>> पर्यावरणपूरक मतदान केंद्रे, पथनाट्यांचे आयोजन
गोवा विधानसभेच्या आज सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार्या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात मतदानाबाबत जनजागृतीसाठी ठिकठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रे आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी काल दिली.
राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मतदान केंद्रांची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. त्यात ११ पर्यावरणपूरक मतदान केंद्रांचा समावेश आहे. पणजी, कुडचडे, काणकोण आदी मतदारसंघांत पर्यावरणपूरक मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
राज्यभरात १०० गुलाबी (पिंक) मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, दिव्यांग अधिकारी व कर्मचार्यांकडून कामकाज हाताळली जाणारी मतदान केंद्रे आहेत. जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने मतदारांना हॉटेल बिलांमध्ये सवलत देण्यासाठी ७३ हॉटेलशी करार करण्यात आला आहे. प्रियोळ मतदारसंघात कुंकळ्ये येथील मतदान केंद्राला माटोळीेचे स्वरूप देण्यात आले आहे.