>> भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांची टीका
कॉंग्रेसचे नेते तथा माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे भारत स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्ती मिळाली, असा आरोप भाजपचे नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केला.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे गोवा राज्यसुध्दा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चौदा वर्षे पोर्तुगीज राजवटीखाली राहिले. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व इतर भागातील नागरिकांना चळवळ सुरू करावी लागली होती, असेही चौहान यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीरला खास राज्याचा दर्जा देणार्या ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे चौहान यांनी समर्थन केले. जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्याचे कलम रद्दबातल करण्यात आल्याने जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
वाढत्या दहशतवादाला आळा बसणार आहे. नेहरूंच्या चुकीच्या धोरणामुळे ३७० कलम जारी करावे लागले. जनसंघाने सुरुवातीपासून या कलमाला विरोध केला होता. काश्मीरमध्ये खास दर्जामुळे दहशतवाद वाढला. पाकिस्तानला हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. स्थानिकांना या कलमाचा फायदा झाला नाही, असा दावा चौहान यांनी केला.
सोनिया गांधींनी ३७०वर
भूमिका जाहीर करावी
जम्मू काश्मीरला खास राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन शिवराज चौहान यांनी यावेळी केले. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कलम रद्द करण्याच्या निर्णयावर टिका केली आहे. तर, काही नेत्यांनी कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करीत नाही. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे, असेही चौहान यांनी सांगितले.