आरोग्य हीच धनसंपदा

0
40
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज, पणजी

आयुर्वेद शास्त्रानुसार जेवण बनवताना त्यावर वारा व सूर्याच्या प्रकाशाचा स्पर्श झाला पाहिजे. जास्तीत जास्त प्राणवायू आहारीय पदार्थांद्वारे आपल्या शरीरात जावा, यासाठी उघड्या भांड्यात अन्नपदार्थ शिजवावेत.
प्रेशर कुकर व रेफ्रिजरेटर या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अहितकर आहेत.

‘वसूबारस’ म्हणजेच ‘गोवत्स द्वादशी’नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस ‘धनत्रयोदशी’, ज्याला ‘धनतेरस’देखील म्हटले जाते. अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशी साजरी करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात.
ज्यावेळी इंद्रदेवाने असुरांसमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर सागरातून अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकटले म्हणून धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवसाला ‘धन्वंतरी जयंती’ असेही म्हटले जाते.
धन्वंतरी म्हणजेच विष्णूचा अवतार. वेदांमध्ये निष्णात, मंत्रतंत्राचे जाणकार. देवांना अमरत्व प्राप्त होण्यासाठी सर्व औषधांचे सार ‘अमृत’ घेऊन धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर येतात. त्यांच्या एका हातात शंख, चक्र, जलौका व औषधीयुक्त घट आहे. म्हणूनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटले आहे. तिन्हीसांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

दुसरी कथा ः हेमराजाचा सुपुत्र वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा-राणी फार चिंतित असतात. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुखं उपभोगावीत आणि तो दीर्घायू व्हावा अशी त्यांची इच्छा असते. राजपुत्राचा विवाह करण्यात येतो. भविष्यवाणीप्रमाणे विवाहाच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यू निश्‍चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपू देत नाही. संपूर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या भरपूर मोहरा ठेवल्या जातात. यमराज ज्यावेळी सापाचे रूप घेऊन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्यांचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे ते यमलोकात परत जातात. राजपुत्राचे प्राण वाचतात. या दिवसाला ‘यमदीपदान’ असेही म्हटले जाते.

दोन्ही कथा या आरोग्याशीच निगडित आहेत. म्हणजे धनरूपी आरोग्याला जपावे हाच संदेश धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी देवता देते. म्हणूनच धन्वंतरी जयंती दिवशी २०१६ पासून ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
धनापेक्षाही मौल्यवान अशा आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद शास्त्रातील काही सूत्रे जाणून घेऊन आचरण केल्यास निरोगी दीर्घायू प्राप्त होईल.
आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनाचा विचार करता निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद शास्त्र हेच उत्तर आहे. त्यामुळे आयुर्वेदामधील भरपूर सूत्रांपैकी काही महत्त्वाची सूत्रे जाणून घ्या व त्याचे आचरण करा.

  • प्रेशर कुकर व रेफ्रिजरेटर या दोन वस्तू आज प्रत्येक घरातील अगदी जीवनावश्यक वस्तू बनलेल्या आहेत. अगदी श्रीमंतापासून तर गरिबातील गरीब व्यक्ती या दोन वस्तू घेण्याचा प्रयत्न करते. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अहितकर आहेत.
    आयुर्वेद शास्त्रानुसार जेवण बनवताना त्यावर वारा व सूर्याच्या प्रकाशाचा स्पर्श झाला पाहिजे. जास्तीत जास्त प्राणवायू आहारीय पदार्थांद्वारे आपल्या शरीरात जावा, यासाठी उघड्या भांड्यात अन्नपदार्थ शिजवावेत. प्रेशर कुकरमधील जेवण वाफेवर तुटतं, शिजत नाही.

स्वयंपाक बनवण्यासाठी तांबा, पितळ, लोह यांसारख्या धातूंचा वापर करावा नाहीतर सगळ्यात उत्तम मातीची भांडी. ऍल्युमिनिअमचा वापर करू नये. हा धातू स्लो-पॉयझनसारखे कार्य करतो. अस्थमा, टी.बी., मधुमेह, कर्करोग यांसारख्या दुर्धर व्याधी या ऍल्युमिनिअमच्या व कुकरच्या वापरातून उत्पन्न होतात.

  • तीच गोष्ट रेफ्रिजरेटरची. यात ना वायू जातो ना सूर्यप्रकाश. त्याचप्रमाणे हा अशा गॅसच्या वापराने बनतो, ज्या गॅसेस क्लोरो-फ्लोरो-कार्बन (सीएफ्‌सी) आपल्या शरीरास अत्यंत घातक असतात. म्हणून फ्रीजमधील पाणी पिऊ नये. फ्रीजमधील अन्न खाऊ नये.
  • थंड पेयेसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. त्यापेक्षा फळांचे रस प्यावेत. फळे खावीत.
  • फळांमध्ये दूध घालून खाऊ नयेत. तो विरुद्धाहार बनतो.
  • मधुमेही किंवा इतरही स्वस्थ व्यक्तींनी भात कुकरमध्ये न बनवता माती किंवा तांब्या/पितळीच्या भांड्यात चांगले सोळापट पाणी घालून शिजवून, गाळून, मोकळा करून सेवन करावा. असा भात आरोग्यास हितकर आहे.
  • जेवणात मिठाचा वापर करताना सैंधव मिठाचा वापर करावा. उपवासालासुद्धा सैंधव मिठाचाच प्रयोग सांगितला आहे. समुद्री मिठाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी-जास्त असणार्‍या रुग्णांनी सैंधव मिठाचा नियमित वापर करावा.
  • अवेळी जेवण टाळावे. सकाळी दहा ते बारा या दरम्यान व रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या वेळेतच घ्यावे. सद्य स्थितीचा विचार करता रात्रीचे जेवण हे रात्री नऊ वाजण्याच्या आतच सेवन करावे.
  • जेवण गरम असताना, स्वयंपाक केल्यावर एका तासाच्या आतच सेवन करावे.
  • जेवण व्यवस्थित चावून चावूनच, मुखातील लाळ भोजनामध्ये मिसळली जाईल अशा प्रकारे सेवन करावे.
  • खूपसे आजार हे शिळे अन्न सेवन केल्याने होतात आणि आता बर्‍याच महिला या कामानिमित्त बाहेर जातात त्यामुळे जेवण फ्रीजमध्ये ठेवणे, रात्रीच बनवून ठेवणे अशा गोष्टी सर्रास घडतात. पण जरा गांभीर्याने विचार केल्यास लक्षात येईल- आपण जो पैसा कमावतो, त्याने जर आजारच निर्माण होत असतील तर थोडे लवकर उठून ताजं अन्न शिजवून खायला काहीच हरकत नाही, जेणेकरून लवकर उठल्याने आपले आरोग्य चांगले राहील व शिळं अन्नही खावं लागणार नाही.
  • अजीर्ण झाले असता परत आहार सेवन करू नये.
  • जेवताना मन व चित्त शांत असावे.
  • शरीराचे जे प्राकृतिक वेग असतात उदा. मल, मूत्र, शिंका, जांभई.. इ. यांचे धारण करू नये.
  • पाणी पिण्याचे नियम लक्षात ठेवावे. जेवल्यानंतर पाणी पिणे हे विषाप्रमाणे असते. जेवल्यानंतर कमीत कमी दीड तासानंतर पाणी प्यावे. जेवताना मधे- मधे थोडे थोडे पाणी प्यावे. पाणी नेहमी उकळून प्यावे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. दुपारी झोपू नये. रात्री उशिरा झोपू नये. जेवल्यावर लगेच झोपू नये. दुपारी जेवल्यावर शतपावली करावी. शारीरिक श्रम करणार्‍यांनी कमीत कमी आठ तास झोपावे.
    अशा प्रकारची काही आयुर्वेदीय सूत्रांचे आचरण करून दिनचर्या, ऋतुचर्या, स्वस्थवृत्तादी सूत्रांचे पालन करून आरोग्य संपादन करण्याचा प्रयत्न करावा.