नाफ्ता दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम आजपासून सुरू

0
203

अरबी समुद्रात भरकटल्यानंतर दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या नू शी नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता काढून तो दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम सोमवारी (आज) सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राजभवनवर पत्रकारांना सांगितले. हवामान जर चांगले राहिले तर आज सकाळपासून नाफ्ता जहाजातून काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम सुरू होणार असल्याचे सावंत म्हणाले.

नाफ्ता काढण्याची सगळी तयारी झालेली आहे. तसेच या जहाजापासून कोणालाही कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी सरकारने घेतलेली असून त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्रालयाचेही
समस्येकडे लक्ष
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष तर ठेवून आहेच. शिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाचेही या समस्येकडे लक्ष असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
सरकारने आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली आहेत असे पत्रकारांनी विचारले असता या बोटीपासून कुणालाही कसलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात आलेली असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहेत. त्यासाठी सुरक्षाविषयक सर्व यंत्रणांची मदत घेण्यात आली असल्याचे सावंत यानी स्पष्ट केले. नू शी हे नाफ्तावाहू जहाज गेल्या सुमारे १० ते १२ दिवसांपासून दोनापावला येथे समुद्रात अडकून पडले आहे.

‘ते’ मासे जहाजामुळे मृत झालेले नाहीत : जेनिफर

मार्वेल समुद्र किनार्‍यावर सापडलेल्या मृत मासळीमुळे स्थानिकात खळबळ उडाली. स्थानिक आमदार तथा महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी मार्वेल समुद्र किनार्‍यावर जाऊन नागरिकांची भेट घेऊन दोनापावलनजीक समुद्रात रुतलेल्या नाफ्तावाहू जहाजामुळे मासे मृत झालेले नाहीत, असा दावा काल केला.
नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कुठल्या प्रकारची समस्या जाणवल्यास आपणाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री मोन्सेरात यांनी स्थानिक नागरिकांना केले.

मंत्री मोन्सेरात यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुमार व इतर अधिकारी उपस्थित होते. दोनापावलनजीक रुतलेल्या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याचे काम मोठ्या जोखमीचे असून सरकारकडून सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. रुतलेल्या जहाजाची वरच्यावर तपासणी केली जात आहे, असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

समुद्र किनार्‍यावर सापडलेले मासे समुद्रात रसायन मिसळण्याने मृत झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला. तथापि, मंत्री मोन्सेरात यांनी सदर दावा फेटाळून लावला आहे. समुद्र किनार्‍यावर मृत मासे मिळाल्याची माहिती आपणाला द्यायला हवी होती. समुद्रात रुतलेले नाफ्तावाहू जहाज निश्‍चित बाहेर काढले जाणार आहे.