- डॉ. सीताकांत घाणेकर
ज्या मानवावर- सृष्टिकर्त्याच्या उत्कृष्ट कलाकृतीवर – विश्वास ठेवून त्याने विश्व त्याच्या स्वाधीन केले, त्या विश्वाचे त्याने नंदनवन करायचे सोडून नरक बनवले. निदान भारतीयांनी तरी ही गोष्ट समजायला हवी. कारण आपली संस्कृतीच विश्वाला पोषक आहे. निसर्गप्रेमी व पूजक आहे.
भारतीय संस्कृती किती व कशी विस्तारित, गूढ आहे; तसेच प्रत्येक सणाच्या मागे किती उच्च तत्त्वज्ञान आहे याबद्दल विचार, त्याचा अभ्यास व चिंतन करता करता आपण चातुर्मास या विषयापर्यंत पोचलो आहोत.
आषाढ शुद्ध एकादशीला देव झोपतो व चार महिन्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीला उठतो. ही कल्पनाच हृदयगम्य आहे. या चार महिन्यांत पाऊस येतो, पीकं येतात, सृष्टी सुंदर टवटवीत होते… म्हणजे वर्षाच्या बारा महिन्यातील हा काळ अत्यंत महत्त्वाचा!
भगवंत झोपतो या संकल्पनेवर आपण सखोल चिंतन करीत आहोत. याबद्दल आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करतो.
आपणही नियमित वेळी झोपतो व उठतो. ही आपली दिनचर्या आहे. पण त्याशिवाय काही कारणांमुळेही आपण झोपतो…
१. आपण दूरच्या प्रवासाला जातो. आपल्या गाडीचा ड्रायव्हर अनुभवी असतो. तो गाडी व्यवस्थित चालवणार याची आम्हाला खात्री असते. म्हणून आम्हाला झोप येते आणि आपण शांत झोपतो, याचे कारण म्हणजे वाहनचालकावरचा विश्वास. तोच जरा नवा, अननुभवी ड्रायव्हर असेल तर आम्हाला झोप लागणार नाही. आपले लक्ष रस्त्याकडेच असणार.
पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात – ‘‘अविश्वास भय निर्माण करतो आणि भय जागरण भेट देते. विश्वास शांती निर्माण करतो आणि शांती निद्रा भेट देते. सुयोग्य संततीवरील विश्वासाने बाप शांतपणे झोपू शकतो. त्याचप्रमाणे मानवावरील विश्वासाने निश्चिंत बनून भगवान जर झोपत असेल तर हे मानवाचे परम भाग्य समजले पाहिजे.’’
किती खरे आहे हे! पण आपण चौफेर विश्वाकडे नजर फिरवली तर वेगळेच भयानक दृश्य दिसेल. ज्या मानवावर- सृष्टिकर्त्याच्या उत्कृष्ट कलाकृतीवर – विश्वास ठेवून त्याने विश्व त्याच्या स्वाधीन केले, त्या विश्वाचे त्याने नंदनवन करायचे सोडून नरक बनवले. निदान भारतीयांनी तरी ही गोष्ट समजायला हवी. कारण आपली संस्कृतीच विश्वाला पोषक आहे. निसर्गप्रेमी व पूजक आहे.
आपल्या उच्च संस्कृतीकडे नजर टाकली तर काय दिसते?
आपले ऋषी-महर्षी यांचे आश्रम अगदी घोर जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात होते. पंचमहाभूते – पृथ्वी, जल, वायू, अग्नी (तेज), आकाश यांचे महत्त्व त्यांना ज्ञात होते. त्यांची ते पूजा करीत.
वृक्ष- वनस्पती आम्हाला काय काय देतात – फुले, फळे, लाकूड, प्राणवायु, औषधी… यांची नोंद ते घेत असत. मुख्य म्हणजे अगदी निःस्वार्थ भावाने. त्यांच्याशी ते प्रेमाने वागत. त्यांचे अनेक गुण ते आपल्या जीवनात आणीत.
भगवंताचे इतर लेकरे- जीवजंतू, कृमीकीटक, पशु, पक्षी, प्राणी – यांचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले होते. आपण त्यांच्यावर कसे अवलंबून आहोत हेदेखील त्यांना ज्ञात होते. त्यामुळे अनेक हिंस्त्र पशुदेखील आश्रमात सर्वांबरोबर प्रेमाने राहात असत.
अशा गोष्टी ऐकल्या किंवा आश्रमातील चित्रे बघितली तर सहसा विश्वास बसत नाही. पण इतिहास साक्ष आहे. स्वामी योगानंद म्हणे वाघावर बसून फिरत होते. तसेच रमण महर्षी, महान योगी चांगदेव आणि आता बाबा आमटे यांच्या आश्रमातही तसेच दृश्य दिसते.
जनावरांना, पशुपक्ष्यांना हृदयापासून प्रेम दिले की तेदेखील नम्र होतात. पाळीव जनावरांचा आपल्याला अनुभव आहेच.
- आपल्या संतमहापुरुषांनी या सर्वांचा उपयोग केला कारण ते नैसर्गिक आहे. पण निसर्गाशी स्पर्धा केली नाही. त्याचा प्रेमाने सांभाळ केला.
- अस्त्रे- शस्त्रे त्यावेळीदेखील होती. पण त्यांचा उपयोग दुष्टांना शासन करण्यासाठीच केला. दुर्भाग्याने अश्वत्थामा अपवाद आहे. पण त्याला त्याची भयानक शिक्षा झाली कारण त्याचे कृत्यच महाभयंकर होते. आणि आज आपली अस्त्रे शस्त्रे आपण कशी वापरतो हे सर्वांनाच ठाऊक आहे.
या विषयावर चिंतन केले की अनेकवेळा वाटते- भगवंताने हा कोरोना-१९ विषाणू त्यामुळेच पाठवला असेल का? मानवाला सर्व पैलूंनी धडा शिकवायला?
‘‘हे मानवा, तू कितीही हुशार असलास, बलाढ्य झालास तरी निसर्गाशी खेळू नकोस. तुझा नाश होईल.’’
आपण योग्य अभ्यास, चिंतन व आचरण केले; आम्हाला शहाणपणं आलं तर आपणदेखील देवाचे लाडके होऊ, विश्वासपात्र होऊ. मग देव आपल्यावर विश्वास ठेवून शांतपणे झोपेल. - शास्त्रीजी एक मजेदार विचार मांडतात – ‘‘काही वेळा दुसर्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी माणूस झोपी जातो. भिकारी किंवा फंड- वर्गणी जमा करणारे लोक येतात तेव्हा पुष्कळवेळा माणूस त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी जाणून बुजून झोपी जातो.’’
‘‘शंकर कैलासात निघून गेले व विष्णू क्षीरसागरात झोपले ते अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तर नाही ना! भगवंताच्या मंदिरात लहान-मोठ्या लोकांची जी गर्दी होते, ती सर्वच मागणार्यांचीच असते. भगवंताजवळ काही मागणे यात काही वाईट नाही. मागणार्याला भगवान देतोही. पण भगवंताला आनंद तेव्हाच होतो जेव्हा कोणी त्याला निरपेक्षरीत्या भेटायला येतो अथवा स्वतःच्या कर्माची फळे भगवंताच्या चरणांवर अर्पण करायला येतो.
आता हा विचार जरी मजेशीर वाटला तरी त्यात सत्यता आहे. आपणातील बहुतेकजण मागण्यासाठीच त्याच्या दर्शनाला येतात. भगवंतालाही तेव्हाच आनंद होईल जेव्हा एखादा ज्ञानी भक्त त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जाईल व म्हणेल – ‘‘देवा मी खूप प्रयत्न केले पण शेवटी तुझ्या कृपेमुळेच मला प्राप्ती झाली अथवा माझे कल्याण झाले. तुझा मी ऋणी आहे. अशीच तुझी कृपादृष्टी माझ्यावर सतत असू दे.’’
अर्थात आईकडे मागायचे नसते कारण आईच ती जी न मागता देते. तरीही आपण कर्तव्यापोटी मागायचं जरूर. मागितलेलं मिळालं तर आनंदच आहे. अन्यथा म्हणायचे की माझ्या प्रारब्धात नव्हते तर मिळणार कसे? पण मी माझे प्रयत्न ईश्वराला स्मरून आणि साक्षी ठेवून चालूच ठेवणार.’’
आपण असे केले तर आपली मनःशांती टिकून राहते.
- शास्त्रीजी आणखी एक वेगळा दृष्टिकोन समोर ठेवतात. ‘‘सहकार्याच्या अभावामुळेसुद्धा माणूस झोपी जातो. माणसाला खेळण्यासाठी साथीदार पाहिजे. दिवसा झोप येऊ नये म्हणून स्त्रिया एकत्र येतात व वेगवेगळे खेळ खेळतात. कोणी खेळायला नसेल तर झोप येणे स्वाभाविक आहे. उपनिषद सांगते, ‘न एकाकी रमते.’ एकटा माणूस खेळू शकत नाही’’.
सृष्टीच्या सुरुवातीला भगवान एकटा होता. अद्वैतात अस्तित्व असते तर द्वैतात खेळ असतो. - एकोऽहम् बहुस्याम् प्रजायेय|
- मी एक आहे त्याचे अनेक होऊ अशी इच्छा करून प्रभूने सृष्टी निर्माण केली भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीतील जीव परस्पर एकमेकात खेळू लागले व भगवंताला विसरले. त्यामुळे भगवान पुन्हा एकाकी पडले. त्याच्याशी खेळणारा कोणी एखादा पुरुष युगायुगात सापडतो. तोपर्यंत सतत दुसर्यांचे खेळ पाहात राहिलेला भगवान वर्षात चार महिने झोपी गेला तर ते अस्वाभाविक म्हणता यायचे नाही.’’
हा दृष्टिकोन सरळ, साधा वाटला तरी इथे जीवनातील उच्च तत्त्वज्ञान दृष्टीस पडते. आम्हालासुद्धा साधा कसलाही खेळ खेळण्यासाठी योग्य सहयोगी लागतो. भगवंताचा खेळ काय, कसा असेल याबद्दल कल्पनादेखील आपण करू शकणार नाही. तो खेळ ज्ञात असलेला महापुरुष मिळणे पुष्कळ कठीण वाटते.
त्याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाचे विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत.- द्वैत- अद्वैत – विशिष्टाद्वैत. आपल्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी यावर आपले वेगवेगळे विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत.
असा हा चातुर्मासाचा अभ्यास केला व वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेतले तर या चार महिन्यात साजर्या केलेल्या विविध सणांची मजा साधक वेगळ्या तर्हेने अनुभवू शकतील. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे पुस्तक – संस्कृती पूजन)