निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला. शुक्रवारी पतियाळा हाऊसने दिलेल्या फाशीच्या स्थगितीला तिहार तुरुंग प्रशासन आणि गृह मंत्रालयाने आव्हान दिले होते. दोषींना लवकरात लवकर फाशी दिली जावी अशी मागणी करणारी याचिका शनिवारी तिहार तुरुंग प्रशासनाने केली. यावरील सुनावणी रविवारी झाली.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचे बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, आरोपी काहीतरी कारणं काढून फाशीची शिक्षा लांबवू पाहत आहेत. न्याय मिळण्यासाठी उशीर होता कामा नये, त्यामुळे ज्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत त्यांना एक-एक करुन फाशी द्यायला हरकत नाही. त्यासाठी सर्वांची फाशीची शिक्षा लांबवण्यात येऊ नये. दोषींच्या वतीने वकील ए. पी. सिंह यांनी दिल्ली हायकोर्टाला सांगितले की मृत्युदंडाची शिक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा राज्यघटनेत कोणतीही निश्चित वेळमर्यादा सांगितलेली नाही. निर्भयाच्या गुन्हेगारांना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. दुसर्यांदा या फाशीचा डेथ वॉरंट जारी झाला होता.