नाते .. न तुटणारे

0
936

– रश्मिता सातोडकर

भाऊ-बहीण हे नातं फक्त म्हणण्यापुरतेच न ठेवता त्या नात्यामध्ये जिवंतपणा आणला पाहिजे. जेव्हा अत्याचार घडताना दिसतो तेव्हा डोळे बंद मिटून न ठेवता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तरच राखी बांधताना, ओवाळणी करताना बहिणीला दिलेलं वचन सार्थ ठरेल.

श्रावण, भाद्रपद म्हणजे सण-उत्सवांचे दिवस. पावसाच्या तालाबरोबर सुरू झालेले आपले आवडते वेगवेगळे सण. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर उज्ज्वल आणि निर्मळ हास्य घेऊन येणारे हे सण. खरं तर प्रत्येक सण हा आवडीचा असतो. पण प्रत्येक बहीण-भावाला आवडणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज.
‘‘ रेशमी हे बंध सारे
रेशमी धाग्यात गुंतलेले
माझ्या प्रेमाचे प्रतीक हे
तुझ्या मनगटी उमटले..’’
राखी पौर्णिमा म्हणजे मोठ्या मायेने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते तो दिवस. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व बहीण-भावाचे अतूट नाते सांगणारा हा सण. रंगीबेरंगी रंगाचे हे रेशमी धागे प्रत्येक भावाच्या मनगटावर या सणाच्या दिवशी दिसतात. हा रेशमी धागा, जो नुसता धागा नसून प्रेमाच्या बंधनात बांधलेला धागा आपल्या मनगटावर बांधून घेण्यासाठी कितीही दूर असला तरी तिथून आपल्या बहिणीकडे येतो. राखी म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी व त्याबद्दल तिला आश्‍वस्त करण्यासाठी तिच्याकडून बांधून घेतलेले रेशमी बंध! आपल्या प्रत्येक सुख-दुःखात संकटाच्या वेळेला भाऊ आपले रक्षण करेल या आशेने ती राखी बांधते. भावा-बहिणीचे हे वेगळेच असे नाते असते. कधी रुसवा, रागावणे, खेळणे, जीवनातील प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणे.. यातच तर त्यांचे प्रेम दडलेले असते. त्यांच्यात कितीही राग असला तरी एकमेकांप्रतीची माया याच दिवशी उमलते, ज्याला रक्षाबंधनाच्या बंधनात बांधले जाते.
आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आणि आमचा विकास करायला भरभरून पुढे सरलो आणि या विकासाबरोबर आमच्या मानसिकतेतही बदल घडत गेला. शाळेत असताना आम्ही प्रतिज्ञा म्हणायचो, ‘‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत…’’ पण आज ही भावना गेली कुठे? विकासाबरोबर नातेसंबंध, संस्कृती, संस्कार हे सगळे विसरून गेलो… जिकडे पहावे तिकडे अत्याचार आणि अंदाधुंदी माजलेली दिसते. आपल्याच देशात आणि राज्यांत घडलेले अत्याचार जेव्हा वृत्तपत्रातून वाचनास येतात ते पाहून मनाला एकच प्रश्‍न भेडसावतो तो म्हणजे आपल्या स्वतंत्र भारतात खरोखरच आपल्या माता-बहिणी सुरक्षित आहेत का? घडत असलेल्या घटना पाहिल्या की मन अस्वस्थ होते. आपल्या भारतातील स्त्रियांची व्यथा, त्यांना मात्र भाऊ असून नसल्यासारखीच झाली आहे. बहीण-भावाचं हे पवित्र बंधन टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येक मुलाने एका मुलीला बहीण मानून तिची जबाबदारी घेण्याची नितांत गरज आहे. एकाच गर्भातून जन्माला आलो किंवा एकाच घरात वाढलो तरंच भाऊ-बहिणीचं नातं असायला पाहिजे हे महत्त्वाचे नसून दुसर्‍या मुलीकडे बघताना तीसुद्धा कुणाची तरी बहीण असेल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे जर घडेल तर भाऊ-बहीण, मैत्री, प्रेम ही पवित्र नाती कायम टिकून राहतील. भाऊ-बहीण हे नातं फक्त म्हणण्यापुरतेच न ठेवता त्या नात्यामध्ये जिवंतपणा आणला पाहिजे. जेव्हा अत्याचार घडताना दिसतो तेव्हा डोळे बंद मिटून न ठेवता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तरच राखी बांधताना, ओवाळणी करताना बहिणीला दिलेलं वचन सार्थ ठरेल.
आपले हे सण, रीतिरिवाज, परंपरा आपल्याला एकमेकांशी प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतात व हीच नाती आपल्याला जन्मभर प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून ठेवतात म्हणूनच ही पवित्र नाती ‘‘नाती’’ असतात.