राज्यपालांना पाठिंब्याबाबत औपचारिक पत्र
जम्मू-काश्मीरमधील एका नव्या राजकीय घडामोडीत काल नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने राज्यात सरकार स्थापनेचा गुंता सोडविण्यासाठी औपचारिकपणे सर्वाधिक जागा मिळवलेल्या पीडीपी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तसे पत्र या पक्षाने राज्यपाल एन. एन. व्होरा यांना पाठविले आहे.अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यपालांनी आपल्याला निमंत्रित करावे अशी विनंती नॅशनल कॉन्फरन्सतर्फे राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. जम्मू प्रांताचे या पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र सिंग राणा यांनी हे पत्र राज्यपालांना सादर केले. त्याआधी पक्षाच्या गाभा समितीची बैठक सोमवारी पार पडली.
राज्य विधानसभा निवडणुकीत पीडीपी हा सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष ठरला असला तरी सरकार स्थापनेबाबत या पक्षातर्फे कोणताच निर्णय होत नसल्याने सत्ता स्थापनेचा तिढा कायम राहिला आहे. परिणामी राष्ट्रपती राजवट लागू होऊन विधानसभा निलंबित अवस्थेत राहिली आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सच्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, या नव्या घडामोडीची दखल पीडीपीतर्फे घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया या पक्षाच्या एका प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. पक्षाच्या व्यासपीठावर या विषयावर चर्चा केल्यानंतर या संदर्भात प्रतिसाद दिला जाईल, असे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले.