हमासच्या अकल्पित, आकस्मिक दहशतवादी हल्ल्यातून सावरलेले इस्रायल आता गाझाचा चेहरामोहरा बदलून टाकायला निघाले आहे. गेले पाच दिवस गाझापट्टीला अहोरात्र बॉम्ब आणि क्षेपणास्रांच्या वर्षावाने भाजून काढून आणि त्याचबरोबर अन्न, पाणी, औषधे, वीज, इंधन अशा सर्व बाबतींत कोंडी करून इस्रायल गाझापट्टीवर संपूर्ण ताबा घेण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेच यातून दिसते. ‘आता गाझा पूर्वीचे राहणार नाही’ ह्या इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या इशाऱ्यातून ते स्पष्ट होते. हमासचा नायनाट करून गाझावर संपूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न इस्रायल करू शकते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता घडली आहे ती म्हणजे एकीकडे इस्रायलच्या दक्षिणेस त्याचा हमासशी संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे उत्तरेत लेबनॉन आणि सीरियामधून इस्रायलवर क्षेपणास्र हल्ले सुरू झाले आहेत. हिजबुल्ला, इस्लामिक जिहाद आदी हमाससारख्याच इस्लामी दहशतवादी संघटनांकडून हे हल्ले होत आहेत आणि त्यामुळे इस्रायलला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर झुंजवण्याचा हा कावा आहे. ही संभाव्यता लक्षात घेऊनच अमेरिकेने आपली युद्धनौका आणि शस्त्रसामुग्री इस्रायलकडे रवाना केलेली आहे. इस्रायल आणि हमासच्या या संघर्षात गाझाचे आम नागरिक भरडून निघत आहेत, हे जरी खरे असले तरी मुळात ही परिस्थिती त्यांच्यावर सत्ता गाजवणाऱ्या हमासनेच आपल्या वेडेपणाने आणलेली आहे. पहिली सर्वांत मूलभूत बाब म्हणजे हमासने इस्रायलवर जो दहशतवादी हल्ला चढवला, तो अत्यंत रानटी स्वरूपाचा होता. संगीत महोत्सवात रममाण असलेल्या देशोदेशीच्या निरपराध नागरिकांची केलेली कत्तल, इस्रायलच्या दक्षिणेकडील लोकवस्त्यांत घरोघरी शिरून निरपराध नागरिकांच्या केलेल्या हत्या, मुलाबाळांना – स्त्रियांना गाझामध्ये पळवून नेऊन ओलीस धरण्याचे, विशी बाविशीतल्या तरुणींना नग्न करून धिंड काढण्याचे झालेले प्रकार, हजारोंच्या संख्येने क्षेपणास्त्रे डागून घेतले गेलेले बळी हे सगळे हमास ही आयसिससारखीच माथेफिरूंची संघटना आहे हे सिद्ध करते. आपल्या जन्मजात रानटी प्रवृत्तीचे दर्शनच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवरील आततायी हल्ल्यातून घडवले आणि आता त्याची फळे मात्र गाझाच्या आम नागरिकांना भोगावी लागत आहेत. त्यांची ढाल करून हमास लढते आहे. निवासी इमारतींमध्ये हमासने आपले तळ थाटले आहेत. त्यामुळे इस्रायल आज ह्या इमारतींना लक्ष्य करताना दिसते आणि त्यात निरपराधांचाही बळी अपरिहार्यपणे जाऊ लागला आहे. पॅलेस्टाईनचा वर्षानुवर्षांचा प्रश्न, इस्रायलशी असलेले पॅलेस्टिनींचे हाडवैर वगैरे सगळे मुद्दे चर्चिण्याजोगे जरी असले, तरी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. हा हल्ला झाला नसता तर हमासवर किंवा गाझावर ही वेळ आली नसती. इस्रायल हा काही मुकाट मार सोसणारा देश नाही. त्यामुळे आपण जे कर्म केले त्याची फळे भोगण्याची पाळी आज हमासवर आली असेल तर त्यात आश्चर्य नाही. आता त्याबाबत आरडाओरडा करणे म्हणजे स्वतःच मधमाशांचा पोळ्यावर दगड भिरकवायचा आणि मग मधमाशा मागे लागल्या म्हणून ओरड करायची यातला प्रकार झाला. आता मानवतावाद आठवलेल्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसलेल्या दीड हजार दहशतवाद्यांनी जे हत्याकांड केले, त्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या मानवाधिकारांविषयीही बोलले पाहिजे, अन्यथा तो ढोंगीपणा ठरतो. आज गाझा जर अहोरात्र होरपळत असेल तर त्याला संपूर्णतः हमासचे माथेफिरूच कारणीभूत आहेत. पॅलेस्टाईन प्रश्नाबाबत आजवर सहानुभूती बाळगत आलेल्यांनाही आपल्या त्या भूमिकेचा फेरविचार करावासा वाटावा येथपर्यंत हा विषय आता पोहोचलेला आहे. भारतासह जगभरातील अनेक देश आजवर पॅलेस्टाईनच्या विषयावर आजवर सहानुभूती बाळगत आले. परंतु आज ज्यांच्या हाती गाझापट्टीची सूत्रे आहेत, त्यांची एकंदर आयसिससदृश वृत्ती पाहता ह्या विषयावर यापुढे कितपत सहानुभूती बाळगायची याचा फेरविचार सर्वांनाच करावा लागणार आहे. काळ बदलतो तशा भूमिकाही बदलतात, बदलाव्या लागतात. गाझामधील आम नागरिकांच्या हालांना आज पारावार उरलेला नाही. मानवतेच्या दृष्टीतून त्यांना ह्या चौफेर संकटातून वाचवायचे असेल, तर हमासने सर्वांत आधी मुकाट शरणागती पत्करली पाहिजे. ओलिसांना परत केले पाहिजे. परंतु शरणागती तर दूरच, उलट इस्रायलवर अजूनही क्षेपणास्र हल्ले सुरू आहेत. ओलिसांच्या शिरच्छेदाच्या धमक्या हमास देत आहे. हमासचे समर्थक लेबनॉन आणि सीरियामधून इस्रायलला लक्ष्य करू पाहत आहेत. त्यामुळेच इस्रायल आज मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाही आणि त्याचीच किंमत गाझाच्या नागरिकांना क्षणाक्षणाला चुकवावी लागते आहे.