निरीक्षण

0
9
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

निरीक्षण नसल्यास कोणत्याही बाजूने शत्रू आपला कार्यभाग साधू शकतो. शत्रूला जवळ येऊ न देणे हे केवळ अचून निरीक्षणाने प्राण्यांना शक्य असते. आपला शत्रू कोण याचा पुरेपूर अनुभव त्यांना असतो. स्वसंरक्षणाशिवाय कोणताही प्राणी या भूमीवर टिकू शकत नाही.

निरीक्षण प्रत्येक सजीव करत असतो. निरीक्षण करणे म्हणजे बारकाईने पाहणे. प्रत्येक सजीव निरीक्षणानेच शत्रूपासून आपले रक्षण करतो. प्रत्येकाचे शत्रू वेगवेगळे असतात. लहान किड्या-कीटकांना पक्षी चोचीने उचलतात, तर पक्ष्यांना खाणारे आणखी शत्रू असतात. गुरांना, हरणांना, बकऱ्यांना वाघ व सिंह हे हिंस्र प्राणी मारून टाकतात व त्यांचे मांस भक्षण करतात. वाघ व सिंह यांना मारणारे शिकारी असतात. उंदराला साप गिळतो तर सापाला मटकावणारे आणखी प्राणी असतात. मुंगूस व साप यांचे शत्रुत्व तर आपल्या परिचयाचेच आहे. आपल्या शत्रूपासून आपले रक्षण करण्यासाठी तीव्र निरीक्षण हवे.

निरीक्षण नसल्यास कोणत्याही बाजूने गुपचूप येऊन शत्रू आपला कार्यभाग साधू शकतो. शत्रूला जवळ येऊ न देणे हे केवळ अचून निरीक्षणाने प्राण्यांना शक्य असते. आपला शत्रू कोण याचा पुरेपूर अनुभव त्यांना असतो. स्वसंरक्षणाशिवाय कोणताही प्राणी या भूमीवर टिकू शकत नाही.

शेतकरी शेतात धान्य पेरतो. प्रथम तो धान्याचे निरीक्षण करतो आणि मनातल्या मनात ठरवतो की हे बी अंकुर येण्याजोगे आहे की नाही. बिजाचा त्याला संशय असेल तर तो बीज बदलतो. खूपदा बी व्यवस्थित अंकुरित न झाल्यामुळे परत जमीन तयार करून परत बी पेरावे लागते. धान्य पेरल्यावर अंकुर कसे वाढतात व त्यातून रोपे कशी तयार होतात याकडे लक्ष द्यावे लागते. वाढीसाठी खत घालणे, वेळोवेळी पाणी देणे, रोपांचे गुरांपासून संरक्षण करणे इत्यादी गोष्टींवर भर द्यावा लागतो. रोप जर दुसरीकडे परत लावायचे असेल तर ते करण्याएवढे वाढले आहे का याचे निरीक्षण करावे लागते. नवीन लावलेल्या रोपाची व्यवस्थित पाणी देऊन काळजी घ्यावी लागते. नडणी उपटून काढून रोपाला वाढण्यासाठी योग्य वाव द्यावा लागतो. रोपाची मशागत करताना जंतुनाशकांचा फवारा देऊन रोगांपासून रोपांचे रक्षण करावे लागते. कणसे येण्यापूर्वी व कणसे आल्यानंतर त्या पिकाला रानटी जनावरांपासून सांभाळावे लागते. निरीक्षण जरादेखील चुकल्यास पीक हातात न पडता वाया जाऊ शकते. कळवणी, मळणी, उबवणी, निवडणी हे सगळे उपचार होऊन धान्य घरात येईपर्यंंत निरीक्षणाचा प्रवास चालूच असतो. ज्यांचे निरीक्षण कच्चे आहे त्यांना त्याचा धोका संभवू शकतो. परिपक्व निरीक्षण असलेल्यांना त्याचा पुरेपूर लाभ मिळत असतो.

आई आपल्या इवल्याशा बाळाचे किती निरीक्षण करते त्याचा अंदाज घ्या. कुठे खरचटले काय? कोठे फोड आलेत काय? कोठे दुखते काय? पचन ठीक झाले काय? भूक लागली काय? हलणे-चालणे ठीक आहे काय? यशस्वी आई निरीक्षणातही तेवढीच यशस्वी असते. आपल्या बाळाला जरादेखील अपाय होणार नाही याचे निरीक्षण ती करतच राहते.

शिकणारा विद्यार्थी जर निरीक्षणात तरबेज असेल तर तो इतर सर्वांपेक्षा नेहमीच पुढे जातो. प्रमेयाच्या पायऱ्या मांडताना, समीकरणाचे अंश सोडवताना अथवा पदावलीचे गुणक पाडताना सूक्ष्म निरीक्षणाची गरज असते. भूमितीच्या आकृत्या व त्यांचा एकमेकांशी संबंध दाखवताना सूत्रांचे निरीक्षण आवश्यक असते. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना रासायनिक संयुगांचे व मिश्रणांचे ठीक निरीक्षण करावे लागते. पदार्थ-विज्ञानात मोजमापाच्या, वजनाच्या नोंदी करताना सूक्ष्म निरीक्षण अपेक्षित असते.

वनस्पतिशास्त्र व जीवशास्त्र यांच्यामध्ये मायक्रोस्कोपचा व्यवस्थित उपयोग निरीक्षणावर अवलंबून असतो. स्वयंपाक करतानादेखील घरातील गृहिणीला निरीक्षण सतत चालू ठेवावे लागते. अग्नीची ज्योत कडक किंवा सौम्य याच्यावर लक्ष देऊन भांड्यात शिजणाऱ्या पदार्थाचे निरीक्षण करत राहावे लागते. पाणी पुरेसे नसल्यास पदार्थ करपण्याचा धोका असतो. निरीक्षणाशिवाय अपेक्षित पदार्थ घडूच शकत नाही. जे घटक आवश्यक आहेत ते सगळे योग्य प्रमाणात घालावे लागतात. एखादा घटक विसरल्यास रूचीमध्ये फरक पडत असतो.
निरीक्षण ही आपल्या जीवनाचीच प्रक्रिया आहे. कोंबडीबरोबर फिरणारी पिल्ले थोड्या दिवसांनंतर स्वतंत्रपणे फिरायला लागतात, कारण त्यांची निरीक्षण-शक्ती विकसित झालेली असते. धावणे, उडणे, झेप घेणे, दाणे टिपणे या सगळ्या प्रक्रियांत ती पिल्ले तयार झालेली असतात. तेव्हा त्यांना आपल्यापासून दूर सोडणे कोंबडीला धोकादायक वाटत नाही.

गाईदेखील आपल्या पाडसांना दूध पिईपर्यंत सांभाळत असतात. जेव्हा ती वाढत जाऊन शक्तिमान होतात, तेव्हा गाय त्यांना स्वतंत्रपणे हिंडण्याची संधी देते. गाईचे निरीक्षण चालूच असते. पाडसावर रात्रंदिन तिचे लक्ष असतेच.
कांगारू आपल्या पोटाच्या पिशवीत आपल्या पोराला सांभाळते. किती सूक्ष्म निरीक्षणाने ते आपल्या बछड्याला गोंजारते. वानराची पोरे वानरीच्या पोटाला अशी बिलगतात की कशीही झाडावर वानरीने झेप घेतली तरी ती पडत नाहीत किंवा त्यांना जरादेखील इजा पोहोचत नाही. एवढी आपल्या निरीक्षणाची खात्री वानरीला असते.
माणसांच्या जगात आपल्या वाढत्या पोरांच्या स्वभावातील बदलांचे निरीक्षण आई-बाप करत असतात. जी पोरे मायेने आपल्याला येऊन बिलगायची ती हळूहळू दुरावा का करतात? त्यांची मायाळू भाषा बदलून कडवट व कोरडी का बनायला लागते? याचे निरीक्षण आई-बापासाठी वेदनामय असते.
माणसाला आपल्या प्रारब्धाचे निरीक्षण करता येत नाही. आपले आयुष्य कोठपर्यंत आहे हेही सांगता येत नाही. आपल्या भाग्यरेषांचे निरीक्षण करण्याची दीव्य दृष्टी आपल्याला नाही.