>> मंत्री लोबो यांचा सरपंचांच्या बैठकीत इशारा
साळगाव येथील कचरा प्रकल्पात ओला कचरा आणताना नियमांचे पालन न करणार्या ट्रकांतील कचरा स्वीकारला जाणार नाही. तसेच उघडे ट्रक आणि रस्त्यावर सांडपाणी गळत आणला जाणारा कचरा स्वीकारला जाणार नाही, असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी एका बैठकीत काल स्पष्ट केले.
साळगाव येथील ग्रामस्थांनी रविवारी सांडपाण्याची गळती होणारे कचरावाहू ट्रक अडविल्याचे घटनेनंतर कचरा व्यवस्थापन मंत्री लोबो यांनी किनारी भागातून कचरा प्रकल्पात कचरा घेऊन येणार्या २७ पंचायतींच्या सरपंच आणि सचिवांची खास बैठक सोमवारी घेतली.
साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात उघड्या ट्रकांतून आणला जाणारा कचरा, रस्त्यावर सांडपाण्याची गळती होणारा कचरा स्वीकारला जाणार नाही. कचरा घेऊन येणार्या ट्रकांतून सांडपाण्याची गळती होऊ नये म्हणून ट्रकात खास लीचेट ट्रे बसवावी. कचरा वाहतुकीसाठी खास बॉडी बंद वाहनांचा वापर करावा, अशी सूचना मंत्री लोबो यांनी एका बैठकीत काल केली. पंचायतींनी कचर्याची वाहतूक करण्यासाठी बंद ट्रकांचा वापर करावा. बंद ट्रक उपलब्ध नसल्यास तूर्त कचरा पूर्णपणे झाकून आणावा. तसेच एका महिन्यात बंद ट्रकचा व्यवस्था करावी. तसेच ट्रकातून सांडपाण्याची गळती होऊ नये म्हणून लीचेट ट्रे बसवून घ्यावी, अशी सूचना मंत्री लोबो यांनी केली.