसवाडी)याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 जून रोजी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात सावियो सिल्वा आणि अनिकेत गायकवाड यांनी आपण विदेशात नोकरी मिळवून देण्याचे एजंट असल्याचे सांगत तक्रारदार व इतरांकडून 13 लाख रुपये उकळले. यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या परदेशात तसेच परदेशी कंपन्यांमध्ये प्रवासी आणि मालवाहू जहाजांवर नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम गोळा केली.

नोकरीसाठी इच्छुक युवकांकडून आगाऊ रक्कम आणि पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे घेतली. तसेच, त्यांना प्रशिक्षण, कागदपत्र पडताळणीसाठी मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र युवकांना नोकरीची नियुक्तीपत्रे बराच काळ उलटला तरी दिली नाहीत. सदर युवकांनी अनिकेत याच्याशी संपर्क साधून नोकरीबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. नोकरी मिळवून देण्यास अपयशी ठरल्याने अनिकेतने त्या युवकांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र नंतर त्याने सदर युवकांचे कॉल स्वीकारणे बंद केले होते.

गोव्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी शोध
जुने गोवे पोलिसांनी अनिकेत याच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला असता तो सापडू शकला नाही. पोलीस पथकाने पाच दिवस संशयिताचा मडगाव, फोंडा भागात शोध घेतल्यानंतर पनवेल, बेलापूर, दादर, कुर्ला, मुलुंड भागातही शोध घेतला. त्यानंतर पोलीस पथकाने संशयिताच्या शोधासाठी चिंचोली अहमदनगर येथे भेट दिली. अखेर, देवनार पोलीस ठाणे व मुंबई पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नाने अनिकेत याला मुंबईत ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले. त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले असून, या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.