इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील चुरस वाढविणारा निकाल शुक्रवारी लागला. मुंबई सिटी एफसीने बाद फेरीचे आव्हान कायम राखले. घरच्या मैदानावर मुंबई सिटीने नॉर्थईस्ट युनायटेडला एकमेव गोलने हरविले. याबरोबरच मुंबई सिटीने गुणतक्त्यात चौथे स्थान गाठले.
ब्राझिलचा ३१ वर्षीय मध्यरक्षक दिएगो कार्लोस याने पहिल्या सत्राच्या अखेरीस (४४वे मिनिट) केलेला गोल निर्णायक ठरला. मुंबई सिटीने घरच्या मैदानावर सरस कामगिरी नॉर्थईस्टचा (९ गोल) गोलांचा दुष्काळ कायम राहिला. दहाव्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीनेही त्यांच्यापेक्षा जास्त (१४ गोल) गोल केले आहेत. मुंबई सिटीने १५ सामन्यांत सहावा विजय मिळविला असून पाच बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २३ गुण झाले. त्यांनी ओडिशा एफसीला मागे टाकले. ओडिशाची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. १५ सामन्यांतून त्यांचे २१ गुण आहेत. ओडिशावर मुंबईने दोन गुणांची आघाडी घेतली. एफसी गोवा १५ सामन्यांतून ३० गुणांसह आघाडीवर आहे. बंगळुरू एफसी दुसर्या क्रमांकावर असून १५ सामन्यांतून २८ गुण आहेत. एटीकेचे तिसरे स्थान असून १४ सामन्यांतून २७ गुणांची कमाई त्यांनी केली आहे. या पराभवामुळे नॉर्थईस्टची आणखी पिछेहाट झाली. १३ सामन्यांत त्यांना सहावा पराभव पत्करावा लागला. दोन विजय आणि पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ११ गुण आणि शेवटून दुसरे नववे स्थान कायम राखले.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने जिंकली. महंमद लार्बीचा क्रॉस शॉट नॉर्थईस्टच्या ज्योस लेयूदोला नीट रोखता आला नाही. याचा फायदा उठवित कार्लोसने चपळाईने चेंडूवर ताबा मिळवित नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयला चकविले. त्यावेळी त्याने रिगनलाही दाद लागू दिली नाही.
मुंबई सिटीतर्फे कार्लोसने ४३व्या मिनिटाला डावीकडून आगेकूच केली होती, पण रिगनने त्याला अवैधरित्या रोखले. त्याआधी ३८व्या मिनिटाला फेडेरीको गॅलेगोने अँड्र्यू किऑगला पास देण्याचा प्रयत्न केला, पण किऑग थोडा आधीच धावला. त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला. २८व्या मिनिटाला कार्लोसचा क्रॉस पास बोर्जेसकडे गेला. त्यातून मोडोऊ सौगौला गोलक्षेत्रात संधी मिळाली. त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला. पाचव्या मिनिटाला रॉलीन बोर्जेसने अमीने चेर्मिटीला उजवीकडून पास देत चाल रचण्याचा प्रयत्न फसला.