नारीशक्तीची लाज राखा

0
20

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याच्या कथित लैंगिक लीलांंनी सध्या कर्नाटकात हलकल्लोळ उडवला आहे. बाहेर आलेल्या व्हिडिओ क्लीप्सची संख्या हजारोंनी आहे आणि हा विषय आता केवळ कर्नाटकपुरता सीमित उरलेला नाही. हा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे आणि जेडीएसने सध्या भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केलेली असल्याने ह्या प्रकरणाने जेडीएसपेक्षा त्यांच्याशी युती असलेल्या भारतीय जनता पक्षाला अधिक अडचणीत आणले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी घणाघाती भाषण करून हा विषय राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवला. त्याला उत्तर देताना, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो त्यामुळे काँग्रेसने ह्या प्रकरणात आजवर कारवाई का केली नाही ह्याचे उत्तर प्रियांकांनी आपल्याच पक्षाच्या सरकारकडून घ्यायला हवे असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते देवराजगौडा यांनीही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना 8 डिसेंबर 2023 रोजी पत्र लिहून ह्या प्रकरणाची माहिती दिलेली होती व वेळीच सावध केले होते. तरीदेखील भाजपने कर्नाटकातील जागांवर डोळा ठेवून जेडीएसशी युती केली, इतकेच नव्हे, पंतप्रधानांनीही जेडीएस उमेदवारांचा प्रचार केला, त्यावर आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ह्या लैंगिक कांडाबाबत भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप हा नारीशक्तीला सन्मान देणारा पक्ष आहे आणि असे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत अशी भूमिका पक्षाने जरूर घेतली आहे, परंतु देवराजगौडा यांनी वेळीच सावध केलेले असतानाही राजकीय तडजोडीपोटी ह्या एवढ्या मोठ्या प्रकरणाकडे साफ कानाडोळा कसा केला हेही दुर्लक्षिता येत नाही. सर्वांत आक्षेपार्ह बाब म्हणजे देवेगौडांचा हा ‘पराक्रमी’ नातू हासनचे मतदान आटोपताच रातोरात जर्मनीला पळून गेला. एवढे गंभीर गुन्हे असलेल्या ह्या महाभागाला देशाबाहेर पळ कसा काढता आला, त्याला राज्य किंवा केंद्राच्या कोणत्याही यंत्रणेने वेळीच रोखले कसे नाही हाही प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. कर्नाटक सरकारने ह्या प्रकरणात विशेष तपास पथकाद्वारे चौकशी चालवली आहे, परंतु ह्या प्रकरणातला मुख्य आरोपीच परदेशात पळाल्याने ह्या चौकशीत निश्चितपणे अडथळा निर्माण झाला आहे. भारत सरकारने आपले सारे राजनैतिक वजन वापरून ह्या पळून गेलेल्या गुन्हेगाराला कायद्यासमोर हजर केले पाहिजे. देवेगौडांच्या जेडीएसशी काँग्रेसचे आजवर सख्य होते. गेल्या काही महिन्यांपासून जेडीएसने भाजपशी जवळीक साधली आणि लोकसभा निवडणुकीसाठी तर दोन्ही पक्षांनी युतीही केली. हे जे प्रकरण लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर उजेडात आले आहे, ते जुने आहे असे प्रज्ज्वलचे वडील एच. डी. रेवण्णा म्हणत आहेत. काका कुमारस्वामींनीही पत्रकार परिषदेत काल त्याचीच री ओढली, परंतु प्रकरण जुने असले म्हणून काही त्याचे गांभीर्य कमी होत नाही. ज्या महिला कर्मचाऱ्याने ह्यासंदर्भात पोलिसांत धाव घेतली आहे, तिने प्रज्ज्वल याच्याबरोबरच त्याचे वडील एच. डी. रेवण्णा यांचेही नाव तक्रारीत नोंदवले आहे. त्यामुळे हे दोघेही पितापुत्र ह्या प्रकरणातील संशयित आहेत आणि त्यांची कसून चौकशी होणे जरूरी आहे. ज्याप्रकारे शेकडोच्या संख्येने व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत, त्यांचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी, त्या केवळ निवडणुकीच्या तोंडावर बाहेर कशा आल्या असले भलते सवाल करून ह्या विषयात सारवासारव करण्याचा प्रयत्न होऊ नये. देवेगौडा कुटुंब हे कर्नाटकातील बडे प्रस्थ आहे. शिवाय आता त्यांच्या पक्षाने भाजपशी हातमिळवणी केलेली आहे. परंतु म्हणून आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांच्या ह्या एवढ्या मोठ्या अपराधांवर पांघरूण घालण्याची घोडचूक भाजप करणार नाही अशी अपेक्षा आहे. प्रकरण अंगाशी आल्याने जेडीएसने प्रज्ज्वलचे एसआयटी चौकशी पूर्ण होईस्तोवर पक्षातून निलंबन केले आहे. परंतु केवळ हे तोंडदेखले निलंबन पुरेसे नाही. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर दोषारोप करण्यासाठी केवळ राजकीय ब्रह्मास्त्र म्हणून ह्या प्रकरणाकडे पाहू नये. हा महिलांच्या सन्मानाचा विषय आहे. राजकारणात मुरलेल्या कुटुंबातला एखादा लाडावलेला पोर वारसाहक्काने हाती आलेल्या सत्तेच्या नशेत शेकडो महिलांशी असे उघडउघड गैरवर्तन करीत असेल, त्यांच्या अब्रूवर घाला घालत असेल, तर ते गपगुमान सहन करायला ह्या देशात मोगलाई आहे काय? भाजपनेे ह्या विषयात राजकीय लाभातोट्याची गणिते न मांडत बसता अत्यंत कणखर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ज्या नारीशक्तीची बात आजवर केली जात राहिली आहे, तिचा सन्मान राखणारी खंबीर भूमिका भाजपने जरूर घ्यावी!