>> राज्यात रुग्णसंख्या ८१८ वर : मांगूर हिलशी संबंधित ३८ नवे रुग्ण
राज्यात नवीन ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८३ झाली आहे. मांगूर हिल आणि मांगूर हिलशी संबंधित नवीन ३८ रुग्ण आढळून आले आहेत. तर, नावेली आणि वाडे येथे प्रत्येकी १ आयझोलेटेड रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ६ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ८१८ एवढी झाली असून त्यातील १३५ रुग्ण बरे झाले आहेत. ६८३ रुग्णांवर कोविड हॉस्पिटल आणि केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
नावेली, वाडे येथे आयझोलेटेड रुग्ण
राज्यातील विविध भागात आयझोलेटेड रुग्ण आढळून येत आहेत. नावेली, वाडे या भागात प्रत्येकी १ आयझोलेटेड रुग्ण काल आढळून आला आहे. यापूर्वी इंदिरानगर – चिंबल, पर्वरी, आंबावली आदी भागात आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.
आंबावलीत नवीन ७ रुग्ण
आंबावलीमध्ये नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आंबावलीमध्ये रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. आंबावलीनंतर कुडतरी येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कुडतरी येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरीतील रुग्णांची संख्या आता २१ झाली आहे. मडगाव येथे नवीन २ रुग्ण आढळून आले आहेत. मडगावातील रुग्णांची संख्या १० झाली आहे. केपे येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून केपेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
सडा, बायणात नवीन १६ रुग्ण
सडा आणि बायणा – वास्को येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सडा येथे नवीन ९ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे. बायणा येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. न्यू वाडे येथे आणखी १ रुग्ण आढळून आला आहे. न्यू वाडेतील रुग्णांची संख्या १७ झाली आहे.
राज्यात प्रवेश केलेले ४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. इंदिरानगर चिंबल, पर्वरी, मोर्ले, राय, बेती या भागात नवीन रुग्ण आढळला नाही. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३५ झाली आहे. जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात २० रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने ८९७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
मांगूर हिलशी संबंधित नवीन ३८ रुग्ण
मांगूर हिलमध्ये नवीन १६ रुग्ण आढळून आले आहेत. तर मांगूर हिलशी संबंधित नवीन २२ रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर हिलमधील रुग्णसंख्या ३३८ वर पोहोचली असून मांगूर हिलशी संबंधित रुग्णांची संख्या २०५ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मांगूर हिल मधील तपासणी कमी करण्यात आल्याने रुग्णांची संख्या कमी झाली होती.