– डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून त्यांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले आहे. मराठवाड्याच्या मौखिक आणि लिखित परंपरेचे सत्त्व शोषून घेणारी ही कविता…
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून त्यांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले आहे. साठोत्तरी मराठी कवितेने आपला चेहरा-मोहरा बदलला. नव्या संवेदनशीलतेची कविता या काळात जन्मास आली. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ‘नवे कवी… नवी कविता’ ही माला सुरू केली. कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा या मालेतील पहिला कवितासंग्रह. दुसरा ना. धों. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह. रान-शिवाराची चैतन्याने ओथंबलेली कविता म्हणून तिचा सर्वत्र बोलबाला झाला. बालकवी, बा. भ. बोरकर, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर आणि भालचंद्र लोवलेकर यांच्या निसर्गकवितेशी नाते सांगणारी ही कविता… मराठवाड्याच्या मौखिक आणि लिखित परंपरेचे सत्त्व शोषून घेणारी ही कविता… कृषिसंस्कृतीमधील कष्टाळू हातांनी जमिनीची निगुतीने मशागत केली आणि दुसरीकडे मराठी कवितेच्या प्रांतात अक्षरसंपन्न क्षितिज तिने निर्माण केले. समकाळातील कवी-कवयित्रींनी तिच्याकडे अवाक् होऊन पाहिले… एवढेच नव्हे, कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज यांसारख्या कवींनी तिचे भरभरून कौतुक केले. बा. भ. बोरकर यांनी ‘सत्यकथा’मधून ‘रानातल्या कविते’ला मुक्त मनाने दाद दिली. तिची बलस्थाने अधोरेखित केली. प्रारंभीच्या काळात असा पाठीवरचा हात उमलत्या प्रतिभेला कसा आवश्यक असतो, तो किती पोषक ठरतो हे या कवीने दाखवून दिले. त्याची कविता शुक्लेन्दुवत् वर्धिष्णू राहिली. ‘ऐसी कळवळ्याची जाती’मधून आपल्या जीवनप्रवासात आणि काव्यप्रवासात भेटलेल्या ‘माणसां’ची व्यक्तिचित्रे महानोरांनी तन्मयतेने रेखाटली आहेत. त्यांच्या दृष्टीने आयुष्याचा अमृतमहोत्सव हा मागे वळून पाहण्याचा कालखंड आहे. रसिकांच्या दृष्टीने अर्धशतकाहून अधिक काळ मराठी कवितेला या कवीने गर्भश्रीमंत कसे बनविले याचे अवलोकन करण्याचा आहे. कविमन आणि रसिकमन यांची गळामिठी या प्रदीर्घ कालखंडात पडलेली होती.
अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे छोटेसे गाव… त्या काळात दीड हजार लोकवस्तीचे… शेत-शिवाराचे… अजिंठ्याला चिरकालीन अक्षरशिल्प आहे. महानोरांनी आपल्या अक्षरांनी असेच चिरस्मरणीय शिल्प घडविले. पळसखेडची लोकगीते त्यांनी जिव्हाळ्याने संकलित केली. ‘पळसखेडची गाणी’ त्यांनी आईला अर्पण केली. या अर्पणपत्रिकेत मिताक्षरांत महानोर सांगून जातात ः
आईसाठी
तुझी पुण्याई माझ्या शब्दांना सायीसारखी
– या शब्दांना स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. आईविषयीची कवीची कृतज्ञतेची भावना ओथंबून आलेली. ‘रानातल्या कविता’मध्ये १९६० ते १९६६ मधील चौसष्ट कविता आहेत. त्यांना शीर्षके नाहीत. या सगळ्या कवितांत संपृक्त आशयाने भरून आलेले कविमन हे रान झालेले आहे. यातील पहिला उद्गार स्व-हस्ताक्षरामधून आलेला आहे ः
ह्या शेताने लळा लाविला असा असा की,
सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो.
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
ही कवीच्या अंतरात्म्यातील मंत्राक्षरे आहेत. एकदा का ती मर्मदृष्टीने समजून घेतली तर त्याच्या कवितेची कळ आकळते. त्यांच्या प्रतिभेचा सर्वांगस्पर्श या सर्व कवितांना झालेला आहे. महानोरांचे आपल्या भूमीविषयीचे उत्कट ममत्व, कृषिजीवनाविषयीचा जिव्हाळा, या दोहोंशी एकरूप होता होता निःसीम निष्ठेने केलेली अक्षरसाधना, त्यातून निर्माण झालेली अनोखी प्रतिमासृष्टी आणि उत्कट प्रेमानुभूतीचे विभ्रम या सर्वांच्या संयोगाने त्यांची काव्यसृष्टी फुली फुलून आलेली आहे. ‘रानातल्या कविता’मधील क्र. २ च्या कवितेत प्रारंभीच महानोर उद्गारतात ः
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.
कृषिसंस्कृतीतील समृद्धी पाहून कविमनात असीम सुखाच्या लडीमागून लडी उलगडल्या जातात. अटळ आशय मग अभिव्यक्त होतो.
क्र. १३ च्या कवितेत निसर्गानुभूती आणि प्रेमानुभूती यांचे अद्वैत आढळते ः
नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे
बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे
आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना
माघातले ऊन झेलताना अंग झाले निळेभोर
पाणमळ्यातील शेलाट्या वेलींचे नव्याने उभार
कोण्या बसंतीचे पाऊल लचके इथे चंद्रगौर
डोळ्यात फुलांच्या राजसपणाचा झडे शिणगार
कुसुंब्या रात्रीची स्वप्ने वेटाळून होते फुलवण
नदीकाठावर शब्दांत बावरे लयवेडी धून
चित्रदर्शी प्रतिमांनी भरगच्च झालेली ही विश्रब्ध सृष्टी आहे. तिचे तपशील अधोरेखित करणे ही कठीण बाब. क्र. १५ मधील नितान्त रमणीय क्षणचित्र या दृष्टीने लक्षणीय वाटते ः
फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणा कुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
खरे पाहता सलग, अभिन्न अनुभूतिविश्वाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण कविता वाचायला हवी. तिचा रसास्वाद आकंठ घ्यायला हवा.
क्र. १६, १७, १८, १९, २०, २१, २४, २५, २६, २७, २९, ३०, ३१, ३२, ३४, ३५, ३६, ३९, ४५, ५० च्या कवितांमधील सौंदर्यानुभूतीचे दर्शन मुळातून घ्यायला हवे. या कवितांमधील शब्दकळेचे माधुर्य, रसमयता, प्रतिमासौंदर्य आणि अल्पाक्षररमणीयत्व चित्तवृत्ती प्रसन्न करून जातात.
क्र. ४८ मधील निसर्गानुभूतीचे चित्र रेखाटताना कवी तन्मय झालेला आहे ः
पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.
क्र. ५५ च्या कवितेतील आत्मभाव, आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी विलोभनीय झालेला आहे ः
रान हासे अंकुरातुन चंद्रलेणे सांडले
अन् कुणाचे पाहताना भागलेती डोळुले
लाख प्राणांची रिणाई बोलता ओथंबली
एक भोळी शब्दगाथा आरतीने व्यापली
झेलताना दान ऐसे नम्र झाल्या ओंजळी
मृत्तिकेच्या चंदनाची रेघ भाळी वंदिली
क्र. ५ च्या कवितेतील
अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो
या ओळीत कविमनातील कृतकृत्यता जाणवते. कवितेवरील निःसीम निष्ठा जाणवते.
क्र. ६ मध्ये मात्र वास्तव सृष्टीचे भयाण चित्र कवीने उभे केलेले आहे. कविमनातील समाजसन्मुख वृत्ती आणि कारुण्यभाव यांचे दर्शन येथे घडते. त्यांच्या ’प्रार्थना दयाघना’ या संग्रहात, तसेच ‘पानझड’ या संग्रहात या वृत्तीचा परिपोष झालेला आढळून येतो. ‘अजिंठा’, ‘गाथा शिवरायाची’, ‘तिची कहाणी’, ‘जगाला प्रेम अर्पावे’ आणि ‘गंगा वाहू दे निर्मळ’ असे त्यांचे अन्य कवितासंग्रह. त्यांतील अनुभूतिविश्वही निराळे. ‘पुन्हा कविता’ आणि ‘पुन्हा एकदा कविता’ हे समकालीन कवितांचे दोन प्रातिनिधिक संग्रह त्यांनी संपादित केले आहेत.
‘वही’ या महानोरांच्या कवितासंग्रहात ६० कविता आहेत. काही अपवाद वगळता यातील कविता अल्पाक्षरी आहेत. ‘रानातल्या कविता’ या संग्रहातील कवितांप्रमाणे या संग्रहातील कवितांमध्ये निसर्गानुभूती आणि प्रेमानुभूती यांचे दर्शन घडते. काही कवितांत शृंगारानुभूतीचे दर्शन घडते.
निसर्गानुभूतीचे चित्रण करताना महानोर उद्गारतात ः
रुजे दाणा दाणा
ज्येष्ठाचा महिना
मातीतला
गंध ओला
चौखूर दिशांना
पाखरांचे पंख, आम्हा
आभाळ पुरेना (क्र. १)
चित्रमय शैलीत आसमंत व त्यातील विभ्रम रेखाटताना महानोर उद्गारतात ः
बगळ्यांच्या ढवळ्या माळा आभाळ गेल्या
तिच्या लालसर नखात मेंदी गोंदुन ओल्या
निळ्या नितळ डोळ्यांत सारखे नभ भरकटते
दूर नभाच्या पल्याड कुठले गाव नांदते (क्र. ८)
—————
जास्वंदीच्या फांदीवरले ऊन थरकते
थरकबिथरल्या पाण्यावरती तरंग होते
खडकावर चुकल्या बगळ्यापरि दुपार नुस्ती
उघड्यावरती शुभ्र मुलायम अंग घासते
शब्दांचा वेध घेत जीवन सौंदर्यपूर्ण करण्याचा जुना हव्यास कायम राहिलेला आहे ः
युगांचे वेध पायांना कधी संपू नये वाट
दिवे दूरात तेजाचे उरी आनंदले लोट
निळ्या स्वप्नात हसताना कुण्या हुलकीत बहरावे
असे शब्दांत गुरफटता नवे आकाश धुंडावे (क्र. ११)
निसर्गातील दृक्, रंग, नादयुक्त संवेदनांचे विश्व जागे करताना महानोर उद्गारतात ः
राघू उठून जाताना फांदी हले झुले
पानांतल्या थेंबांपाशी नभ उतरले
नभ उतरले गर्द जांभळीचे झेले
झुलणार्या फांदीपाशी पैंजण वाजले
गोरे भुरे पाय असे गाण्यात सांडले
झुलणार्या झाडासाठी राघू पुन्हा आले.
तरल, सुकुमार प्रतिमांची गुंफण क्र. १७ च्या कवितेत आढळते ः
थेंब गळे ऊन
पानांतून चंद्रबन
निळ्या सावळ्या मेघांचे
आभाळगोंदण
नभ आले घरा
चिंब झाडात शहारा
पक्षी उठून जाताना
थेंबांचा पिसारा
क्र. १८, २१, २५, ३१, ३२, ४९ या कवितांतील प्रतिमाविश्व निसर्गानुभूतीने ओथंबलेले आहे.
‘वही’ या कवितासंग्रहात प्रणयानुभूतीचे चित्र रेखाटणार्या अनेक कविता आहेत. यादृष्टीने क्र. २०, २३, २४, २६, २७, २८, ३३, ३४, ३५, ३६, ४६, ४७ आणि ४८ मधील आशय अधोरेखित करता येईल. शारीर-चित्रणाबरोबर कवीने येथे शारीर-मानसभाव काव्यात्म ढंगाने व्यक्त केले आहेत.
उदा.
पाऊसपाणी
चिंब निथळुनी
अंग अंग भिजलेले
घट्ट चोळीच्या गाठी रुतल्या
रुतून राजसझेले
गाठ उकलिता
हळु सावरता
मस्त झुलत मनमानी
तिच्या मनाचा मोर नाचतो
नाचत नभ मेघांनी
क्र. ५२ मधील शृंगारानुभूती लावणीच्या ढंगाने व्यक्त झाली आहे ः
राजसा
जवळि जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बाईऽ
कोणता करू शिणगार सांगा तरि काहीऽ
‘पावसाळी कविता’ या संग्रहात पर्जन्यानुभूतीविषयक ५० कविता आहेत. मराठवाड्यासारख्या पावसाचा अभाव असणार्या प्रदेशात राहूनही ना. धों. महानोरांनी आनंदानुभवाबरोबर दुःखाच्या असोशीला उद्गार दिलेला आहे. उदा. क्र. ५० मधील आशयाकडे लक्ष वेधावेसे वाटते ः
पीक करपले…
पक्षी दूरदेशी गेले
गळणार्या झाडांसाठी
– मन ओथंबले
पण क्र. ३५ मधील अनुभूतीचे रंगविश्व अनोखे आहे; त्यात आशेचे किरण आहेत ः
मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंबथेंबी
शिडकाव संथ येता पाने निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा
जीवनभर व्यापून राहिलेली सुख-दुःखाची छाया मानवी मनाला संत्रस्त करणारी. या विश्वव्यापक दुःखाला, जीवघेण्या वास्तवाला कवीने वाचा फोडलेली आहे ः
हे खेडे अंधाराचे
हे खेडे प्रकाशाचे
जन्मोजन्मी लक्तरलेले
दुःख घेऊन चालत आले.
मर्तिकाच्या दुःखापरीस
पांघर घालून आयुष्याची
लखलख उन्हात न्हाऊन धुवून
बरसातीला गाणे गाते.
हे खेडे मोरापरीस
मेघासाठी थिरकत जाते.
ढेकळांच्या गर्तेमधून
मृगामधले गाणे गाते
– माती नवा जन्म घेते. (क्र. ३३)
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन!