– सौ. बबिता बाबलो गावस
हल्ली आरतीचं लक्ष कशातच लागत नाही. आजूबाजूला काय चाललंय याचं तर तिला भानच नसतं. चतुर्थीचा सण जवळ आला होता. जो – तो तयारीला लागला होता. आरती मात्र गुपचुप बसून होती. एवढ्यात तिच्या दोन्ही वहिनी हातात एकेक साडी घेऊन तिच्याजवळ आल्या. ए ऽऽ आरती ही घे साडी तुझ्यासाठी! म्हणत तिच्याजवळील टेबलावर ठेवल्या. तिला आठवलं – लग्नापूर्वी आपण या घरची किती लाडकी होते. सगळ्यात आधी दोन्ही भाऊ तिला खरेदीसाठी पैसे देत. तिला काही कमी पडू देत नव्हते. पण माहेरी आल्यापासून भाऊ ढंकूनही पाहत नाहीत असे अनेक विचार तिच्या डोक्यात पिंगा घालत होते. एवढ्यात तिची नजर साड्यांवर पडली. त्यावरची किंमत तिला दिसली. ईऽऽ किती स्वस्त साडी आणली आहे आपल्यासाठी, असं तिला म्हणावसं वाटलं. पण ती गप्प राहिली आणि खोलीत गेली. तिला रडू आवरत नव्हते. रडता रडता तीचं मन भूतकाळात कधी गेलं कळलंच नाही.
तिचे लग्न चांगल्या नोकरीला असलेल्या आकाशबरोबर झाले होते. दिसायला सर्वसाधारण पण तल्लख बुद्धिचा आकाश माणूस म्हणून चांगला होता. त्याचा स्वत:चा बंगला होता. नोकरचाकर दिमतीला होते. ऐशोआराम म्हणजे काय हे तिला लग्नानंतर अनुभवायला मिळालं होतं. सुखाने तिची ओंजळ भरली होती. तिची प्रत्येक इच्छा फळाला येत होती. मागेल त्या किमतीची उंची वस्त्रे तिच्यासाठी खरेदी केली जायची. सुवर्णालंकारांनी तर संपूर्ण कपाटच भरले होते. काही म्हणजे काहीच कमी नव्हते. आनंदाच्या झाडासारखं तिचं जीवन सुखमय झालं होतं. त्यातच दुधात साखर पडली. तिला दिवस गेल्याची आनंद वार्ता कानी पडली आणि सगळं घर आनंदाने डोलू लागलं. आकाशाला तर आभाळच ठेंगणं वाटलं.
त्या नऊ महिन्यांत सासू-सासर्यांनी आणि नवर्याने तिचे सगळे सगळे डोहाळे पुरविले. माहेरची आठवणच होऊ देत नव्हते. तिच्या म्हातार्या आईलाही मुलीचे सुख बघून आपण मोठे पुण्य केले असेल म्हणून लेकीला श्रीमंत आणि चांगल्या माणसांनी भरलेलं घर मिळालं असं वाटायचे. नऊ महिने नऊ दिवस सरले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
मुलाचा बारसा तर चार गावात साजरा झाला नसेल एवढ्या थाटामाटात झाला. मुलाला आरव नाव ठेवण्यात आले. त्याच्या येण्याने घराचं नंदनवन झालं होतं. त्याचे सगळे हट्ट पुरवणे जणू घरातील प्रत्येकाचे कर्तव्यच बनले होते. आरव वर्षाचा होतो न होतो तोच आकाशला कंपनीतर्फे परदेशात जाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. आपल्या खास मित्राला आपल्या कुटुंबाकडे अधून-मधून लक्ष ठेवायला सांगून आकाश निर्धास्त होऊन परदेशात गेला.
परदेशात गेल्यावर दर महिन्याला बायको सांगेल तेवढा पैसा आकाश पाठवायचा. ‘आपला हुकुम सर आँखो पर’ असंच काहीसं चाललं होतं. आकाशचा तो खास मित्र अधून मधून घरी येत होता. आरवशी त्याची चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे आरतीलाही तो आपल्या मित्रासारखा वाटू लागला. तिचं लाघवी बोलणं, गोरापान चेहरा त्याला भुरळ पाडत होता. हल्ली कुठं जायचं असलं की ती त्या मित्राला फोन करून बोलवायची. बिनधास्त त्याच्याबरोबर आरवला घेऊन जायची.
आता हळूहळू दोघांचीही खास मैत्री झाली होती. हाताला हात स्पर्शू लागले होते. एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. दोघेही एकमेकांत गुंतू लागली होती. हल्ली त्याचं येणं सासूबाईंना खटकू लागलं होतं. ती सुनेला हरतर्हेने इशारा देत होती; पण आरतीला त्याच्या पलिकडे काही दिसतही नव्हतं आणि सूचतही नव्हतं. हल्ली त्याचे येणे कमी झाले होते. पण ती काही ना काही निमित्त काढून बाहेर जायची. घराच्या चार भिंतीआड जे लपलं होतं ते आता चव्हाट्यावर आलं होतं. हजार लोकांचे हजार बोल कानी पडायला लागले तसे आकाशाला त्याच्या आईने ताबडतोब येण्याचे फर्मान सोडले.
आकाश घरी येताच आरतीशी त्याचे कडाक्याचे भांडण झाले. तिला मारण्यासाठी हातसुद्धा उगारला; पण तिला आता त्याची गरज भासत नव्हती. तिने तडकाफडकी घर सोडलं. प्रियकराला फोनावर फोन केले; पण त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला आकाश आल्याची बातमी समजली होती. आता तिला माहेरी जाण्यावाचून गत्यंतर नव्हते. म्हणतात ना, जेव्हा धन असते तेव्हा परकेसुद्धा आपले होतात. खाली झोळी असली की आपलेसुद्धा अनोळखी होतात याचा प्रत्यय आरतीला आला होता. सासर सोडल्याचा तिला पश्चात्ताप होत होता. किती चांगला नवरा मिळाला होता. पोटातले पाणी हलू देत नव्हता. आपण त्याचा विश्वासघात केला. पोटच्या गोळ्याला अंतर देऊन आपण जीवंत आहोत याची तिला खंत वाटत होती. तिला सासरी जाण्याची खूप इच्छा होती. आपल्या लाडक्या मुलाला कुशित घेऊन खूप रडावं असे अंतर्मन तिला सांगत होते.
रोज रोज तिला असं कुढत जगताना पाहून दोन्ही भाऊ अस्वस्थ व्हायचे. आज त्यांनी तिच्या सासरी जायचे ठरवले. बरोबर आईलाही नेले. तिच्या सासरी पोहचताच त्यांनी सरळ सरळ आकाशच्या पायांवर लोटांगण घातले. आपली बहीण चुकल्याची कबुली दिली. तिला पश्चात्ताप झाला आहे. तिचा जीव तुमच्यातच गुंतला आहे. तिचं मन कधीच मेलं आहे. तिचा असून नसल्यासारखा देह तेवढा बाकी आहे. तिने केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी तिला द्या असं म्हणत त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. आकाशालाही त्यांना असे हताश बघून राहवले नाही.
आईविना आपला चिमुकला आरव आतून पोखरला जात आहे याची त्याला जाणिव होत होती. आकाशाची आई मायाळू माऊली होती. तिने त्याला योग्य तो विचार करायला सांगितला. चुकलेल्या वाटसरूला सरळ मार्ग दाखवणे हे कर्तव्य असतं हे ध्यानात ठेव म्हणत तिने आकाशच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या रात्री आकाशचा जराही डोळ्याला डोळा लागला नाही. तो पुन्हा पुन्हा आरतीचा विचार करत राहिला. कुठेतरी मित्रावर विश्वास ठेवून आपणही चुकलो याची त्याला जाणिव होत होती. आपण आपल्या मित्राला आपण नसताना घरी येण्याची परवानगी दिली हीच तर मोठी चूक होती. रोज-रोजच्या येण्यानेच दोघांत ओढ निर्माण झाली असेल हे सांगणं कठीण. पण आपण मात्र चुकलो यात संशय नाही. अशा चुकांसाठी पुरुषाला कोणी धारेवर धरत नाही; पण स्त्री मात्र व्याभिचारी ठरते. आरतीच्या बाबतीत तसं होऊ द्यायचं नाही असं ठरवूनच तो झोपला. सकाळी उठल्या उठल्या त्याने आरव आणि आपल्या आईला आरतीकडे जाऊया असं सांगून तयारीला लागला.
दारात आकाश, आरव आणि सासू आल्याचे बघून आरतीने त्यांच्या पायावर लोटांगणच घातले. आपण केलेली चूक पुन्हा कधीही करणार नाही असं म्हणत ती धाय मोकलून रडू लागली. आरवही तिला बिलगला आणि घरी परतण्यासाठी हट्ट करू लागला. ‘‘आई तुझी मला खूप आठवण येते. ये ना गं घरी!’’ असं म्हणत आईचे डोळे पुसू लागला. शेवटी आकाशला राहवलं नाही. त्याने आरतीला घरी घेऊन जाण्यासाठी आपण आल्याची आनंदवार्ता दिली. आपल्यासाठी नव्हे तर पोटच्या गोळ्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. आरतीला तिचं जगणं दान केलं.
………