निरंकाल येथील १५ ग्रामस्थांविरुध्द गुन्हा

0
102

>> भटक्या जमातीच्या झोपड्यांची मोडतोड प्रकरण

टक्या जमातीच्या १३ झोपड्या स्थानिक लोकांनी उद्ध्वस्त केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एकूण १५ अज्ञात ग्रामस्थांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यात ५ महिलांचाही समावेश आहे. रविवारी दुपारी संतापलेल्या ग्रामस्थांच्या जमावाने भटक्या जमातीच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्याची घटना घडली होती.
गेल्या ३-४ वर्षांपासून निरंकाल, बेतोडा येथे माकडमारे भटक्या जमातीचे सुमारे ८०-९० सदस्य राहत आहेत. त्यांना हाकलून लावण्यासाठी स्थानिकांनी ग्रामसभेत ठराव घेतला होता. दहा दिवसांपूर्वी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक व मंत्री महादेव नाईक यांनी बैठक घेऊन याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी दुपारी १२ च्या सुमारास संतापलेल्या सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थांनी सर्व झोपड्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यावेळी झोपड्यांमध्ये फक्त लहान मुले होती. तर पुरुष व महिलावर्ग केरी येथे कामाला गेले होते.
या भटक्या जमातीला हटविण्याची मागणी होत असली तरी त्यांना रेशनकार्डे तसेच आधारकार्डे देण्यात आली आहेत. काहीजणांना मतदानकार्डे देण्यात आली असून इतरांनाही देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या जमातीचे प्रमुख गोपाळ पवार यांनी सुमारे ४० जणांना मतदान कार्डे मिळणार असल्याची माहिती दिली. उर्वरित १५ जणांना मतदानकार्डे तयार करण्यासाठी एका व्यक्तीने कार्यालयात नेल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आजोबांपासून निरंकाल येथे वास्तव्य असल्याचे सांगून सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन घर व मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याची मागणी त्यांनी केली.

मानवी हक्क आयोगाने
अहवाल मागविला

निरंकाल, बेतोडा येथील माकडमारे या भटक्या जमातीच्या झोपड्या स्थानिक सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या जमावाने पाडल्या प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव व पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांना अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. १ नोव्हेंबरपूर्वी अथवा १ नोव्हेंबरला हा अहवाल सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. वरील प्रकरणी हरिष ऊर्फ राजीव नारायण नाईक यांनी गोवा मानवी हक्क आयोगासमोर तक्रार नोंदवली होती.