आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू विधानसभेची स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत दोन निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी केले आहे. भाजप व कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होणार असून सत्ता स्थापनेबाबत जनता दल सेक्युलर (एस) ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होणार असून १५ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांच्या ओपिनियन पोलनुसार २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेवर कॉंग्रेसला सर्वाधिक ९१ जागा मिळण्याची शक्यता असून त्या पाठोपाठ भाजपला ८९ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जनता दल सेक्युलर पक्षाला ४० जागा मिळण्याची शक्यता असून हा पक्ष किंग मेकर ठरेल असे या ओपिनियन पोलचे भाकीत आहे. ४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान हे ओपिनियन पोल तयार करण्यात आले असून आता निवडणुका झाल्यास सिद्दरामैय्या किंवा येडीयुरप्पा यांच्यापैकी कोणीही स्वबळावर सरकार स्थापू शकणार नाहीत. त्यासाठी ११२ ची संख्या त्याना गाठता येणार नाही असे अंदाजात म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून या अंदाजानुसार ४६ टक्के जणांनी विद्यमान मुख्यमंत्री सिद्दामैय्या यांना पसंती दर्शवली आहे. तर येडीयुरप्पा यांना ३२ टक्क्यांना मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. एबीपी सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार यावेळी कॉंग्रेसच्या मतांच्या संख्येत ३७ टक्के अशी सुधारणा होणार असून त्यांना ८५ ते ९१ जागा मिळतील. तसेच भाजपच्या मतसंख्येतही ३५ टक्के अशी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात भाजपला ८९ ते ९५ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जनता दल एसला ३२ ते ३८ जागा मिळणार आहेत.