नव्या सरकार स्थापनेआधी महायुतीत अभूतपूर्व गोंधळ

0
5

>> ना गटनेता निवडला, ना सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधीची जय्यत तयारी मात्र सुरू; मुख्यमंत्री कोण होणार?

विवाहाची तारीख ठरलीय, मुहूर्त ठरलाय, ठिकाणही ठरलेय, वऱ्हाडीही तयार आहेत; पण नवरदेवाचा पत्ताच नाही, अशी काहीशी स्थिती महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पाहायला मिळत आहे. गेल्या शनिवारी नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री भाजपचाच होणार हेही स्पष्ट करण्यात आले; मात्र शपथविधीला फक्त 1 दिवस उरला असतानाही ना गटनेता निवडला आहे आणि ना सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसऱ्या बाजूला चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच असून, भाजपमधील ह्या अभूतपूर्व गोंधळाची देशभरात चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला लागला. झारखंडमध्ये लगेचच नवे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे कामालाही लागले आहेत; परंतु महाराष्ट्रात अद्याप नवे सरकारच अस्तित्त्वात आलेले नाही. 30 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली. त्यानुसार गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री भाजपचाच असेल, तसेच दोन उपमुख्यमंत्री देखील असतील. असे असले तरी तिन्ही पक्षांतील मंत्रिपदांसाठीच्या चढाओढीमुळे मुख्यमंत्री कोण हे अजूनही जाहीर केलेले नाही. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी अडून बसले आहेत. मात्र भाजप त्यांना हे खाते द्यायला तयार नाही. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खाते देखील हवे आहे. तिन्ही पक्षांतील धुसफुशीमुळे मुख्यमंत्री निवड जाहीर झालेली नाही.

फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही महायुतीमधील तिढा सुटलेला नाही. त्यातच शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर काल एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर्षा निवासस्थानी जाऊन शिंदेंची भेट घेतली. मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि ती यशस्वी ठरली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

आज गटनेता निवडणार; पण..
बुधवारी 4 डिसेंबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. त्यात भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीतील चर्चेनंतर गटनेता म्हणून निवडलेल्या आमदाराचे नाव दिल्लीतील हायकमांडला कळवले जाणार आहे. त्यानंतर हायकमांकडूनच अंतिम घोषणा होणार आहे. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारीच नवा मुख्यमंत्री कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी 11 मंत्रिपदांसाठी आग्रही
शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदे हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेलांसाठी केंद्रात कॅबिनेट पद हवे आहे.

मुख्यमंत्री ठरेना; मंत्रिपदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे : एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत.
भाजपचे संभाव्य मंत्री : रवींद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल,पंकजा मुंडे, अतुल सावे.
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे : अजित पवार, अदिती तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनिल शेळके, हसन मुश्रीफ.