नीट यूजी परीक्षेबाबत सीबीआयद्वारे एफआयआर

0
9

सीबीआयने नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत काल रविवारी, 23 रोजी, शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून पहिला एफआयआर नोंदवला. मंत्रालयाकडून मिळालेल्या काही संदर्भांच्या आधारे, अज्ञात लोकांविरुद्ध विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला. सीबीआयने तपासासाठी दोन विशेष पथके तयार केली आहेत, जी पाटणा आणि गोध्रा येथे जाणार आहेत. केंद्र सरकारने 22 जूनच्या रात्री तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली होती. यापूर्वी, सरकारने शनिवारी रात्री 9 वाजता एनटीएचे (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना हटवले होते. त्यांच्या जागी नवे डीजी म्हणून प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुनर्परीक्षेस 750 विद्यार्थी गैरहजर
गेल्या 5 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार होती. 1563 पैकी केवळ 813 उमेदवार परीक्षेला बसले होते. 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते, ते दोघेही आले नाहीत.