नीरव मोदींवरून कॉंग्रेसकडून मोदी सरकार लक्ष्य

0
97

>> घोटाळ्याविषयी तक्रार पंतप्रधान कार्यालयाला वर्षाआधी दिली होती

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हजारो कोटींचा घोटाळा करून विदेशात निसटण्यासाठी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील संबंधांचा आधार घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळेच मल्ल्यासारखेच नीरव मोदीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, अशी टीका त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस पक्षाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी डावोस दौर्‍यावर असताना त्यांच्यासमवेत असलेल्या भारतीय व्यापारी शिष्टमंडळाबरोबरील नीरव मोदी असलेले एक छायाचित्रही प्रसारीत केले आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार पीएनबीने याप्रकरणी तक्रार देण्याआधीच १ जानेवारी रोजीच नीरव मोदी विदेशात पळाला आहे.

दरम्यान एका पत्रकार परिषदेत कॉंग्रसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी याआधी अशाप्रकारे विदेशात पळालेला ललित मोदी हा छोटा मोदी नं. एक व नीरव मोदी हा छोटा मोदी नं. २ अशी संभावना केली. हिरे व्यापारी नीरव मोदीला कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.
बंगळुरूतील हरी प्रसाद नामक नागरिकाने नीरव मोदी याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार वर्षभरापूर्वी केली होती. या तक्रारीची प्रत पंतप्रधानांच्या कार्यालयाला २६ जुलै २०१६ रोजी देण्यात आली होती. त्यातून नीरव मोदीच्या घोटाळ्याची पूर्ण कल्पना पंतप्रधानांना दिली होती. याकडे सूरजेवाला यांनी लक्ष वेधले. या संपूर्ण घोटाळ्यात संपूर्ण पद्धतीला बगल देण्यात आली, नियामक यंत्रणा मोडल्या गेल्या, ऑडिटर्स व तपास यंत्रणांवरही धूळफेक केली गेली आणि आता बँकेच्या दोन कर्मचार्‍यांकडे बोट दाखविले जात आहे, असे ते म्हणाले.

कोणाचीही गय न करण्याचा सरकारचा इशारा
पीएनबीतील कोट्यावधींच्या घोटाळ्याप्रकरणी विरोधी कॉंग्रेसच्या प्रखर टीकेनंतर भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी या घोटाळ्यातील कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा देत प्रकरणाचे तपासकाम वेगाने सुरू असल्याचे सांगितले. या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी डावोसमधील पंतप्रधान मोदीं यांच्या शिष्टमंडळाचा सदस्य नव्हता असा खुलासाही प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला. नीरव मोदी डावोस परिषदेस स्वतःहून सहभागी झाला होता असे ते म्हणाले.

 

नीरव मोदीच्या विविध मालमत्तांवर छापे
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील यंत्रणांनी अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर छापे टाकण्यास कालपासून सुरूवात केली. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ६० हून अधिक अधिकार्‍यांनी नीरव मोदी याच्या मुंबई, सूरत व दिल्ली येथील खासगी मालमत्ता तसेच सराफी दुकानांवर छापेमारी सुरू केली. तसेच कुर्ला-मुंबईतील त्याच्या घरालाही सील ठोकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महाघोटाळ्याच्या खळबळजनक वृत्तानंतर नीरव मोदी गायब झाला असून विजय मल्ल्याप्रमाणेच तोही विदेशात पळाल्याची चर्चा आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी काल याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन आपले काही अधिकारीही या घोटाळ्यात गुंतले असल्याची कबुली दिली. नीरव मोदी, त्याची पत्नी ऍमी, भाऊ निशाल व मेहुणा मेहुल चोकसी अशी या महाघोटाळ्यातील चौकडी असून त्यांनी केलेला एकूण घोटाळा हा ११ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. सीबीआयने वरील चौघांवरही पंजाब नॅशनलची २८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ३१ जानेवारी रोजी गुन्हा नोंद केला आहे.

२०१७ सालापर्यंत पीएनबीमध्ये उपव्यवस्थापकपदावर काम करणार्‍या गोकुळनाथ शेट्टी व मनोज खरात या अधिकार्‍यांनी २८० कोटी रुपये मूल्याची एलओयू तथा हमीपत्रे नीरव मोदी याच्या कंपनीच्या नावे जारी केली होती. शेट्टी याने त्याच्या निवृत्तीला ३ महिने बाकी असताना हे कृत्य केले असून सीबीआयतर्फे त्याची कसून चौकशी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात बँकेच्या काही अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत नीरव मोदी याच्या कंपनीला फायदा होईल अशी कामे केली. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेला २८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

घोटाळ्यात कर्मचार्‍यांच्या
सहभागाची बँकेची कबुली

हिरेव्यापारी नीरव मोदी व संबंधीत कंपन्या यांनी मिळून ११४०० कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याची माहिती पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी या महाघोटाळ्यात आपल्या बँकेच्या काही कर्मचारी तसेच अधिकार्‍यांचा हात असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

बँकेचा एक उपव्यवस्थापक शेट्टी व अन्य एका कर्मचार्‍याला याप्रकरणी निलंबित केल्याचे मेहता यांनी सांगितले. तसेच काही कर्मचार्‍यांची चौकशी सुरू असून बँकेचा वरीष्ठ अधिकारीही यात गुंतला असल्याचे आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घोटाळ्याची सुरूवात २०११ पासून झाली आहे. भारतातील बँकांच्या विदेशातील शाखांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असल्याची माहिती मेहता यांनी दिली. नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांनी बँक कर्मचार्‍यांशी संगनमत करून ते आर्थिक गैरव्यवहार केले व बँकेच्या यंत्रणेचा वापर करत पैसे ट्रान्सफर केल्याचा व त्याची व्याप्ती ११,४०० कोटी रुपये अशी अवाढव्य असल्याचा मुख्य आरोप आहे. हा घोटाळा कसा झाला, त्यात कोणाकोणाचा हात आहे, घोटाळ्याची व्याप्ती या बाबींचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याचे व त्या कामी पीएनबी पूर्ण सहकार्य करीत असल्याचे मेहता यांनी सांगितले. ज्या ज्या बँकांचा या घोटाळ्याशी संबंध आहे त्या सर्वांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची व तपास यंत्रणांना सहकार्य करण्यात येत असल्याचे मेहता म्हणाले.पंजाब नॅशनल बँक कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाण्यास समर्थ असून ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मेहता यांनी केले आहे.