निसर्गाचा उत्सव ः ‘संक्रांत’

0
260

योगसाधना – ४९१
अंतरंग योग – ७६

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणदेखील जोडलेले आहे. म्हणून या उत्सवाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. आपली संस्कृती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ …अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी. योग तत्त्वज्ञानाप्रमाणे सूर्याला कर्मयोगी मानतात. तो स्वतःच्या क्षणिक प्रमादाला झटकून अंधःकारावर आक्रमण करण्याचा या दिवशी दृढ संकल्प करतो.

भारत देश- विश्‍वातील एक महान राष्ट्र. हजारो वर्षांचा उज्ज्वल असा इतिहास असलेला- मानव जीवनातील अनेक क्षेत्रात अग्रेसर- अगदी पुरातन काळापासून. या देशात कितीतरी संतमहात्मे, महापुरुष होऊन गेले. लहान मुलांनीसुद्धा अनेक क्षेत्रात आपली चमक दाखवली. अनेक महिलांनी नाव कमावले. पवित्र नद्यांचा हा देश. उत्तुंग हिमाचल इथेच आहे. कितीतरी भाषा इथे प्रगत झाल्या. भगवंतालादेखील इथे मानव रूपात जन्म घ्यावासा वाटला म्हणून विविध अवतार त्याने घेतले. सोन्याचा धूर निघणारा देश, ‘सोनेरी चिडिया’ म्हणून नावाजलेले आपले हे राष्ट्र. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा देश!
आपल्या या महत्तेमुळेच बाहेरच्या अनेक जणांनी आपल्यावर आक्रमणे केली. आपल्यावर राज्य केले. भयानक अत्याचार केले. थोडा काळ आपण ते सोसले पण मग परत एकदा आपण स्वतंत्र झालो. पण मुख्य मुद्दा अगदी नोंद घेण्यासारखा- म्हणजे भारतीयांनी कुणावरही आक्रमण केले नाही. कुणाचाही राग-द्वेष केला नाही. उलट – * अहिंसा परमो धर्मः – ह्या मंत्राचाच जप केला. तसेच * कृण्वन्तो विश्‍वं आर्यं – हे ब्रीदवाक्य घेऊन सर्व विश्‍वांत आपले आध्यात्मिक ज्ञान अगदी सामान्यांपर्यंत पोचवले.
सध्या आपला विचार चालला आहे तो भारतातील विविध उत्सवांबद्दल – त्यातील कर्मकांडं, त्यामागील तत्त्वज्ञान, प्रतीक रूपाने असणार्‍या गोष्टी व व्यक्ती व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आध्यात्मिक अर्थ.
जाणकारांच्या मताप्रमाणे भारत देश हा आध्यात्मिक देश आहे. विश्‍वाला या क्षेत्रात ज्ञान देणे व मार्गदर्शन करणे हे आपले कार्य व भाग्य. मुख्य म्हणजे आपल्यातील अनेक भारतीय नागरिकांनाच माहीत नाही- आपल्याकडे काय खजिना आहे ते. जाऊद्या. आपण आपला अभ्यास, चिंतन व मुख्य म्हणजे आचरण चालू ठेऊ या.
पौष महिन्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा उत्सव म्हणजे मकरसंक्रांत- पौष, शुद्ध प्रतिपदा. ह्या उत्सवाला विविध पैलू आहेत-

  • हा उत्सव निसर्गाचा आहे. पौैष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात.
    या दिवशी सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो थोडा थोडा उत्तरेकडे सरकायला लागतो. म्हणून या काळाला ‘उत्तरायण’ म्हणतात.
  • सांस्कृतिक दृष्टीने विचार केला तर लक्षात येते की सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणदेखील जोडलेले आहे. म्हणून या उत्सवाचे आगळेवेगळे महत्त्व आहे.
  • आपली संस्कृती- ‘तमसो मा ज्योतिर्गमय’…. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी.
    योग तत्त्वज्ञानाप्रमाणे सूर्याला कर्मयोगी मानतात. तो स्वतःच्या क्षणिक प्रमादाला झटकून अंधःकारावर आक्रमण करण्याचा या दिवशी दृढ संकल्प करतो. ही कल्पनाच किती हृदयगम्य वाटते. या दिवसापासून अंधार कमी कमी होत जातो व उजेड वाढत जातो. शास्त्रकार म्हणतात की देवसुद्धा या दिवशी झोपेतून जागतात. या दिवसापासून चांगल्या कामांना सुरुवात करतात.
    आता आपण केव्हा आळस टाकून कामाला लागू ते बघुया. तशी आपण उदरनिर्वाहासाठी विविध कामे नियमित करतोच आहोत. नाहीतर उपास पडणार, रस्त्यावर येणार. पण इथे अभिप्रेत आहे तो संदर्भ म्हणजे ज्ञान मिळवण्याचे काम व तेही आध्यात्मिक.
  • धार्मिक दृष्टीने विचार केला तर कळेल की हिंदू मकर संक्रांतीनंतर स्वतःला मृत्यू यावा अशी इच्छा ठेवतात. भीष्म पितामह यांची गोष्ट सर्वाना माहीतच आहे. ते शरपंजरी- बाणांच्या शय्येवर होते. इच्छामरणी होते. यमराजालासुद्धा त्यांनी म्हणे उत्तरायणापर्यंत थांबवून धरले. तदनंतरच त्यांनी प्राणत्याग केला.
  • पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात की गीतादेखील सांकेतिक भाषेत हीच गोष्ट समजावते- ‘‘अग्नी, ज्योती व प्रकाश यांनी युक्त गती म्हणजेच शुभ गती आणि धुसर अंधाराने युक्त गती म्हणजे कृष्णगती. या दृष्टीने पाहता उत्तरायणात मृत्यूची आकांक्षा म्हणजे तेजस्वी व प्रकाशमय मरणाचा जप. धुरासारखे काळे व अंधकारासारखे भयदायक जीवन माणसाला निकृष्ट मृत्यूकडे ओढून नेते.
  • मानवी संस्कृतीप्रमाणेदेखील या उत्सवावर विचार केला तर लक्षात येते – मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधःकारावर विजय. मानवाचे जीवनही अंधःकार व प्रकाश यांनी वेष्टिलेले आहे. आजच्या दिवशी आपणही संक्रमण करण्याचा शुभसंकल्प करावयाचा असतो. मानवाच्या जीवनात विविध तर्‍हेचे अंधकार म्हणजे – अज्ञान, भ्रम, अंधश्रद्धा, जडता, कुसंस्कार- म्हणून मानवाने – अज्ञानाला ज्ञानाने, भ्रमाला विज्ञानाने, अंधश्रद्धेला सम्यक श्रद्धेने, जडतेला चैतन्याने, कुसंस्काराला संस्कार सर्जनाने दूर हटवायचे आहे.
    शास्त्रीजी म्हणतात की मानवाच्या जीवनातील हीच खरी संक्रांत म्हटली जाईल कारण संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाची आकांक्षा असते तर संक्रांतीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापण्याची अभिलाषा असते. म्हणून केवळ बाहेरील संदर्भ नाहीत तर मनाचे संकल्पदेखील बदलण्याची अपेक्षा असते. म्हणूनच विचारक्रांती हवी असते.
    क्रांतीमध्ये हिंसेला स्थान असते पण संक्रांतीमध्ये समजदारीचे साम्राज्य पसरलेले असते. सर्व विश्‍वांत वेळोवेळी अनेक देशात रक्तरंजित क्रांत्या झाल्या. मग त्या स्वार्थापोटी असू देत अथवा राजकारणामुळे असू देत किंवा अन्य कारणामुळे असू देत. पण एक गोष्ट नक्की की त्यामुळे कुणाचेही दीर्घकाळ कल्याण झाले नाही.
    संक्रांतीत विश्वकल्याण अभिप्रेत आहे कारण त्यांत ‘अहिंसा’ आहे. अहिंसा म्हणजे ‘प्रेम करणे- मनाने, बोलाने, कृतीने कुणालाही दुखवायचे नाही किंवा इजा करायची नाही’. याचे मूळ कारण म्हणजे इथे धडापासून मस्तक वेगळे करणे नाही तर मस्तकात असलेले नकारात्मक विचार बदलणे. मानवी जीवनाचे ध्येय हेच आहे.
    आजच्या जगात प्रत्येक मानवाचा संग आहे तो त्याच्या मनात असलेल्या षड्‌रिपुंशी – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार. त्यांच्या संगापासून दूर राहण्यातच प्रत्येकाचे कल्याण आहे. म्हणून ती ‘संगक्रांती’देखील आहे.
    शास्त्रकार म्हणतात-
    संगः सर्वात्मना हेय स् चेत् त्यक्तुं न शक्यते |
    स सद्धिः सह कर्तव्यो साधू-संगो हि भेषजम् ॥
    ‘‘सर्वच प्रकारचे संग सोडले पाहिजेत पण ते जर शक्य नसेल तर चांगल्या माणसाशी संग राखला पाहिजे. कारण सत्संग हे जीवनाचे औषध आहे.’’
    कुसंगतीमुळे माणसाचे अधःपतन होत जाते. महाभारतातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कर्ण. तो तर विविध गुणांनी अलंकृत होता. पण धृतराष्ट्र, शकुनी, दुर्योधन व दुःशासन या दुष्ट, स्वार्थी चांडाळांच्या संगतीमुळे अधोगतीला गेला.
    ह्याउलट रामायणातील वाल्या कोळी महर्षी नारदाच्या संगतीत आला व स्वतः महर्षी वाल्मिकी झाला. आपल्या इतिहासात व संस्कृतीत अशी अनेक उत्तम उदाहरणे आहेत.
    प.पू. पांडुरंगशास्त्री म्हणूनच म्हणतात, की हळुहळू प्रत्येकाने मुक्तसंग बनायला हवे. म्हणजे मुक्त जीवनाच्या लोकांचा संग केला पाहिजे. असे जीवनमुक्त लोकच आपल्या क्रांतीला योग्य रस्ता, दिशा दाखवू शकतात. ते आपले उत्कृष्ट मार्गदर्शक होऊ शकतात.
    जगात विविध प्रकारचे संघ आहेत, संघटना आहेत. कारण कुठल्याही विधायक कार्यासाठी संघटना आवश्यक असते. आणि आजच्या कराल काळात, घोर कलियुगात ही शक्ती अत्यावश्यक आहे म्हणून जाणकार म्हणतात-
  • संघे शक्ती कलौ युगे|’
    एकटी व्यक्ती कितीही शक्तिमान व समर्थ असली तरी तिला संघ हा आवश्यकच असतो. कारण तिच्या शक्तीला मर्यादा असते. प्रत्येक मानवाकडे विविध कर्तृत्वशक्ती असतात. संघ केल्यामुळे त्या सर्व एकत्रित होतात म्हणून कसलेही कठीण कार्य करणे सहज शक्य होते.
    पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात की – * संघनिष्ठेच्या पायात ज्वलंत प्रभुनिष्ठा असली पाहिजे- हे विसरू नये. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित)