नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

0
19
  • रमेश सावईकर

आज संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या अलौकिक कार्याचा हा गोषवारा…

भारतीय जीवनात संत-महात्म्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. त्यामुळे त्यांचे आपल्या समाज-इतिहासातील स्थान अलौकिक आहे. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या पाच संतकवींचे कार्य अद्वितीय असेच आहे. या संतांची अमृतवाणी मनाला संजीवनी देत आली आहे. हे पाच संत म्हणजे भारतीय जीवनाचे पंचप्राण होत.

संत नामदेव महाराजांच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी व हिंदी साहित्यात उमटलेला असून तो एक आगळा-वेगळा पैलू आहे. भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य संतश्रेष्ठ नामदेवांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केले. त्यांनी साम्यधर्माचा नवा इतिहास भारतात घडविला. त्या काळात महाराष्ट्राबाहेर जाऊन भागवत धर्माचा प्रचार गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार आदी राज्यांत केला. भागवत धर्माची धवल पताका सर्वत्र फडकविली.

नामदेवाचे मूळ पुरुष यदुशेट हे शिंप्याचा व्यवसाय करीत. आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी नियमाने त्यांच्या घराण्यात होत असे. नामदेवांचे पूर्वज भक्तिसंप्रदायी होते. नामदेवांच्या वडिलांचे नाव दामाशेटी व आईचे नाव गोणाई. भगवंताचे निरंतर अनन्यभावे नामस्मरण आणि गुणगान हा त्यांचा छंद. पुत्रप्राप्तीसाठी गोणाईने पांडुरंगास नवस केला. शेवटी तिची ईशसेवा फलद्रूप झाली. शके 1192, प्रमोदनाम संवत्सरे, कार्तिक शुक्ल 11, रविवारी (26 ऑक्टोबर 1270) सूर्योदयास नामदेवांचा जन्म झाला. नामदेवांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती पूर्वापार चालत आली असल्यामुळे अगदी बालपणापासून त्यांना विठ्ठलभक्तीचा छंद जडला. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. आरंभी नामदेवांच्या विठ्ठलभक्तीला विरोध करणारे त्यांचे कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्तिप्रेमात पुढे रंगून गेले.

नामदेवांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे नामदेव व ज्ञानदेव यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग. या भेटीच्या वेळी त्यांचे वय 20 वर्षांचे होते. पांडुरंगाची सगुण मूर्ती हेच परब्रह्म. त्याच्या व्यतिरिक्त देव नाही अशी नामदेवांची ठाम समजूत होती.

‘नामदेवा देवे सांगितले कानी। संताचे दरूशनी जावे तुवां॥’ अशी देवाकडून प्रेरणा मिळाली व ते निवृत्तीनाथादी भावंडांच्या दर्शनास आळंदीस आले. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांना मिळालेल्या ब्रह्मबीजाची प्राप्ती खेचरनाथांकडून घेण्यास नामदेवांना विठ्ठलाने प्रेरणा दिली.
देव म्हणे नाम्या, विसोबा खेचरासी।
शरण तयांसी जावे वेगे॥
नामदेवांनी विसोबा खेचरांकडून अनुग्रह घेतला. आध्यात्मिक जीवनात गुरुकृपा झाल्यानंतर जे अनुभव आले ते ‘सद्गुरू नामकें। पूर्ण कृपा केली॥’ या अभंगात नामदेवांनी नमूद केले आहे.
संत नामदेवांनी ज्ञानदेवांचे दर्शन घेतले. त्यांच्या पायावर लोटांगण घातले. ‘नामदेव म्हणे सुफळ माझे जिणे। स्वामींच्या दर्शने धन्य झालों॥’ अशा शब्दांत नामदेवांनी संत ज्ञानदेवांचा गौरव केला. तीर्थयात्रेचा मनोदय ज्ञानदेवांनी नामदेवांकडे व्यक्त केला. परंतु नामदेवांनी पंढरी क्षेत्र व पांडुरंग यांना सोडून तीर्थयात्रेस जाण्यास नकार दिला.
‘जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन। तरी देवतीर्थ भजन न सांडिती॥’ अशा शब्दांत ज्ञानदेवांनी नामदेवांची तीर्थयात्रा करण्यासाठी आळवणी केली. अखेर नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या सहवासात उत्तरेची (उत्तर भारत) तीर्थयात्रा केली. नामदेवांच्या ठायी निस्सीम विठ्ठलभक्ती होती. ज्ञानदेवांच्या सहवासामुळे नि त्यांच्या उपदेशाने प्रभावीत होऊन नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार उत्तर व दक्षिण भारतात केला. भागवत धर्माचा पाया संत ज्ञानदेवांनी घातला, तर त्या धर्माचे मंदिर उभारण्याचे काम संत नामदेवांनी केले. त्यावरती संत तुकारामांनी कळस चढविला.

ज्ञानदेवे रचिला पाया।
नामदेवे उभारियले मंदिर।
तुका झालासे कळस॥
असे वर्णन करण्यात आले आहे. संत ज्ञानदेवांनी शके 1218 मध्ये संजीवन समाधी घेतल्यानंतर तब्बल पाच दशके भागवत धर्माची धवल पताका उत्तर व दक्षिण भारतभर फडकावीत ठेवण्याचे महान कार्य संत नामदेवांनी केले. पंजाबात गेल्यानंतर तेथे त्यांनी 18-20 वर्षे वास्तव्य केले. ते उत्तरेकडील प्रदेशात गेले आणि ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥’ हे आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची कामगिरी अलौकिक आहे. भागवत धर्माचे महत्त्व उत्तरेकडील लोकांना पटवून देणारे नामदेव हेच पहिले संतशिरोमणी होत.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचें॥
हेंचि घडो मज जन्माजन्मांतरी। मागणें श्रीहरी नाहीं दुजें॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन। जनीं जनार्दन ऐसा भाव॥
विठ्ठलाबद्दल अशा प्रकारची उत्कट भक्ती आणि अपूर्वाईचा मनोभाव बाळगणाऱ्या नामदेवांनी अखेरचे दिवस पंढरपुरी घालविले, आणि वयाच्या 80 व्या वर्षी तेथेच आपला देह ठेवला. पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारातील ‘नामदेवाची पायरी’ ही त्यांची समाधी म्हणून ओळखली जाते. भक्तिप्रेमापोटी देहभान विसरून, हाती वीणा घेऊन, मुखी हरिनाम धरून आणि अन्नोदक सोडून पंढरीच्या राउळात कवित्व करीत कीर्तनाचा सोहळा पार पडला. एवढेच नव्हे तर ‘केशव तोचि नामा। नामा तोचि केशव॥’ या अद्वैताच्या भूमिकेतून देवाशी जवळीक केली. आपली भक्ती ज्ञानाने डोळस राहील हे पाहिले आणि ज्ञानाला भक्तीचा ओलावा दिला.
नामदेवांनी हरिनामाचा सुकाळ एवढ्या जीवाभावाने केला की ‘विठ्ठल’ या नावाला त्यामुळे एकप्रकारची भव्यता प्राप्त झाली. नामदेवांनी आपला मनोभाव प्रकट करताना भाषेच्या साधेपणातील रहस्य लक्षात घेतले.
भक्ताचें तें गाणें बोबडीया बोलीं। तें तें विठ्ठलें अर्पियली॥
तूंचि माझे व्रत, तूंचि माझे तीर्थ। तूंचि धर्म अर्थ काम देवा॥
या रीतीने जीवनाचे सार त्यांनी सांगून टाकले आणि ‘नाचू कीर्तनाचे रंग। ज्ञानदीप लावू जगी॥’ ही भूमिका स्वीकारून भागवत धर्माच्या प्रचाराचा झेंडा हाती घेतला. त्यांची कविता ही त्यांच्या आत्मविश्वासाची साधन बनली. विठ्ठलभक्तीचा आनंद इतरांना देणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी कवित्वाचे माध्यम स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या काव्यलेखनाची पार्श्वभूमी ही परमेश्वराबद्दलच्या नितांत श्रद्धेवर आणि पराकाष्टेच्या पूज्य बुद्धीवर आधारली गेली. त्यांच्या कवितेने त्यांच्या आर्तहृदयाचा अप्रतिम आविष्कार केला. साध्या, सरळ व समर्पक शब्दांच्या बळावर तिने वत्सल, करुण आणि अद्भुत रस सहजतेने हाताळले. पंढरीनगरी, विठ्ठल आणि भक्तिमहिमा या प्रमुख विषयांभोवतीच तिने आपले विश्व उभे केले. त्यांच्या अनुभवांतील परतत्त्वस्पर्शाने त्यांच्या कवितेला उदात्ततेची कांती लाभली.

त्यांच्या अभंगातून विठ्ठलाप्रतीची उत्कटता आढळून येते. भगवत प्रेमाच्या विविध छटा निरनिराळ्या भूमिकांमधून नामदेवांनी मोठ्या सहजतेने साकार केल्या आहेत. ते आपल्या अभंगात म्हणतात ः
महामुक्ति क्षेत्र तीर्थेंची तारक। उपमेशी आणिक नाहीं दुजें॥1॥
तें हें पंढरपूर प्रेमाचे भांडार। नामे निरंतर गर्जतसे॥2॥
अनेकांच्या वाचनामध्ये, कित्येकांच्या पठणामध्ये, काहींच्या गायनामध्ये आणि वारकऱ्यांच्या भजन-कीर्तनामध्ये नामदेवांच्या कवितेने (अभंगाने) आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामागे आवर्जून श्रद्धा व भक्ती उचंबळून आली आहे. म्हणूनच नामदेवांनी ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ असे का म्हटले याची कल्पना येते.
ज्ञानदेव, नामदेव हे संतकवी मुख्यतः साक्षात्कारी संत होते. ईश्वरभक्तीचे साधन मानून त्यांनी काव्यरचना केली. कीर्तनाद्वारे केल्या जाणाऱ्या भक्तीचे माध्यम म्हणून नामदेवांनी अभंगरचना केली. पंढरपूरच्या भक्तिमार्गाची पेरणी त्यांनी पंजाबातही केली. सध्या पंजाबातील ‘घुमान’ या गावी नामदेवांचे स्मारक मंदिर असून ते ‘गुरुद्वार बाबा नामदेवजी’ या नावाने प्रसिद्ध आहे. पंजाबातील बहुतेक शिंपी नामदेव संप्रदायी असून त्यांना ‘चिंबा’ किंवा ‘छिपा’ म्हणतात.

संतमंडळींनी सुखात राहावे, हरिदास चिरंजीव ठरावेत, ज्यांच्या मुखी पांडुरंग आहे त्यांचे कल्याण व्हावे एवढीच देवापायी त्यांची प्रामाणिक मागणी होती. प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय नामदेवांनी साधला.
‘अवघा संसार सुखाचा करीन। अवघ्या भावें धरीन विठ्ठल एक॥’ ही त्यांची संसारविषयक दृष्टी होती. ते वृत्तीनेच समाजनिष्ठ होते. अज्ञ, भोळ्या आणि सुश्रद्ध जनतेला त्यांनी मानवतावादी आचारधर्म शिकविला. नामदेवांचा कालखंड हा वारकरी पंथाचा सुवर्णकाळ आहे. ज्ञानदेवादी भावंडे, गोरा कुंभार, सावता माळी, विसोबा खेचर, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, सोयराबाई इत्यादी संतकवी कवयित्री त्यांचा एकत्र उदय या काळात झाला. उत्तरेकडील गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पेशावर इत्यादी प्रांतांत नामदेवांनी वारकरी पंथ रुजविला.

वारकरी पंथाने आपली जात बनविली नाही म्हणून ब्राह्मणांपासून अंतजापर्यंतचे आणि बौद्ध, जैन, लिंगायत इत्यादी धर्मातील लोक ‘वारकरी’ म्हणून दृष्टीला पडतात. नाथ, दत्त, चैतन्य, आनंद इत्यादी संप्रदायांच्या उपासकांनी वारकरी पंथ स्वीकारला. वारकरी पंथाचे भजन-कीर्तन आजही नामदेवांच्या अभंगात रंगलेले आढळते.