निराशाच!

0
100

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोव्यातील पहिल्यावहिल्या सभेतून त्यांनी नोटबंदीसंदर्भातील आपले जुनेच युक्तिवाद मांडले. नोटबंदी ही १ टक्का गर्भश्रीमंतांसाठी आहे आणि ती ९९ टक्के सामान्यांच्या मुळावर आली आहे आणि एनपीएंनी बुडीत खात्यात गेलेल्या बँकांना सावरण्यासाठीच ती लादली गेली आहे वगैरे मुद्दे राहुल यांनी यापूर्वी अनेकदा मांडले आहेत. त्यामुळे गोव्याच्या सभेत ते काही नवीन विषय पुढे आणतील ही अपेक्षा फोल ठरली. पंतप्रधानांवर आपण दोन दिवसांपूर्वी केलेल्या वैयक्तिक भ्रष्टाचाराच्या आरोपावर तर त्यांनी पूर्ण मौन साधलेच, परंतु मतदारांना साद घालणारा एखादा नवा विचार वा नवा मुद्दा देणेही त्यांना जमले नाही. राहुल यांच्याकडे लवकरच कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपविली जाणार असल्याने त्यांच्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरले आहे, परंतु भाषणात आलेली अधिक सुसूत्रता आणि दिसू लागलेला थोडा आत्मविश्वास सोडल्यास गोव्याच्या मतदारांना साद घालील असे काही त्यांना मांडता आले नाही. शेतकरी, मजूरवर्ग, कामगार यांच्यावर नोटबंदीचा झालेला परिणाम सांगताना त्यांनी गोव्यातील मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक यांचा भले उल्लेख केला, परंतु त्यांच्याशी भावनात्मक नाते जुळवणे काही त्यांना जमले नाही. गोव्याला येणार्‍या निवडणुकीत कॉंग्रेसचे चमकदार सरकार देण्याचा दावा त्यांनी केला आणि भ्रष्टाचाराचे एक जरी प्रकरण समोर आले तरी त्यावर दोन मिनिटांत शंभर टक्के कारवाई करण्याची ग्वाहीही दिली, परंतु पक्षाचा गोव्यातील पूर्वेतिहास ठाऊक असलेली जनता त्यावर किती विश्वास ठेवील हा प्रश्नच आहे. कलावतीच्या कहाणीची जागा यावेळी बेंगलुरूच्या फुलवालीने घेतली. राहुल गांधी हे अजूनही परिपक्व आणि प्रगल्भ नेत्याच्या रूपात पुढे येऊ शकलेले नाहीत ही शोकांतिका आहे. पंतप्रधान मोदींवर त्यांनी आधल्या दिवशी त्वेषाने वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप करणे आणि दुसर्‍या दिवशी सगळे विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटायला जायचे असताना आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे निमित्त करून पंतप्रधानांनाच जाऊन भेटणे यातून त्यांच्या भूमिकेतील सातत्याचा अभावच दृगोच्चर झाला. ‘आम्ही असेच भेटत राहूया’ असे सांगत मोदींनी त्यांच्या आधल्या दिवशीच्या संतापातील हवा काढून घेतली ती वेगळीच. राहुल गांधी आता बदलले आहेत. पूर्वीचे राहुल आता राहिलेले नाहीत असे कुमार केतकरांसारखे ज्येष्ठ पत्रकार सतत सांगत असतात, परंतु अशा प्रकारची ‘हिट अँड रन’ राजकारणाची त्यांची वृत्ती जोवर बदलत नाही, तोवर त्यावर विश्‍वास ठेवणे कठीण जाते. नोटबंदीच्या विषयात सुरवातीला कॉंग्रेस पक्ष गोंधळलेल्या स्थितीत दिसला. जेव्हा नोटबंदी जाहीर झाली, तेव्हा पक्षाने तिचे स्वागत केले. पण जेव्हा ममता बॅनर्जी नोटबंदीग्रस्त जनतेची बाजू घेऊन उभ्या ठाकलेल्या आणि विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधताना दिसल्या, तेव्हा विरोधकांमधील आपले गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी राहुल यांना धावपळ करावी लागली. परंतु तेथेही या सर्व विरोधकांना एकत्र ठेवणारे नेतृत्व देणे त्यांना जमलेले दिसत नाही. प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसवर शिरजोर तर बनले आहेतच, शिवाय सर्वमान्य नेतृत्वाची जागाही कॉंग्रेसकडून हिरावली जाताना दिसत आहे. ममता बॅनर्जींपासून अरविंद केजरीवालांपर्यंतचे नेते ती जागा हिसकावण्यासाठी सक्रिय आहेत. कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणे राहुल आजवर टाळत आले. परंतु आता फार काळ त्यांना ते टाळता येणार नाही. ती घटिका जवळ येत चालली आहे. त्यामुळे राहुल यांना आपली नेतृत्वशैली अधिक प्रगल्भ करण्यावाचून तरणोपाय उरलेला नाही. ते जर त्यांना जमणार नसेल तर कॉंग्रेसचे भरकटलेले तारू ते कसे सांभाळणार आहेत?