निवृत्तीचा काळ सुखाचा…

0
292
  • माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

जीवनात सर्वांनाच यशस्वी व्हावंसं वाटतं. यशासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची गरज असते. वेळीच आपल्यातील योग्यता, गुण व शक्ती ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच आपली कला, आवड विकसित होईल.

जॉगिंग ट्रॅकवर चालून पाच राउंड्‌स मारून मी पार्कमध्ये तिथेच एका बाकावर बसले. एक साठी उलटलेली स्त्री तिथे अगोदरच बसलेली होती. बर्‍याच दिवसांपासून मी त्यांना या पार्कमध्ये पाहात होते. अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरी जीवन हे असं असतं. कोण कुणाच्या अध्यात ना मध्यात! प्रत्येकजण आपापल्या कोशात गुरफटलेला. नाही म्हणायला ज्येष्ठ नागरिकांचे बरेच गट पार्कात फिरताना दिसायचे. पण या सालस बाई मात्र एकट्याच दिसायच्या. आज मात्र मी धाडस करून त्यांच्याशी बोलायचं ठरवलं.

‘‘नमस्कार मॅडम!’’
माझ्या बोलण्यावर त्या अचंबित झाल्या. कदाचित मी त्यांच्याशी बोलेन अशी त्यांना अपेक्षाच नव्हती.
‘‘नमस्कार, नमस्कार…’’ ओठांवर किंचित कृत्रिम स्मित आणून हात जोडत त्या म्हणाल्या.
‘‘मॅडम्, बर्‍याच दिवसांपासून मी या बाकावर तुम्हाला बसलेलं पाहतेय, म्हटलं आज तुमच्याशी ओळखच करून घ्यावी. कुठं नोकरीवगैरे करत होता?’’
‘‘हो. मी हायस्कूलची मुख्याध्यापिका होते. तीन वर्षे झालीयत रिटायर्ड होऊन’’
‘‘मुलं काय करतात? आपापल्या करिअरमध्ये, संसारात सेटल झाली असतील ना?’’
‘‘हो, मुलगा एम्.फार्म. होऊन लंडनला स्थायिक झालेला आहे. मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. स्वित्झर्लंडला एका नामांकित कंपनीत नोकरी करते. तिचे मिस्टर सी.ए. आहेत. त्यांचा स्वतंत्र….’’ ‘‘अरे व्वा! खूप छान’’, मी चांगलीच प्रभावित झाले.
त्यांनी माझा परिचय विचारला. मी माझ्या पूर्व नोकरीची माहिती सांगितली. सध्या मी रिटायर्ड झोनमध्ये आहे.

‘‘आणि सर कुठे असतात? ते काय करतात?’’ मी विचारले.
त्यांनी नकारार्थी मान हलवली व आकाशाकडे बोट दाखवले. त्यांचे डोळे पाणावलेले माझ्या नजरेतून सुटले नाहीत. मीही जास्त खोलात न शिरता कसाबसा विषय बदलला. ‘‘दोन्ही मुलं बाहेरच असतात, मग तुमचा वेळ कसा जातो?’’
‘‘वेळेचं काय? आता मी सेवानिवृत्त. वेळेचा धरबंध तो काय धरायचा? जीवनात आता उरलं काय? कशात मन रमवायचं? गत स्मृतीत मन रेंगाळतं.’’
त्यांचं नैराश्य शब्दाशब्दातून जाणवत होतं. शेवटी आम्ही दोघींनी एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर त्या महिलेविषयी माझ्या मनात विचारांचे काहूर दाटून आले होते.
नंतर साहजिकच वारंवार आमच्या भेटी होऊ लागल्या. गप्पा होऊ लागल्या. त्याही पूर्वीपेक्षा बोलण्यात उत्साह दाखवत होत्या. बोलता बोलता वृद्धाश्रमाविषयी बोलणं झालं. माझ्याबरोबर त्याही वृद्धाश्रमास भेट देण्यास आल्या. तेथील ज्येष्ठांच्या सुखदुःखात त्या समरस होऊ लागल्या. वारंवार वृद्धाश्रमात जाऊ लागल्या. वृद्धाश्रमातील अनुभवाने त्यांच्या जीवनात संजीवनाच निर्माण झाली. त्याच वृद्धाश्रमात त्यांची सल्लागार म्हणून स्वेच्छा नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निरस जीवनात आशेचे किरण आले.

अशा कितीतरी व्यक्ती हे मानणार्‍या आहेत की सेवानिवृत्त होणे म्हणजे जणु जीवनातील आनंदाला मुकणे. नकारात्मकतेच्या गर्तेत स्वत्व गमावणे. बरेच जण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ हा नकारात्मक चिंतनात व्यर्थ घालवतात. परिणामतः त्यांच्या जीवनातली ऊर्जा व्यर्थ जाते.

रिटायर्ड म्हणजे रि-टायर्ड… पुन्हा जीवनगाडीचे टायर नव्याने बसविणे व मानसिक संतुलन राखणे. आता जीवनास नव्याने सुरुवात करावी. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला भरपूर वेळ मिळतो. त्या वेळेचा योग्य कामात उपयोग केला तरच त्याला अर्थ आहे ना? ऑफिस वर्किंग अवर्स नसल्याने निवांतपणा मिळतो. (काही अपवादात्मक). तो वेळही घरकामात, सांसारिक जबाबदार्‍या निभावण्यात व्यतीत केला तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यात फरक तो काय राहिला?
निवृत्तीच्या काळात म्हणजे साठी उलटल्यानंतर हळुहळू शारीरिक दौर्बल्य येईल याची खंत वाटते. मानसिक ऊर्जेची गरज असते. सृष्टीनियमानुसार सर्व होईल. विनाकारण चिंता करून कोणीही समाधानी झालेला नाही. काळाच्या प्रवाहाबरोबर अशी दिवसरात्रीची अनेक ओली-सुकी पानं निघून जातात.

तारुण्य म्हणजे माणसानं मनानं मिरवायचा आणि काहीतरी मिळवायचा काळ. मला वाटतं जे तरुणपणी धावपळीत दैनंदिन रामरगाड्यात जे संकल्प, छंद शक्य झाले नाहीत त्याला वाट मोकळी करून देणं. आपल्याला जी गोष्ट मनस्वी आवडते, ज्यात आपलं मन रमतं ती अवश्य करावी. त्यामुळे मनोबल वाढतं व मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यास मदत होते. अर्थात घरातील इतरांना त्याचा जाच होणार नाही याची दक्षता घ्यावी.

साठीनंतरच्या काळात बहुदा माणूस अंतर्मुख होतो. अधिक अबोल व विचारी होतो. समवयस्क लोकांत मिसळावेसे वाटते तर कधी शांत, एकांतात बसावेसे वाटते. संध्याकालीन आयुष्याच्या खिडकीतून स्मृतींच्या कंगोर्‍यात शिरून स्थितप्रज्ञ व्हावे असा विचारही मनाला स्पर्श करून निसटतो. संध्याकालीन छायांचे कधी कधी मनात सावट निर्माण होते. अनामिक शांतीची स्पंदने निर्माण होतात. मनात असंख्य विचारांच्या वावटळी उठतात. आपल्याला आपली भूमिका चूक की बरोबर हे भय भेडसावते. परमेश्‍वराचा ध्यास लागतो. काही ज्येष्ठांना आध्यात्मिक क्षेत्रात रस वाटतो. तेव्हा दुर्लक्ष न करता अवश्य परमेश्‍वरी कार्यात चित्त रमवावे. आत्मचिंतन करता आलं पाहिजे. एका अर्थी भयमुक्त जीवन जगणे, मनाची शक्ती वृद्धींगत करणे हे परमेश्‍वरावरील सश्रद्ध भावावर अवलंबून आहे.

साठीनंतरचा काळ हा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा काळ म्हटलं तर ते प्रायः जास्त मुलभूत होईल. स्वतःसाठी स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा काळ. मुले सेटल झालेली असतात. मुख्य जबाबदार्‍यांतून माणूस मुक्त होतो. आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पुनःपुन्हा पाहण्यापेक्षा पुढच्या रस्त्याचा पक्का विचार करून कृती करावी.
आध्यात्मिक आवड असलेल्या व्यक्तींना जवळच्याच देवळात जाऊन भजन, आरतीत सहभागी होऊन अध्यात्मानंदाची अनुभूती घेता येते. तसेच देवळातील कमिटीत स्वेच्छेने सहकार्य देता येते. त्यामुळे आध्यात्मिक आनंदाची अवीट गोडी चाखता येईल.
मनाची आणि बुद्धीची चांगली मशागत करण्यासाठी वाचन आवश्यक असतं असं मी माझ्या कुमार वयात वाचलं होतं. उतरत्या वयात वाचन-लेखन करण्यात आपला वेळ सार्थकी लागतो. वाचनाइतके सामर्थ्य कशातच नाही हे आजही जाणवतं. पुस्तक हा आपला दोस्त बनतो. पुस्तकाचे मानवी जीवनातील महत्त्व कळून येतं. अवांतर वाचनामुळे विविध विषयाचे ज्ञान मिळते. संकटावर मात कशी करावी हेसुद्धा लक्षात येते. सकारात्मक पुस्तक अवघं जीवन समृद्ध करू शकतं. ‘ग्रंथ हेच गुरू’ या विधानाची प्रचिती येते. जुनी पुस्तकेही गठ्‌ठ्यातून उपसून काढणे… ती वाचताना वेळ कसा निघून जातो हे कळत नाही.

बागकाम करणे हाही निवृत्तीनंतरच्या काळात एक रचनात्मक कृती करण्याचा उत्तम छंद आहे. बागेची निगा राखताना जवळून निसर्गाच्या सान्निध्यात राहता येते असा दुहेरी फायदा होतो. रोपट्यांचे रोपण व संवर्धन होतं. शारीरिक, मानसिक समाधान लाभतं.
प्रातःकाळी फिरायला जा
आणि मोफत निरोगी व्हा

… हेच खरं. प्रातःकाळी फिरायला जाण्यामुळे प्रकृती सुधारते. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे क्रमप्राप्त आहे. ‘अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईझ.. मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज’ ही म्हण आचरणात आणावी.
आपले हात-पाय चालतात तोवर प्रवास करून घेतला तर एक वेगळीच उर्मी निर्माण होते. विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास मिळतात. वेगळ्या विचारसरणीच्या लोकांसोबत विचारांचे आदानप्रदान होते. अनुभवाच्या पोतडीत नाविन्यानुभवाची भर पडतो.

उगीचच निरर्थक गप्पाटप्पा करून, एकमेकांचे उणेदुणे काढून, वेळ वाया दवडण्यापेक्षा आपले छंद जोपासता येतात. छंदपूर्ती करण्यात उतार वयातच मुबलक वेळ मिळतो.

एका दृष्टीने निवृत्तीचा काळ हा आनंदाचा, सुखाचा असतो. आपली मुले करिअरमध्ये, संसारात स्थिरावलेली असतात. मग त्यात नको तिथे आपण ढवळाढवळ करण्यात काय अर्थ आहे? मुलांनाही विचारस्वातंत्र्य हवेच ना?
निवृत्तीत आपल्या मनाचा समतोल राखणे फार महत्त्वाचे. जे आपल्याला आवडेल, हितकारक असेल तेच करण्यात तथ्य आहे. इतरांना सुधारण्यात आपले जीवन खर्ची घालण्यात काहीच साध्य होत नाही. शक्य झाले तर स्वतःत परिवर्तन करणे योग्य ठरेल. जीवनातील आनंदाचे क्षण कधीच वाया घालवायचे नसतात. कारण आयुष्य हे क्षणभंगुर आहे. फुकटचे सल्लागार बनणे म्हणजे पुनः आपलीच फजिती करून घेण्यासारखे आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये. हे अनुभवाचे बोल अनुभवीच जाणती.

दिवसभरातील कामाचा ताण आणि शारीरिक दगदग यातून सुटका म्हणजेच निवृत्त जीवन असावे. अन्यथा निवृत्तीनंतर रामरगाड्यातच हित मानलं तर आरोग्यावर नकळत याचे दुष्परिणाम ओढवतात. एक दिवस मृत्युची मगरमिठी कधी बसेल सांगता सोय नाही. मग काय अपूर्णत्वातच जीवन संपले. राब राब राबणे म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट सफल होणे मुळीच नाही. स्त्रियांनी आज कितीही उच्च शिखरं गाठली तरी स्वयंपाकघर त्यांना चुकले नाही. परंतु त्यातून कधी, केव्हा, कसे बाहेर पडावे हे त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. हे ज्यांना कळले त्यांनी साधले म्हणायचे.

जीवनात सर्वांनाच यशस्वी व्हावंसं वाटतं. यशासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची गरज असते. वेळीच आपल्यातील योग्यता, गुण व शक्ती ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच आपली कला, आवड विकसित होईल.