नॉर्थईस्टला नमवित हैदराबादने टाळली नामुष्की

0
125

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएएल) येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर हैदराबाद एफसीने गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला ५-१ असे गारद केले. याबरोबरच हैदराबादने आयएसएल इतिहासात साखळीत निचांकी गुणांची नामुष्की टाळली. भारताचा लिस्टन कुलासो आणि ब्राझीलचा मार्सेलिनीयो यांनी प्रत्येकी दोन गोल करीत या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हैदराबादने १८ सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरी व १२ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले. त्यांचे दहा संघांमध्ये शेवटचे स्थान मात्र कायम राहिले. याशिवाय त्यांना पूर्ण मोसमात एकाही लढतीत क्लीन शीट राखता आली नाही, मात्र निचांकी गुणांची नामुष्की टाळण्याचे समाधान हैदराबादला लाभले.

मागील स्पर्धेत चेन्नईनला १८ सामन्यांत दोन विजय, तीन बरोबरी व १३ पराभव अशा कामगिरीसह केवळ नऊ गुण मिळविता आले होते. तेव्हा चेन्नईन गतविजेता होता. हैदराबादने एक गुण जादा मिळविला.
हैदराबादला यापूर्वीचा विजय मोसमातील तिसर्‍या सामन्यात मिळला होता. घरच्या मैदानावरील पहिल्याच लढतीत त्यांनी केरला ब्लास्टर्सला २-१ असे हरविले होते.

नॉर्थईस्टचे शेवटून दुसरे स्थान कायम राहिले. १७ सामन्यांत त्यांना आठवा पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण आहेत. मध्यंतरास हैदराबादकडे ३-१ अशी आघाडी होती. पहिल्या सत्रात भारताचा २१ वर्षीय स्ट्रायकर लिस्टन कुलासो याने दोन व ब्राझीलचा ३२ वर्षीय स्ट्रायकर मार्सेलिनीयो याने एक गोल केला. दुसर्‍या सत्रात भारताचा २१ वर्षीय बचावपटू महंमद यासीर व मार्सेलिनीयो यांनी प्रत्येकी एक गोल केला. नॉर्थईस्टकडून आयर्लंडचा ३३ वर्षीय स्ट्रायकर अँडी किऑघ याने एकमेव गोल पहिल्या सत्रात केला.

खाते उघडण्याची शर्यत हैदराबादने धडाक्यात जिंकली. त्यांनी दोन मिनिटांत दोन गोल केले. १२व्या मिनिटाला नेस्टर गॉर्डीलोने लिस्टनच्या दिशेने चेंडू मारला. त्यावेळी नॉर्थईस्टचा गोलरक्षक पवन कुमार पुढे सरसावला, पण तो चकला. मग लिस्टनने चेंडूवरील ताबा कायम ठेवत मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारला. त्यानंतर नॉर्थईस्टचा मध्यरक्षक मिलन सिंग याने गोलरक्षक पवनला बॅकपास देण्यात ढिलाई दाखविली. त्याच्या चुकीमुळे चेंडू मार्सेलिनीयोच्या दिशेने गेला. त्यावेळी गोल क्षेत्रातून मार्सेलिनीयोने सफाईदार फिनिशींग केले.
नॉर्थईस्टचे खाते ३५व्या मिनिटाला उघडले. आघाडी फळीतील मार्टिन चॅव्हेजने डावीकडून क्रॉस शॉटवर चेंडू अँडीच्या दिशेने मारला. त्यावर अँडीने सुंदर हेडींग करीत हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले.

हैदराबादचा तिसरा गोल ४१व्या मिनिटाला झाला. ४१व्या मिनिटाला नेस्टर बेनीटेझने चाल रचत फटका मारला, पण नॉर्थईस्टच्या रिगन सिंगने चेंडू ब्लॉक केला. त्याला बचाव मात्र सफाईदार करता आला नाही. त्यामुळे चेंडू लिस्टन कुलासोच्या दिशेने गेला. लिस्टनने मग नेटच्या मध्यभागी दमदार फटका मारताना नॉर्थईस्टचा गोलरक्षक पवन कुमार याला चकविले.