नाहक आरोपांऐवजी ज्वलंत मुद्द्यांवर बोला

0
16

>> काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा भाजपला सल्ला; विरियातोंवरील आरोपांचा इन्कार

काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्यातील उमेदवार फर्नांडिस यांच्यावर नाहक आरोप करण्याऐवजी भाजपने राज्यातील बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, म्हादईचा प्रश्न आदी ज्वलंत मुद्द्यांवर बोलावे, अशी मागणी काल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

विरियातो फर्नांडिस यांनी तीन वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मुरगाव तालुक्यातील सेंट जासिंतो बेटावर नौदलाला ध्वजारोहण करण्यापासून रोखले होते, हा गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेला आरोप धांदात खोटा आहे, असा खुलासा देखील पाटकर यांनी परिषदेत केला.

नौदलाने ह्या बेटावर 13 ऑगस्ट रोजी जाऊन खोदकाम हाती घेतल्यानंतर नौदल आणि बेटावरील स्थानिक लोक यांच्यात वाद निर्माण झाला होता आणि हा वाद चिघळू नये यासाठी विरियातो फर्नांडिस यांनी खरे तर मध्यस्थीच केली होती आणि त्या मध्यस्थीनंतर 15 ऑगस्ट रोजी तेथे नौदलाला ध्वजारोहण करणेही शक्य झाले होते. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांनी फर्नांडिस यांच्यावर खोटे आरोप करू नयेत. त्यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करीत आहोत, असे पाटकर म्हणाले.

नौदलात जाऊन देशासाठी काम केलेल्या विरियातो फर्नांडिस यांची तानावडे यांनी माफी मागावी, अशी मागणीही पाटकर यांनी केली.
महागाई, बेराजेगारी व भ्रष्टाचार ह्या प्रमुख मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी भाजपचे नेते विरोधकांवर नको ते आरोप करू लागले असल्याचे पाटकर म्हणाले.

मडगाव, कुडतरी ह्या दोन मतदारसंघांत नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या सभांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळेच भाजप नेते हवालदिल झाले असल्याचेही पाटकर म्हणाले.