निरोप

0
287
  • पौर्णिमा केरकर

आंधळेपणाचा जल्लोष नकोच! थोडे डोळस होऊया. हृदयाची खोली आणि विचारांची उंची वाढवून नववर्षाला आपलेसे करूया. सरत्या वर्षाला वाईट वाटू दे थोडंसं, हरकत नाही, नावीन्याचा जल्लोष करताना मात्र नितळ, निखळ माणूस होऊन जगूया!

निरोपाचा क्षण जवळ आला की मनात हुरहुर दाटून येते. मनात आतून कुठेतरी काहीतरी दाटून येतेच. नाही म्हटले तरी विरहाचा क्षण हा क्लेशदायकच असतो. परंतु नावीन्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला मागच्याचा विरह सहन करीतच पुढे जावे लागते.
दरवर्षी जुने वर्ष सरते. पुन्हा नवी सुरुवात होते. नवेपणाचे जल्लोषी स्वागत होते. त्या जल्लोषात मूल्ये तर पायदळी तुडविली जातात. परंतु त्याचे मनाला काहीच वाटत नाही. खरेतर एकेक नवे वर्ष येते-जाते आणि आपण वयाने वाढत जातो. वयाचे वाढणे हे शरीराला आलेले म्हातारपण असते. तो तर निसर्गनियमच आहे. पण आजकाल मी सभोवती बघते तर सगळीच निराशा, सगळा कंटाळा करीतच आयुष्य अक्षरशः पुढे ढकलत जगताना माणसे दिसतात. जन्माला आलेली व्यक्ती कधी ना कधीतरी या जगाचा निरोप घेणारच हे तर शाश्वत सत्य आहे. असे असूनही शहाणपणाने जगता येत नाही याला काय म्हणावं? प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत आहोत. जग तर आपल्या अगदी जवळ आले आहे. असे असतानाही शरीराने जवळ तर मनाने एकमेकांपासून दूरदूर जात आहोत.

२०२० हे वर्ष तर यापुढील आयुष्यात विसरता येणेच कठीण आहे. निराशा, मानसिक-शारीरिक क्लेश घेऊनच हे वर्ष सुरू झाले आणि आता संपतही आहे, तेही अनिश्‍चिततेच्या सावटाखाली. पुढे आणि नवीन वर्षात काय वाढून ठेवलेले आहे कुणास माहीत! सध्या एक मोठे प्रश्नचिन्ह आ वासून उभे आहे. एका बाजूला जगण्याचे भय, तर दुसर्‍या बाजूला सर्वच बंधने झुगारून देत जगण्याला भिडण्याची ऊर्मी! कधीकधी तर हे सगळेच अनाकलनीय वाटते. या वर्षाने जीवनाचे वास्तव अंग समोर आणले. समंजस मनाला यातून खूप काहीतरी शिकण्यासारखे आहे. पण शिकणे होतच नाही. वर्षे सरतात तसतशी माणसे समंजस व्हावीत, सुशिक्षित असावीत असे वाटते. पण घडते मात्र याच्या अगदी उलट. वय वाढले तरी विचारांची उंची आणि खोली वाढतच नाही. संकुचित मनाची कितीतरी उदाहरणे सरत्या वर्षाने अनुभवायला दिलेली आहेत. आपले कोण, परके कोण याची जाणीव याच काळात अनेकांना झाली. माणुसकीचे घडलेले दर्शन मोठे होतेच, तसेच संकुचित मनोवृत्तीही अनेकांची समोर आली. निराशेच्या गर्तेत वेढून राहिलेल्या मनाला अजूनही पाहिजे तशी उभारी मिळालेली नाही. असे असूनही मनातील मत्सर कमी होत नाही. चुकीच्या सवयी बदलाव्या असे मनापासून वाटत नाही. हे कशाचे प्रतीक म्हणणे उचित ठरेल? उदाहरण घ्यायचे झाले तर हा महामारीचा कालखंडच नजरेसमोर आणूया. कोरोनावर मात कशी करायची याची नियमावली तर एव्हाना सर्वांना तोंडपाठ झालेलीच आहे. असे असूनही या नियम-अटींचे पालन करावेसे का वाटत नाही?
नियम हे झुगारण्यासाठीच असतात या पारंपरिक समजाला तर त्यामुळे पुष्टीच मिळते. म्हणून तर आज सरत्या वर्षाला निरोप देताना रस्त्याच्या दुतर्फा मला प्रचंड कचरा दिसतो. हा कचरा गरीब कचरा नसून तो श्रीमंत असतो. कारण तो मोठमोठ्या बंगल्यांमध्ये, चकचकीत घरांत वावरणार्‍या सुटाबुटातील व्यक्तिमत्त्वानी पॉश, किमती कारमधून आणून तिथे टाकलेला असतो. कुठलाही रस्ता घ्या; या रस्त्याच्या दुतर्फा हा असा कचरा टाकून स्वतःच्या पॉशपणाची ग्वाही दिली जाते. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यामागची कारणे कोणती आहेत हे न समजण्याइतके आपण दूधखुळे आहोत का? हा प्रश्न मनाला विचारून पाहिला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.
अगदी अलीकडचा प्रसंग. आठवड्यातून एकदा घरी जाणारी संगीता घरातील कचर्‍याचा ढीग पाहून आतल्या आत खूप संतापायची. घरातील अस्वच्छतेवरून ती आईवडिलांना धारेवर धरायची. दोघेही रागाने तिच्यावर ओरडायचे, ‘आम्ही आमच्याने होते तसेच घर ठेवणार. आठ-पंधरा दिवसांनी घरी येतेस आणि आम्हाला शहाणपणा शिकवतेस?’ दोघांच्याही रुद्रावतारासमोर ती गप्पच राहायची. पण त्या दिवशी तर तिने चक्क वडिलांच्या हातात झाडू पहिला. ते अगदी चकाचक घर साफ करत होते. संगीताला वाटले, आपल्या बोलण्याचा परिणाम झाला असावा! नंतर कळले, साधूने सांगितले होते- ‘तुमच्या दुःखाला घरातील कचरा कारणीभूत आहे…’ म्हणजे साधूने सांगितले म्हणून स्वच्छता करायची; आरोग्याला हानीकारक हे माहीत असूनही एरव्ही दखल घ्यायची नाही. भावनिकदृष्ट्या विचार केला तर म्हणता येईल, की निरोपाच्या क्षणी तरी आपण खोटे बोलता कामा नये. समंजस होत आयुष्य सुंदर करता येतं, पण समंजस होण्यासाठी जी सहनशीलता लागते तीच तर आता उरली नाही.

कचराच कशाला, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातच आम्ही बेजबाबदारपणे वागतो; आणि हीच वृत्ती
घातक ठरते. नवीन वर्षाचे स्वागत करताना तरी हा समंजस विचारीपणा येऊ द्या व्यक्तिमत्त्वात! नाहीतर मग वर्षे सरत जातील, आपली वये वाढतील, विचार-आचारांचे काय? नावीन्याचा जल्लोष म्हणजे तरी काय असते? कर्णकर्कश आवाज, बेधुंद नाचगाणी, नशापाणी, अचकट-विचकट हातवारे, चित्रविचित्र आवाज आणि वारेमाप उधळपट्टी… नशेत चूर होऊन तोंडाने अपशब्दांचा मारा करीत साजरी केलेली रात्र खरेच आनंदाची, समाधानाची असते का? मनालाच विचारायला हवे. वर्ष बदलले की कॅलेंडर बदलते. तारखाही फडफडत राहतात. मन मात्र वेगाने पुढे जात नाही. विचारीही होताना दिसत नाही. २०२० हे वर्ष आजपर्यंतच्या वर्षांपेक्षा खूप वेगळं आहे. या वर्षाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिंतन करायला लावले. लक्ष्मीपुत्रापासून ते रंकापर्यंत सर्वांना समान पातळीवर आणले. माणुसकी शिकवली. अमानवीपणाचा कहरही अनुभवला. पारंपरिक जीवनपद्धतीप्रमाणे सहजपणे जगता येते याची शिकवण या वर्षाने दिली. प्रत्येकाच्याच हृदयावर ओरखडा उमटवून ‘तुम्ही बेजबाबदारपणाने वागलात तर मी नवे रूप घेऊन येईनच!’ हेच जणू सांगत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी स्वतःलाच अगदी निक्षून सांगूया, जुने वर्ष सरले म्हणून जल्लोष नको… आम्ही प्रत्येकाने कोणता नवा संकल्प केला आहे? नव्या विचारांची कास धरून आपण चालणार आहोत का, की अजूनही बुरसटलेल्या विचारांची सोबत घेऊन चालायचे?
आंधळेपणाचा जल्लोष नकोच! थोडे डोळस होऊया. हृदयाची खोली आणि विचारांची उंची वाढवून नववर्षाला आपलेसे करूया. सरत्या वर्षाला वाईट वाटू दे थोडंसं, हरकत नाही, नावीन्याचा जल्लोष करताना मात्र नितळ, निखळ माणूस होऊन जगूया!