नोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस

0
241

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत मते मिळविण्यासाठी भाजप सरकारकडून नोकर्‍यांचे आमिष दाखविले जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात घ्यावी. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची सरशी व्हावी म्हणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

राज्यातील बेकारी ३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. भाजपने बेरोजगारांना बेकारी भत्ता देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत बेकारी भत्ता देण्यात आलेला नाही. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारने १० हजार नोकरभरतीची घोषणा केली आहे. या नोकर्‍यांसाठी अतिरिक्त ३५० कोटी रुपयांची गरज आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृहआधार योजनेच्या लाभार्थींना वेळेवर मानधनाचे वितरण केले जात नाही. खलाशांचे वर्षभराचे निवृत्तिवेतन प्रलंबित आहे. बेकार युवकांना बेकारी भत्ता द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
निवडणूक जवळ आल्यानंतर भाजपकडूनखनिज व्यवसाय सुरू होईल, अशी घोषणाबाजी केली जाते. भाजप २०१२ पासून खनिज व्यवसाय लवकर सुरू होईल, असे सांगत आहे. परंतु, अजूनपर्यंत खनिज व्यवसाय सुरू करण्यात यश प्राप्त झालेले नाही अशीही टीका चोडणकर यांनी केली.