नागरिकांसाठी लवकरच बहुद्देशीय कार्डे

0
111

घरांच्या बांधकामासाठी मार्गदर्शक तत्त्वे
प्रादेशिक आराखडा अधिसूचित झाला नसला तरी लहान घरे बांधण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करून नियम शिथील करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना दिले. प्रत्येक कामासाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्रे कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डेटाबँक तयार करून पुढीला दोन महिन्यांत बहुउद्देशीय कार्डे वितरीत करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
बारावीपर्यंत येथे शिक्षण घेतलेल्यांना व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निवासी दाखल्याची गरज का आहे, असा प्रश्‍न पर्रीकर यांनी केला. नगरनियोजन खात्याकडून कोणतीही फाईल आल्यानंतर आपल्याला भीती वाटते, त्यात स्पष्टता नसते, असे सांगून किरकोळ स्वरुपाच्या कामासाठी लोकांना नगर नियोजन खात्यात जाण्याची गरजच भासू नये, अशी कामे ऑनलाइन पध्दतीनेच झाली पाहिजेत, असे ते म्हणाले.
प्रादेशिक आराखड्यासंदर्भात सभागृहातील सदस्यांची समिती स्थापन करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत अटल ग्राम योजना लागू करण्यात येईल, असे सांगून गणेश चतुर्थीच्या काळात माटोळीचे सामान विकण्यासाठी जागा निश्‍चित करणार असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले.
प्रशासनात सुमारे ५६ हजार सरकारी कर्मचारी आहेत, त्यात शिक्षण, पोलीस व आरोग्य या तीन खात्यातील एक तृतीयांश कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे पर्रीकर यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर सांगितले. सरकारी नोकराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला किंवा मुलाना नोकर्‍या देणे सक्तीचे नाही. अनुकंपा तत्वाचा चुकीच्या पध्दतीने अर्थ लावल्यामुळेच गोंधळ होतो. एखाद्या सरकारी कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंब रस्त्यावर येत असेल तरच नोकरी दिली जाते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. २ लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असलेल्यांचे अर्जच या योजनेखाली लक्षात घेतले जातात, असे पर्रीकर यांनी सांगितले. सरकारने ९० टक्के अर्ज योग्य पध्दतीने हाताळले असून तीन ते चार प्रकरणांचा फेरविचार करावा लागला, असे त्यांनी सांगितले.
ज्या सरकारी कर्मचार्‍याकडे अकार्यक्षमतेच्या बाबतीत बोट दाखविले जाते, त्या ४६ हजार कर्मचार्‍यांची भरती आपल्या सरकारने केलेली नाही. पैकी फक्त तीन ते चार हजार कर्मचार्‍यांची भरती आपल्या सरकारने केली. केंद्रातील कॉंग्रेस सरकारने आपल्याला सतावण्याचेच काम केले. गेल्या दोन महिन्यांपासूनच खर्‍या अर्थाने सरकारचे काम सुरू झाल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. सरकारच्या कार्यक्षमतेचा परिणाम डिसेंबरपर्यंत दिसून येईल, असे पर्रीकर यांनी सांगितले.