गरज श्रद्धेची!

0
209

– समृद्धी केरकर

श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. काहींना आईबाबांवर तर काहींना आपल्या गुरुजनांवरती, तर जास्त प्रमाणात देवावर आपली अतुट श्रद्धा असते. खरं तर श्रद्धा असणे फार महत्त्वाचे आहे. मात्र, या श्रद्धेचं जर अतिक्रमण झालं तर मग ती अंधश्रद्धेचे रूप घेते. श्रद्धा म्हणजे शक्तीभाव. अंधश्रद्धा म्हणजे, देवाच्या नावाने होत असलेली दृष्कृत्ये व गैरसमज! आपल्या भारतात अनेक लोक आहेत जे अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवतात. असेही लोक आहेत जे अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवत नाहीत. पण काही चांगले शिकलेले सवरलेले लोक अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवतात. स्वत: करत नाहीत, पण दुसर्‍यांना फसवून आपला धंदा सुरू करतात. हल्लीच काही महिन्यांपूर्वी अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे म्हणून लढणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकर या महान व्यक्तिला मॉर्निंग वॉकला जात असताना काही ढोंगी माणसांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून ठार केले. अशी कृत्ये करणारे अनेक दुष्ट माणूस आपल्या देशात गावोगावी असतात. ते स्वत:च्या स्वार्थासाठी दुसर्‍यांना लुटतात. आपल्या भारत देशात अंधश्रद्धा व भेदभाव हीच एक मोठी खोड आहे. लोक साधुबाबांमुळे आपल्या घरच्यांनासुद्धा पार विसरून जातात. आजही आपल्या देशात नरबळी देण्याची प्रथा चालू आहे. आपल्याला वाटतं की म्हातारी माणसे जुन्या विचारांची असतात व जास्तीत जास्त तीच अंधश्रद्धा मानतात. पण आज फक्त म्हातारी माणसंच नाहीत तर, तरुण मुलं, पालक या सर्वांनाच ढोंगीबाबा मोहजालात अडकवितात. विज्ञानाद्वारे प्रयोग करून लोकांना तो एक चमत्कार असल्याची खोटी बातमी देतात व शहाण्या लोकानाही भोंदू बनवतात. मग लोक रस्त्याच्या बाजूला वस्ती करून राहाणार्‍या गरीब मुलांना पैसे द्यायचे सोडून मंदिरात जाऊन विनाकारण देवाच्या नावे फंडपेटीत पैसे टाकतात. काही लोक आपल्या कोंबड्यांना कुणाची दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या पायात काळे दोरे बांधतात; पण घडते उलट. कोंबड्या त्याच दोर्‍यांमध्ये अडकून पडतात. कधी कधी त्यांच्या पायांनाही जखम होते. जखमी अवस्थेत जर मुंगूस किंवा कुत्रा आला तर बिचार्‍या दोर्‍यात पाय अडकवून बसलेल्या कोंबड्या पकडल्या जातात. दरवर्षी भारतातील हजारो लोक अंधश्रद्धेचे शिकार बनतात. टीव्हीवर पाहून किंवा लोकांचे ऐकून लोक आपले भरपूर पैसे हनुमान चालीसा किंवा नजर सुरक्षा कवच यांसारख्या गोष्टींना खर्च करण्यात वाया घालवतात व स्वत: फसत असतात. काहीजण म्हणतात की सुपारीला पिंजर लावून कुणाच्या तरी तुळशी वृंदावनात ठेवली तर त्या घरामधील माणसाचा मृत्यू होतो. पण जर खरेच असे झाले असते तर मग खुनाचा काही प्रश्‍नच आला नसता. कुणाला मारायाचे झाले असते तर मग सुपारी ठेवूनच काम झाले असते. मात्र, सुपारी ठेवून कुणाला मारता येते? कुत्र्याच्या रडण्याने किंवा घुबडाच्या आवाजाने, सापाच्या नावाने कुणाला मृत्यू येतो, ही साफ खोटी गोष्ट आहे. या गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे लोक भोंदू ठरतात. अंधश्रद्धेची ही प्रथा खरं तर वेड्या माणसांनीच सुरू केली असावी. आणि हे खरंच, एक बाप, देवाची पूजा करत होता. तेव्हा देवाच्या पुढ्यात ठेवलेल्या प्रसादात त्यांची मांजर तोंड घालू लागल्याने त्याने मांजरीला बांधून ठेवले. शेजारी बसलेल्या मुलाने ते पाहिले व पूजेच्यावेळी त्याने उगाचच आपल्या मांजरीला बांधून ठेवले. असे एकमेकांचे पाहून ही वेडी प्रथा सुरू झाली असावी. लोक कोंबड्या, बकर्‍या अशा निष्पाप प्राण्यांना देवापुढे बळी देतात. उलट देव खात नसल्याचे पाहून स्वत:च मटकावून टाकतात. आणि जर देवाच्या पुढ्यात मांस ठेवतात, तर मग चतुर्थीच्या दिवशी मांस का खाऊ नये? श्रावणात मांस का खाऊ नये? आणि खाऊन मंदिरात का बरं प्रवेश करू नये? पूर्वी पाऊस पडत नसला की कुणाचा तरी नरबळी देण्याची प्रथा होती. कालांतराने रेड्याचा बळी द्यायची प्रथा सुरू झाली. आणि आज बिचार्‍या कोंबड्या व बकर्‍यांची हीच गत आहे. भारतात अजूनही काही ठिकाणी नरबळी व रेड्याचा बळी देण्याची प्रथा अजूनही जोपासली जाते. प्रगत राष्ट्राच्या दिशेने कूच करणार्‍या देशात हे शोभते का? आपल्याला खरीच श्रद्धा आणि भक्ती पाहिजे तर दिनदुबळ्यांची मदत करा. नेहमी चांगले काम करा. दुसर्‍यांना आनंद देईल शिवाय आपल्याही मनाला शांती लाभेल, तीच खरी श्रद्धा व भक्ती!

………..