>> दावकोण-धारबांदोड्यातील प्रकार; कुळे पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद
दावकोण-धारबांदोडा येथे बुधवारी पहाटे झोपेत असलेल्या देवेंद्र चेपो गावकर या युवकावर दोघांनी हल्ला चढवून जखमी केले. तसेच त्याच्याकडील सोनसाखळी व रोख रक्कम देखील लुटली. देवेंद्र गावकर याच्यावर फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून, शुक्रवारी त्याच्यावर शस्तक्रिया करण्यात येणार आहे. कांता बेतकेकर (रा. कणकिरे-गुळेली) व महादेव गावडे (रा. नाणूस-उसगाव) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. कुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय क्षेत्रातून प्रयत्न झाल्याने बुधवारी हा प्रकार उघडकीस आला नाही; मात्र काल सकाळी हे प्रकरण इस्पितळातून उघड झाले. कुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र गावकर हा मंगळवारी रात्री आपल्या घरात एकटाच झोपला होता. बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेला असताना दोन्ही संशयितांनी त्याच्यावर लाकडी पट्टीच्या सहाय्याने हल्ला केला. त्यात देवेंद्रच्या हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाईल व रोख 20 हजार रुपये लुटून पळ काढला. स्थानिक लोकांनी देवेंद्र याला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. त्याच्या हाताला गंभीर जखम झाल्याने शस्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रकरण दडपण्यासाठी राजकीय प्रयत्न
हे प्रकरण मिटविण्यासाठी संशयितानी राजकीय पातळीवरून प्रयत्न केले; पण गुरुवारी सकाळी प्रकरण उघड झाल्यानंतर मात्र संशयित लपून बसले. दोनपेक्षा अधिक हल्लेखोर गावात आल्याचे बोलले जात असून, ते दुचाक्या घेऊन आल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी दुपारी जखमी देवेंद्र गावकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कुळे पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला.