निपाहचा संशयास्पद रुग्ण गोमेकॉत

0
131

निपाह विषाणूचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात खास विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या ४८ तासांत अहवाल मिळणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली निपाह संशयित रुग्णाला ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

सदर संशयित रुग्ण मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. तो केरळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये मलेरियावर उपचार घेत होता. सदर रुग्ण प्रवासी रेल्वेने केरळमधून उत्तर प्रदेश येथे जात होता. रेल्वेमधील कर्मचार्‍याला सदर प्रवाशाच्या वर्तणुकीत बदल झाल्याचे आढळून आले. त्याला ताप येत होता. तो डोकेदुखीने त्रस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे रेल्वेमधील कर्मचार्‍याने त्याला थिवी रेल्वे स्थानकावर उतरवून प्रथम म्हापसा येथे आझिलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला निपाह विषाणूची लागण होण्याची शक्यता आणि धोका लक्षात घेऊन म्हापसा येथून बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सदर रुग्णाची योग्य प्रकारे तपासणी केली असून सध्या त्याला इतर रुग्णांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याला व्हायरल ताप आल्याचे गृहीत धरून उपचार सुरू करण्यात आले आहेत. निपाहने केरळमध्ये १२ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील जनतेने निपाहबाबत सतर्क राहावे. भाजी, फळे स्वच्छ धुऊन खावीत, असे आवाहन हॉस्पिटलच्या सूत्रांनी केले आहे.