निकोलस पूरनचे ४५ चेंडूंत शतक

0
111

>> वॉरियर्सकडून पॅट्रियोटस्‌ची शिकार

निकोलस पूरन याने केवळ ४५ चेंडूंत ठोकलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या टी-ट्वेंटी शतकाच्या जोरावर गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने ३ बाद २५ अशा स्थितीतून सावरताना सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌चा ७ गडी व २१ चेंडू राखून पराभव केला. पॅट्रियोटस्‌ने ठेवलेले १५१ धावांचे गयानाने १७.३ षटकांत गाठले. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील हा विसावा सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळविण्यात आला.

पूरन याने रॉस टेलर याच्यासह चौथ्या गड्यासाठी १२८ धावांची अविभक्त भागीदारी रचली. टेलर याने २७ चेंडूंत २५ धावा करत पूरनला चांगली साथ दिली. झूक्सने ज्या खेळपट्टीवर ९२ धावांचा यशस्वी बचाव केला होता त्याच खेळपट्टीवर पूरन याने तब्बल १० षटकारांची बरसात केली. पूरन याने पॅट्रियोटस्‌च्या फिरकीपटूंना लक्ष्य करताना लॉंग ऑफ व मिडविकेटवरून भिरकावले.
तत्पूर्वी, जोशुआ दा सिल्वा याच्या ५९ व दिनेश रामदिन याच्या नाबाद ३७ धावांच्या बळावर पॅट्रियोटस्‌ने ५ बाद १५० धावा केल्या. जग्गेसार याने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात २ बळी घेतल्यानंतर गयानाचा संघ अडचणीत सापडला होता. पण, पूरन व टेलर यांना बाद करणे पॅट्रियोटस्ला शक्य झाले नाही.

पॅट्रियोटस्, गयानाची धाडसी निवड
शनिवारच्या सामन्यात सातव्या स्थानावर फलंदाजी करत असताना तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघर्ष करत असलेल्या इविन लुईस याला पॅट्रियोटस्‌ने संघात स्थान दिले तर शेल्डन कॉटरेल याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. सहा डावांत केवळ ७३ धावा जमवू शकलेला स्टार ‘पाहुणा’ खेळाडू ख्रिल लिन याच्याप्रमाणेच निक केली यालादेखील पॅट्रियोटस्‌ने बाहेरचा रस्ता दाखवला.

गयानानेदेखील काही धाडसी निर्णय घेताना शर्फेन रुदरफर्ड व चंद्रपॉल हेमराज यांना वगळले. आपला पहिलाच टी-ट्वेंटी सामना खेळताना गयानाचा ऑफस्पिनर सिंक्लेअर याने चार षटकांत केवळ ९ धावा देत १ बळी घेतला. फलंदाजीत मात्र सलामीला येत त्याला केवळ ५ धावा करणे शक्य झाले.