>> स्थान मिळवणारे केवळ तिसरे व सर्वांत युवा भारतीय पंच
भारताचे युवा पंच नितीन मेनन यांना २०२०-२१ या मोसमासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एलिट पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या नायजेल लॉंग यांच्या जागी मेनन यांना निवडण्यात आले आहे. ३६ वर्षीय मेनन यांना तीन कसोटी, २४ एकदिवसीय आणि १६ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. २०१८ व २०२० महिला टी-ट्वेंटी या आयसीसीच्या स्पर्धांमध्येदेखील त्यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
मेनन हे यापूर्वी आयसीसीच्या एमिरेट्स पंच पॅनलचे सदस्य होेते. माजी कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर या पॅनलमध्ये स्थान मिळवणारे ते तिसरे व सर्वांत युवा भारतीय आहेत. गेल्या वर्षी रवी यांना या खराब कामगिरीमुळे या पॅनलमधून हटवण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंच निवड समितीने घेतलेल्या वार्षिक आढाव्यानंतर आणि निवड प्रक्रियेनंतर नितीन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीमध्ये आयसीसीचे सरव्यवस्थापक (क्रिकेट) जेफ ऍलार्डिस, माजी खेळाडू व समालोचक संजय मांजरेकर, अनुभवी सामनाधिकारी रंजन मदुगले आणि माजी कसोटीपटू डेव्हिड बून यांचा समावेश होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने स्थानिक पंचांना संधी देण्याचा आपला नियम बदलल्यास पुढील वर्षीच्या ऍशेस कसोटी मालिकेत नितीन पंचगिरी करताना दिसू शकतात. पुढील वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. या मालिकेत पंचगिरी करण्यासाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
नितीन यांनी सुरुवातीला क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मध्यप्रदेशकडून १६, १९ आणि २३ वर्षांखालील संघाकडून क्रिकेट खेळले. मध्य प्रदेशकडून त्यांनी केवळ दोन ‘अ’ दर्जाचे सामने खेळले आहेत. पण २२ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पंचगिरी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे वडिल नरेंद्र मेनन देखील आंतरराष्ट्रीय पंच होते. नितीन २००६ ला बीसीसीआयची पंच परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर २००७-०८ पासून त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून केलेल्या कष्टाचे फळ आज त्यांना मिळाले आहे.
ते बीसीसीआयशी बोलताना म्हणाले की, ‘माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. वयाच्या २२ व्या वर्षी क्रिकेट सोडल्यानंतर मी पंच होण्याचे ठरविले तेव्हापासून आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये प्रवेश करणे हे माझे लक्ष्य होते. मला मिळालेल्या सर्व संधी आणि माझ्यावरील दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय आणि आयसीसीचा खूप आभारी आहे. मी भविष्याबद्दल उत्सुक आहे आणि मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.’
आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल ते म्हणाले, ‘मागील काही काळापासून भारतीय पंच एलिट पॅनलमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्हते. आता मला आपल्या देशाचा झेंडा फडकवत ठेवायचा आहे. मला आशा आहे की भारतातील आणखी पंच अव्वल स्तरावर दिसतील. भारतीय पंचांना उच्च स्तरावर नेण्यासाठी आणि माझे अनुभव सांगून मार्गदर्शन करण्याची ही एक मोठी संधी आणि मोठी जबाबदारी म्हणून मी पाहत आहे.’
याबरोबरच नितीन यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणि आयसीसी पंच डेनिस बर्न्स यांचे आभार मानताना म्हटले की ‘अखेर मी माझ्या कुटुंबाचे त्यांनी केलेल्या सर्व त्यागाबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. तसेच मी डेनिस बर्न्स यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’
आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक, पंच तसेच सामनाधिकारी ऍड्रियन ग्रिफिथ म्हणाले, ‘नितीन सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आमच्या मार्गप्रणालीद्वारे पुढे आला आहे. एलिट पॅनलमध्ये निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि तो सतत यश संपादन करत राहो, अशा शुभेच्छा देतो.’
आयसीसी पंच एलिट पॅनल
१. अलीम दार (१३२ कसोटी, २०८ वनडे, ४६ टी-ट्वेंटी), २. कुमार धर्मसेना (६५ कसोटी, १०५ वनडे, २२ टी-ट्वेंटी), ३. मराय इरासमस (६२ कसोटी, ९२ वनडे, २६ टी-ट्वेंटी), ४. ख्रिस गॅफने (३३ कसोटी, ६८ वनडे, २२ टी-ट्वेंटी), ५. मायकल गॉफ (१४ कसोटी, ६२ वनडे, १४ टी-ट्वेंटी), ६. रिचर्ड इलिंगवर्थ (४७ कसोटी, ६८ वनडे, १६ टी-ट्वेंटी), ७. रिचर्ड कॅटलबरो (६४ कसोटी, ८९ वनडे, २२ टी-ट्वेंटी), ८. नितीन मेनन (३ कसोटी, २४ वनडे, १६ टी-ट्वेंटी), ९. ब्रुस ऑक्सनफर्ड (५९ कसोटी, ९६ वनडे, २० टी-ट्वेंटी), १०. पॉल रायफल (४८ कसोटी, ७० वनडे, १६ टी-ट्वेंटी), ११. रॉड टकर (७१ कसोटी, ८४ वनडे, ३५ टी-ट्वेंटी), १२. जोएल विल्सन (१९ कसोटी, ६६ वनडे, २६ टी-ट्वेंटी)
आयसीसी सामनाधिकारी एलिट पॅनल
डेव्हिड बून (५७ कसोटी, १४३ वनडे, ६३ टी-ट्वेंटी), ख्रिस ब्रॉड (१०० कसोटी, ३२३ वनडे, १०६ टी-ट्वेंटी), जेफ क्रो (९९ कसोटी, २९८ वनडे, १२४ टी-ट्वेंटी), रंजन मदुगले (१९३ कसोटी, ३६३ वनडे, १०४ टी-ट्वेंटी), अँडी पायक्रॉफ्ट (७६ कसोटी, १७८ वनडे, ८७ टी-ट्वेंटी), रिची रिचर्डसन (२९ कसोटी, ५४ वनडे, ३६ टी-ट्वेंटी), जवागल श्रीनाथ (५३ कसोटी, २२३ वनडे, ८३ टी-ट्वेंटी)