केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पशुसंवर्धन मंत्र्यांच्या बैठकीत आपण गोव्यात अतिरिक्त डेअरी स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला असून मंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पशुसंवर्धनमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या कुर्टी येथील डेअरीमध्ये प्रतिदिनी ८२ हजार लिटर दुधाचे उत्पादन केले जाते. भविष्यकाळात दुधाच्या उत्पादनात वाढ होईल. त्यामुळेच अतिरिक्त डेअरीची गरज असल्याचे पार्सेकर म्हणाले. सोनसडो येथील पशु चिकित्सा इस्पितळाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पुनर्बांधणी करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव सादर केला आहे. पेडणे, डिचोली व सासष्टी भागात तीन दवाखाने उघडणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.
दूध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्राच्या ‘गोकुळ मिशन’ योजनेखाली गोव्यात दहा गोशाळा उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सादर केला आहे. प्रत्येक गोशाळेत ४०० गायींची व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याची तयारी असलेल्यांना खाजगी डेअरी उभारण्यास मान्यता देऊ शकेल. परंतु कुणालाही सरसकट परवाने देऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. गायींचे दूध उत्पादन क्षेत्रात आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्राने २०१४-१५ वर्षासाठी दीड कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. सुधारीत ‘कामधेनू’ योजनेखाली ६० हजार रुपयेपर्यंत अनुदान देण्याचे ठरविले असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
पशुसंवर्धन खात्याचे प्रस्ताव
वाढीव उत्पादनासाठी नव्या डेअरीचा प्रस्ताव.
सोनसडो पशुचिकित्सा इस्पितळाची पुनर्बांधणी.
पेडणे, डिचोली व सासष्टीत पशुचिकित्सा दवाखाने.
प्रत्येकी ४०० गायींच्या व्यवस्थेची तरतूद असलेल्या १० गोशाळा.
नव्या ‘कामधेनू’ योजनेखाली वाढीव अनुदान.