नॉर्थईस्ट युनायटेडची आज हैदराबादविरूद्ध लढत

0
208

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी समोर हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना होईल. हैदराबादचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यामुळे नॉर्थईस्टला स्पर्धेतील मोहीम वेगवान करण्यासाठी प्रयास पडतील. नॉर्थईस्ट पाहिले सहा सामने अपराजित होता. त्यानंतर मात्र त्यांची कामगिरी घसरली. परिणामी त्यांना पहिल्या चार संघांमधील स्थान गमवावे लागले. जेरार्ड न्यूस यांच्या संघाला मागील पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यात त्यांना दोन पराभव पत्करावे लागले आहेत.

मागील लढतीत शेवटच्या दोन क्रमांकांवर राहिलेल्या संघांमधील ही लढत असेल. ह्या मोसमात मात्र दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्याची संधी आहे. त्यांच्या कामगिरीमध्ये फारसा फरक नाही. हैदराबाद सहाव्या स्थानावर आहे, पण नॉर्थईस्टचा त्यांच्यापेक्षा एकच गुण कमी आहे. नॉर्थईस्ट त्यांच्या प्रतिस्पर्धी संघापासून प्रेरणा घेऊ शकेल. ह्याचे कारण हैदराबादची कामगिरी सुद्धा घसरली होती. सलग तीन सामने गमावल्यावर चेन्नईन एफसीवर ४-१ अशा दणदणीत विजयासह हैदराबादने दमदार पुनरागमन केले. त्यांच्यातर्फे सर्वाधिक पाच गोल केलेला प्रतिभाशाली स्ट्रायकर अरीडेन सँटाना याला त्या सामन्यात गोल करता आला नव्हता. त्यानंतरही हैदराबादने जोरदार कामगिरी केली. हैदराबादविरुद्ध खेळताना आपल्या संघाला एकट्या सँटानावर लक्ष केंद्रीत करून चालणार नाही याची न्यूस यांना जाणीव आहे. त्यांनी सांगितले की, चेंडूवर ताबा असताना चांगला खेळ करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि ते अनेक मार्गांनी गोल करू शकतात हे आम्हाला ठाऊक आहे. सेट-पिसेसवर ते बरेच गोल करतात आणि सँटाना हा नेहमीच धोकादायक ठरला आहे. गेल्या मोसमात तसेच या मोसमात त्याने गोल करण्याच्या बाबतीत संघासाठी विक्रमी कामगिरी केली आहे. तो मातब्बर खेळाडू आहे. याशिवाय आक्रमण करू शकणारे इतर अनेक खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या आव्हानाला कसे सामोरे जायचे याचे नियोजन करताना आम्हाला सर्वोत्तम क्षमता पणास लावावी लागेल. आम्हाला गोलच्या संधी निर्माण करून चेंडू नेटमध्ये घालवावा लागेल. हैदराबादचे प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांच्यासाठी या सामन्याला सामोरे जाताना चिंतेची एक बाब आहे आणि ती म्हणजे बचाव. त्यांच्या बचाव फळीला ११ गोल पत्करावे लागले आहेत. गेल्या सहा सामन्यांत त्यांना एकदाही क्लीन शीट राखता आलेली नाही. नॉर्थईस्टची कामगिरी अलिकडे घसरली असली तरी हा सामना खडतर असेल अशी मार्क्वेझ यांची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की, नॉर्थईस्टचा संघ चांगला संघटित आहे. निकालाच्या बाबतीत त्यांची स्थिती सर्वोत्तम नाही, पण भक्कम प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांनी गुण कमावले आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आणि चांगले प्रशिक्षक आहेत. उज्ज्वल भवितव्य असलेले तरुण खेळाडूही त्यांच्याकडे आहेत. मला त्यांची खेळण्याची शैली आवडते. ते योग्य रचनेनुसार खेळतात आणि दोन्ही बाजूंनी वेगवान आगेकूच करू शकतात. त्यांचा संघ धोकादायक आहे. या लढतीबाबत विशेष मुद्दा असा की विजयी संघ गुणतक्त्यात पहिल्या चार क्रमांकांत झेप घेईल. जमशेदपूर एफसी आणि बंगळुरू एफसी यांना ते मागे टाकतील. त्या दोन्ही संघांचा एक सामना मात्र कमी झाला आहे.