- डॉ. पांडुरंग फळदेसाई
नाताळच्या दिवशी घरातील मंडळी वेगवेगळी पक्वान्ने करण्यात आणि ती भेटवस्तूंच्या बरोबर शेजारी-पाजारी आणि आप्तेष्टांपर्यंत पोचविण्यात परमानंद अनुभवतात. हे सगळे गोव्याच्या ख्रिस्ती बांधवांचा आनंदपर्वाचा वार्षिक सण म्हणून सर्वजण अनुभवतो. हा आनंद द्विगुणित करणार्या, येशूचा संदेश आत्मसात करून आयुष्य प्रकाशमान करण्याची प्रेरणा देणार्या आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोचविणार्या नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
नाताळचा सण जवळ आला म्हणजे जगभर उत्साहाचे वारे वाहू लागतात. एका अनामिक आनंदाच्या झुळझुळ उत्साहाच्या लहरी सर्व दिशांतून उठत असतात. नाताळ सणाच्या आठवणीनेच अनेकांची मने मोहरून उठतात. प्रियजनांच्या स्मरणाने हृदये आंदोलित होत असतात. ताटातूट झालेल्यांच्या स्मृतीने उसासत असतात. तरीदेखील नवजीवनाच्या आसक्तीने मनोमन उधाणत असतात. कारण नाताळाचे स्वरूप जे आजघडीला आहे ते मुळी तसेच आहे. आप्तस्वकीयांमध्ये रमत प्रकाशमय जीवन जगण्याचा साक्षात्कार घडविणारे.
नाताळ सण हा जगभर शांतीदूत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. ज्या येशू ख्रिस्ताने प्रेम, करुणा आणि सेवा या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला, त्याच्या स्मृती जागविण्याचा दिवस, क्षमा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारण्याचा दिवस. किंबहुना सर्व मानव जातीला त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल क्षमा करून भक्तिमार्गाचा साक्षात्कार घडविण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, असे समस्त ख्रिस्ती धर्मीय मानतात. माणसांच्या पापांचे क्षालन करून कृतज्ञ भावनेने प्रायश्चित्त घेण्यासाठी तो जन्माला आला आणि गांजलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा मार्ग दाखवून त्याने नीतिमय जीवनाचा संदेश दिला. केवळ शेजार्यांवर प्रेम करा नव्हे तर प्रत्यक्ष तुमच्या वाईटावर उठलेल्यांच्या बाबतीतही तोच प्रेमाचा दृष्टिकोन असावा हा त्याचा आग्रह होता.
समाजात जे महापुरुष अथवा संत म्हणून स्वीकारले गेले, त्यांच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, त्यांच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य. अपार कष्ट, दुःखमय प्रसंग. प्रसंगी शारीरिक वेदना, मानसिक छळ. या सगळ्यांमधून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतरच त्यांची महानता समाजाला कळून चुकली. आपल्या उभ्या आयुष्याचेच अग्निदिव्य केलेल्या संतपुरुषांची महती समाजाला बव्हंशी उशिराच कळलेली दिसते. येशू ख्रिस्ताच्या जीवनपटावर नजर फिरविली तर आपणाला हेच दिसून येईल.
येशूचे आईवडील एका गरीब कुटुंबात वाढलेले. त्याची आई मेरी गरोदर राहिली. तेव्हा तिला बेथलेहेमला जाण्याची इच्छा झाली. तिने आपला जोडीदार जोसेफला आपली इच्छा सांगितली. ती पूर्ण करण्यासाठी उभयता बेथलेहेममध्ये येऊन पोहोचली. मेरीला प्रसववेदनेची जाणीव झाली, म्हणून त्यांनी एखाद्या वसतिगृहात जागा मिळते का याची चौकशी आरंभली. परंतु त्यांना हवी तशी एकही जागा मिळू शकली नाही. त्यांना एका सुहृदाने गोठा दाखवला. निरुपायाने त्यांनी ती जागा स्वीकारली. -आणि संपूर्ण जगाला प्रेम, करुणा आणि सेवेचा संदेश देऊन वाट दाखविणार्या ईश्वरी अंशाने अशा प्रकारे एका गोठ्यात जन्म घेतला! बाळ येशूच्या रूपाने पृथ्वीतलावर ईश्वरीअंश अवतरल्याचे पहिल्यांदा ओळखले ते देवदूताने. त्यानेच मग सगळ्या मेंढपालांना त्याची वर्दी दिली आणि ही आनंदवार्ता वार्यावर पसरली. येशूच्या रूपाने पवित्र आत्म्यानेच कुमारी असलेल्या मेरीच्या पोटी जन्म घेतला असे बायबल सांगते. रोमन साम्राज्यातील ज्यू जमातीमध्ये त्याचा जन्म झाला. त्याला पुढे जॉन बाप्तीस्ताने बाप्तिस्मा देऊन त्याचे नामकरण केले. त्याच्या प्रवचनाने प्रभावीत झालेले ज्यू लोक त्याचे शिष्यगण बनले. त्याचा संप्रदाय वाढत गेला. त्यामुळे रोमन साम्राज्यातील राज्यकर्ते प्रारंभी साशंक झाले. समाजाला शांती आणि सामंजस्य तसेच प्रेम आणि सेवा यांचा संदेश देत सर्वत्र फिरणार्या या येशूच्या मागे भला मोठा शिष्यवर्ग लाभू लागला. त्यामुळे राज्यकर्ते बिथरले. त्यांनी येशूवर खटला भरला आणि त्याचा निकाल म्हणून त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली. तो मृत्युदंडदेखील साधा-सोपा नव्हता. त्याला क्रॉसवर खिळे ठोकून मृत्यू येईपर्यंत विव्हळत ठेवण्याची शिक्षा देण्यात आली. ज्या क्रॉसवर (खुरीसावर) त्याला चढविण्यात येणार होते, तो क्रॉस येशूने स्वतःच्या खांद्यावर वाहून न्यायचा होता! तो भर चौकात उभारून त्यावर जाहीरपणे त्याच्या हाता-पायांवर आणि छातीवर खिळे ठोकण्यात आले. संपूर्ण ज्यू-संप्रदायाला दहशत बसेल अशा बेताने रोमन राज्यकर्त्यांनी येशूच्या मृत्युदंडाची कार्यवाही केली. परंतु त्याने मृत्यूपूर्वीच ख्रिश्चन चर्चची स्थापना केली होती. -आणि आपल्या मृत्युदंडाचा अर्थही त्याने आपल्या संप्रदायिकांना स्पष्ट केला होता. त्याचे म्हणणे होते की, समस्त मानवांनी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून मी मृत्यूला सामोरा जातो. या त्याच्या परमोच्च त्यागाने त्याचे सगळेच भक्त दिपून गेले.
-आणि आश्चर्य म्हणजे, येशूच्या क्रॉसवरील मृत्युदंडानंतर तो पुन्हा जिवंत झाला! तो स्वर्गात जाऊन परमेश्वरी संकेत घेऊन परतला. म्हणून त्याला बाप ईश्वराचा पुत्र संबोधतात. असा झाला तो देवपुत्र. त्याचा जन्म २५ डिसेंबरचा आणि त्याचा मृत्युदंड हा गुड फ्रायडेचा. त्यामुळे ख्रिस्ती लोक हे दोन्ही दिवस अत्यंत पवित्र मानतात आणि मोठ्या भाविकतेने साजरे करतात. त्यादृष्टीने ख्रिसमस हा जगभर मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. या उत्सवी वातावरणाची पार्श्वभूमी मनोरंजक आहे.
नाताळ आणि कोंकणीत ‘नातलां’ या शब्दाची उत्पत्ती मूळ लॅटिन ‘नेतिवित्यिव’ शब्दावरून झाली. त्याचा अर्थ ‘स्थानिक’ असा सांगतात. म्हणजे तिथल्या लोकांनी साजरा केलेला. परंतु युरोपमध्ये आदिम स्वरूपाचा ‘मिड विंटर’ म्हणजे हिवाळ्याच्या मध्यावर येणारा उत्सव असे त्याचे स्वरूप होते, म्हणून त्याला लॅटिन भाषेत ‘नेतिवित्यिव’ असे संबोधले जायचे. इसवी सनाच्या चौथ्या शतकापूर्वी तो आदिवासी मानवसमूहांचा उत्सव होता. आदिम मानवसमूहांमध्ये उत्सवाचे स्वरूप रांगडे होते. त्यात वाद्ये वाजवून नाच-गाणी करायची, दारू ढोसायची, विविध प्रकारचे वेष करून हुंदडायचे, रंग फेकायचे. त्यामुळे त्या रांगडेपणाला बिभत्स स्वरूप यायचे. ही परंपरा मध्ययुगापर्यंत चालत आलेली होती असे इतिहास सांगतो. युरोपात पूर्वी हिवाळ्यातील उत्सव असेच ख्रिसमसचे स्वरूप होते. हा उत्सव वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या पारंपरिक नावांनी साजरा केला जात असे. लॅटिनमध्ये ज्याला ‘नेतिवित्यिव’ असे म्हणत त्याला पुढे येशूच्या जन्माचा संदर्भ दिला गेला आणि त्यामुळे त्याचा अर्थ ‘जन्म’ असाही मानण्यात येऊ लागला. जुन्या इंग्रजी परगण्यांत ‘यूल’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. त्याचा कालावधी डिसेंबर-जानेवारीपर्यंत असायचा. नंतर त्याचा संबंध ख्रिसमसशी आला आणि यूल म्हणजे ख्रिसमस साजरा करण्याचे एक रूप बनून गेले. फ्रान्समध्ये ‘नोएल’ किंवा ‘नोबेल’ नावाचा उत्सव चौदाव्या शतकापासून साजरा करण्यात येतो. त्या उत्सवाचे नावदेखील येशूच्या जन्माचा संदर्भ सांगते. रोममध्ये ख्रिसमस साजरा केल्याची पहिली नोंद इ.स. ३३६ मध्ये केलेली आढळते. याचा अर्थ चौथ्या शतकात ‘ख्रिसमस’ हे नाव नाताळ सणाला लाभले असे म्हणता येईल. पुढील काळात सोळाव्या शतकापर्यंत ‘ख्रिसमस’ साजरा होत गेला. परंतु त्या साजर्या करण्याच्या विविध पद्धती आणि चालीरीती यांच्यावर तत्कालीन चर्चने आक्षेप घेतले, विरोध केला आणि बंदीदेखील आणली. हे आक्षेप घेण्यात आणि बंदीचा पुरस्कार करण्यात प्रोटेस्टंट धर्मोपदेशक आघाडीवर होते.
ख्रिसमसचा सण हा एक धार्मिक सण म्हणून साजरा करताना हर्ष, उन्माद, दारू, नाच-गाणी यांना आवर घालून तो धार्मिकतेच्या अंगाने साजरा व्हावा असा चर्चसंस्थेचा आग्रह अधून-मधून उफाळून आलेला इतिहासात दिसतो. मात्र ख्रिसमस ही रक्काची ‘सुट्टी’ मानली जावी हा लोकांचा आग्रह होता. ख्रिसमसच्या उन्मादी साजरीकरणात इंग्लंड आघाडीवर होता. त्यामुळे ख्रिसमसची अधिकृत सुट्टी १६६० मध्ये जाहीर करणारा इंग्लंड हा पहिला देश होता!
चार्लमॅग्र राजाचा राज्यारोहण समारंभ इ.स. ८०० मध्ये २५ डिसेंबरला झाला. तसेच राजा एडमंडनेदेखील इ.स. ८५५ मध्ये २५ डिसेंबरला राजमुकुट धारण केला. पुढे इ.स. १०६६ साली इंग्लंडचा राजा विल्यम हा २५ डिसेंबरलाच गादीवर बसला. त्यावेळी त्याने आपल्या निवडक प्रजाजनांना मेजवानी दिली. त्यासाठी २८ बैल आणि ३०० मेंढे कापले गेल्याची नोंद इतिहासात आहे. इ.स. १३७७ मध्ये रिचर्ड दुसरा हा राजा याच दिवशी गादीवर आला. सगळा तपशील सांगण्याचे कारण म्हणजे, ख्रिसमसला राजमान्यता मिळाली. त्यामुळे ख्रिसमस साजरा करण्याचे महत्त्व वाढले व जनसामान्यांनीदेखील ख्रिसमस हा आपला सण आहे याचा स्वीकार केला. परंतु त्यानंतरच्या पाच-सहा शतकांपर्यंत ख्रिसमस साजरा करण्याच्या परंपरेवरून अनेक चर्चा, ऊहापोह झाले. ख्रिसमसला अवकळा आली. अनेकदा बंदी आली आणि कधीमधी तो उण्या-अधिक प्रमाणात साजरा होत राहिला.
मुळात मध्य युगातील कार्निव्हाल जसा साजरा केला जात होता, त्याचेच अनुकरण ख्रिसमसच्या बाबतीत करण्याकडे सगळ्यांचा कल राहिला. त्यामुळे त्याला विरोध होत गेला. ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा उपक्रम असे करण्याऐवजी केवळ मौजमजा आणि नशापाणी, नृत्य-गाणी असेच स्वरूप दृढ होत गेले. प्रत्यक्षात रोममध्ये २५ डिसेंबरला सूर्याचे दक्षिणायन होत असल्याने त्या दिवसापासून प्रकाश आणि सौरऊर्जा यांचे प्रमाण कडक हिवाळ्याच्या मध्यापासून वाढत जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा आनंद होणे स्वाभाविक म्हणून हा मध्य-हिवाळ्यातील ख्रिसमस हे युरोप आणि पाश्चात्त्य देशातील आनंदपर्व ठरले. त्याचप्रमाणे २४ जूनपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तो दिवस हा जॉन द बाप्तिस्त याचा जन्मदिन मानला जातो. हे दोन्ही उत्सव पाश्चात्त्य देशांतील ख्रिस्ती धर्मियांसाठी महत्त्वाचे मानले जातात. या उत्सवांमधून मध्ययुगीन आदिवासींच्या परंपरा प्रतिबिंबीत झालेल्या दिसतात. कारण या आदिवासीचे मागाहून ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या परंपरांचा प्रभाव त्यांच्या ख्रिसमस सादरीकरणामधून दिसला तर नवल मानण्याचे कारण नाही.
परंतु १९ व्या शतकात युरोपमध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या परंपरांचे नव्या विचारांनुसार पुनरुज्जीवन करण्याची विचारपरंपरा सुरू झाली. त्याचे कारण म्हणजे, तेथील साहित्यिक. प्रख्यात साहित्यिक वॉशिंग्टन आयर्विंग, चार्लस डिकन्स आणि अन्य समकालीन साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून ख्रिसमस परंपरांचा विधायक विचार पुढे आणला. ख्रिसमस हा कुटुंबाचा सण व्हावा हा मध्यवर्ती विचार त्यात समाविष्ट होता. मुलांच्या मानसिकतेचा विचार, त्यांच्यासाठी ख्रिसमस हा आनंद घेऊन येणारा, हवाहवासा वाटणारा सण व्हावा हा दृढ विचार होता. त्यामुळे सांताक्लॉज हा ख्रिसमसचा अविभाज्य भाग मानला गेला. प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा नववर्षाच्या निमित्ताने होत असे. ती आता ख्रिसमसच्या सणात प्रत्यक्षात आणली जाते. मुलांना खाऊ वाटण्याची प्रथा प्रोटेस्टंटांनी १६व्या- १७व्या शतकात चालू केली. म्हणूनच ख्रिसमस हा अधिक धार्मिक आणि प्रार्थना-अर्चना-सेवा-कल्याण-आनंदाची देव-घेव असा साजरा व्हावा असा त्यांचा आग्रह होता. १९व्या शतकातील साहित्यिकांच्या प्रयत्नाने ख्रिसमसचे विधायक स्वरुपात पुनरुज्जीवन झाले.
त्याचाच परिणाम म्हणून आजच्या काळात ख्रिसमसमध्ये धार्मिक आचरण, प्रार्थना, अर्चना, कुटुंब, वृद्ध, मुलेबाळे, नोकर-चाकर यांचा मानवी दृष्टिकोनातून केलेला विचार दिसतो. त्यातूनच चर्चमधील मध्यरात्रीची प्रार्थनासभा प्रत्येक ख्रिस्ती धर्मियाला महत्त्वाची वाटते. मेंढ्यांच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या बाळ येशूचा देखावा उभारण्यात सगळेजण धन्यता मानतात. ख्रिसमस ट्री आणि तारे-तारकांची सजावट करण्यात आबालवृद्ध रंगून जातात. येशूच्या जन्मावेळची आणि त्याच्या जन्माची इतिकर्तव्यता वर्णन करणारी नाताळगीते गाताना तरुण आणि प्रौढ आत्मिक आनंदाची अनुभूती घेताना दिसतात. या हृदयीचे त्या हृदयी पोचावे या विचाराने सद्भावनांची देवघेव करताना भेटकार्डे, ई-कार्डे, संदेश, फिल्म क्लिप्स, गाण्यांचे अल्बम्स यांची देवाण-घेवाण होत असते. वंचितांना नाताळाच्या आनंदपर्वात सामावून घेण्यासाठी सांताबाबा आपली मिष्ठान्न आणि भेटवस्तूंची झोळी रिकामी करण्यासाठी धडपडत असतो. -आणि घरातील मंडळी वेगवेगळी पक्वान्ने करण्यात आणि ती भेटवस्तूंच्या बरोबर शेजारी-पाजारी आणि आप्तेष्टांपर्यंत पोचविण्यात परमानंद अनुभवतात. हे सगळे गोव्याच्या ख्रिस्ती बांधवांचा आनंदपर्वाचा वार्षिक सण म्हणून सर्वजण अनुभवतो. हा आनंद द्विगुणित करणार्या, येशूचा संदेश आत्मसात करून आयुष्य प्रकाशमान करण्याची प्रेरणा देणार्या आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोचविणार्या नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!